मुंबई : (Maharashtra TET Paper Leak) शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) च्या मुद्द्यावरून सोमवारी विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घालत सभात्याग केला. दरम्यान, टीईटी पेपरफुटीप्रकरणी लवकरच सविस्तर निवेदन सादर करणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सभागृहात सांगितले.
सोमवारी, विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडण्याची विनंती केली. यावर बोलताना काँग्रेस आ. विजय वडेट्टीवार म्हणाले की, "लाखो विद्यार्थी आणि शिक्षक वर्षानुवर्षे मेहनत घेऊन परीक्षेची तयारी करतात. मात्र, पेपरफुटीच्या घटनांमुळे त्यांच्या कष्टांवर पाणी फिरत आहे. परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेण्यात सरकार वारंवार अपयशी का ठरते? याचे उत्तर महाराष्ट्राला द्यावे. टीईटी पेपरफुटीप्रकरणातील धागेदोरे, पेपर तयार करणाऱ्या संस्था, संबंधित कंपन्या आणि या प्रकरणामागील संपूर्ण साखळीची सखोल चौकशी करावी. तीन आरोपींना अटक झाली असली, तरी त्यांचे दुसऱ्या राज्यांशी असलेले संबंधही समोर येत आहेत. त्यामुळे या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश होणे आवश्यक आहे."(Maharashtra TET Paper Leak)
"राज्यातील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून या गंभीर विषयावर विधिमंडळात सविस्तर चर्चा व्हावी. सरकारने दोषींवर कठोर कारवाई करण्याबरोबरच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणती ठोस पावले उचलणार आहे? असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केली. परंतू, विधानसभा अध्यक्षांनी स्थगन नाकारल्याने विरोधकांनी सभात्याग केला.(Maharashtra TET Paper Leak)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....