करमाळा आयटीआयला ‘मदनदास देवी’ यांचे नाव; राज्यातील सर्व आयटीआयंच्या आधुनिकीकरणासाठी 5,400 कोटींची घोषणा

Karmala ITI
 
करमाळा : (Karmala ITI) सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नामांतर करून तिला ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ हे नाव देण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह-सरकार्यवाह स्व. मदनदास देवी यांच्या राष्ट्रसेवा, शिक्षण आणि विद्यार्थी घडविण्याच्या कार्याचा गौरव म्हणून हा नामकरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
 
कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार नारायण आबा पाटील, माजी आमदार राम सातपुते, करमाळा नगराध्यक्षा मोहिनी सावंत, रश्मी बागल, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक सतीश सूर्यवंशी, सहसंचालक चंद्रशेखर ढेकणे, सहआयुक्त संगीता खंदारे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी मनोज बिडकर, संस्था व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जितेंद्र राठी, स्व. मदनदास देवी यांचे ज्येष्ठ बंधू खुशालदास देवी व राधेश्याम देवी, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संदेश
 
कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शुभेच्छा संदेश चित्रफितीद्वारे दाखविण्यात आला. स्व.मदनदास देवी यांनी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभावना, शिक्षणाची ओढ आणि समाजसेवेची प्रेरणा जागविण्यासाठी केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या नावाने संस्थेचे नामकरण झाल्यामुळे भावी पिढ्यांना त्यांच्या विचारांची प्रेरणा मिळत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.(Karmala ITI)
 
मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या घोषणा
 
यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या आधुनिकीकरणासाठी पुढील पाच वर्षांत 5,400 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा केली. या माध्यमातून आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करून उद्योगांच्या गरजांनुसार कौशल्याधारित आणि नवयुगीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
करमाळा आयटीआयसाठी एका वर्षाच्या आत सहा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील, अशी घोषणाही त्यांनी केली. तसेच टाटा समूहाच्या सहकार्याने राज्यातील निवडक आयटीआयमध्ये आधुनिक तांत्रिक शाखा सुरू करण्याची योजना शासनाच्या विचाराधीन असून, त्या योजनेत करमाळा आयटीआयचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. पुढील सहा महिन्यांत राज्यातील आयटीआयमध्ये नव्या तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचाही मानस त्यांनी व्यक्त केला.(Karmala ITI)
 
ग्रामीण भागातील युवकांना दर्जेदार कौशल्य शिक्षण उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिकता असल्याचे सांगत त्यांनी कौशल्य विकास, तंत्रज्ञान आणि उद्योजकता यांच्या माध्यमातून युवकांना रोजगारक्षम तसेच रोजगारनिर्माते बनविण्यावर भर दिला. स्व. मदनदास देवी यांच्या कार्याचा उल्लेख करत विद्यार्थ्यांनी कौशल्य, चारित्र्य आणि राष्ट्रभावना यांचा समन्वय साधत समाजासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.(Karmala ITI)
 
सुनील आंबेकर यांचे मार्गदर्शन
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था या केवळ व्यवसाय शिक्षण देणाऱ्या संस्था न राहता संस्कार, चारित्र्य, राष्ट्रनिष्ठा आणि कौशल्य यांचा समन्वय साधणारी केंद्रे बनावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. स्व.मदनदास देवी यांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रकार्य आणि समाजकार्यासाठी समर्पित केले असून, त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी देशहिताची भावना जोपासावी, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी स्व.मदनदास देवी यांच्या कार्यातील काही आठवणींनाही उजाळा दिला.(Karmala ITI)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर