जलसंपदा तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्यावर मागील काही दिवसांपासूनच, कुंभमेळ्याच्या तयारीदरम्यान झालेल्या वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून विरोधक आणि काही सामाजिक संघटनांकडून सातत्याने ‘लाकूडतोड्या’ म्हणून टीका करून राळ उठवण्याचा प्रयत्न होत आहे. विकासकामांसाठी झालेल्या वृक्षतोडीबाबत पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त करत, राजकीय वातावरणही चांगलेच. त्यातूनच भाजप पर्यावरणविरोधी असल्याचा अजेंडा रेटण्याचा प्रयत्न झाला. मात्र, या सर्व टीकेला मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून कृतीतून उत्तर देण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. ‘उन्नत नाशिक अभियान’अंतर्गत, नाशिक शहरात तब्बल एक लाख झाडे लावण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अभियानासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घेतला असून, पर्यावरणसंवर्धनाला चालना देण्याचा, तसेच पर्यावरणपूरक हरित सिंहस्थ कुंभमेळा करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे.
केवळ झाडे लावणेच पुरेसे नसून, त्यांचे संगोपन आणि संवर्धनही तितकेच महत्त्वाचे आहे. हे लक्षात घेऊनच शहरातील प्रत्येक व्यक्ती आणि संघटनांना, लावण्यात येणारी झाडे दत्तक घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. यामुळे या अभियानात नागरिक, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था आणि स्थानिक प्रशासन यांचा सक्रिय सहभाग आवश्यक ठरणार आहे. राजकारणात टीका आणि आरोप हे अपरिहार्यच असतात. मात्र, त्यातून सकारात्मक काम उभे राहत असेल, तर त्याचे स्वागतही व्हायलाच हवे. कुंभमेळ्यासाठी झालेल्या वृक्षतोडीबाबत प्रश्न उपस्थित करणे योग्यच. पण, त्याचबरोबर त्याची भरपाई करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली जात असेल, तर त्या प्रयत्नांनाही प्रोत्साहन मिळणे तितकेच आवश्यक आहे. ‘उन्नत नाशिक अभियान’ हे केवळ वृक्षारोपणाचा कार्यक्रम न राहता, शहराच्या हरित भविष्यासाठीची लोकचळवळ झाली; तर नाशिक अधिक स्वच्छ, हिरवेगार आणि पर्यावरणपूरक शहर म्हणून ओळख निर्माण करू शकेल. म्हणून टीकेला सर्वांत प्रभावी उत्तर शब्दांनी नव्हे, तर कृतीतूनच दिले जात आहे. एक लाख झाडांचे हे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले आणि ती झाडे मोठी झाली, तर त्याचा लाभ पुढील अनेक पिढ्यांना मिळेल, यात कुणालाच शंका नसेल.
आशावादाची पेरणी
‘शेती हा व्यवसाय आतबट्ट्याचा झाला आहे’ ही भावना सध्या बळावत असून, अनेक होतकरू तरुणांनी शेतीला कायमची सोडचिठ्ठी देत नोकरीकडे मोर्चा वळवल्याची अनेक उदाहरणे दिसतात. हवामानातील अनिश्चितता, वाढता उत्पादन खर्च, बाजारपेठेतील चढ-उतार आणि नैसर्गिक संकटांमुळे ही नकारात्मकता वाढली आहे. मात्र, या परिस्थितीतही नावीन्यपूर्ण प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि बाजारपेठेच्या अभ्यासाच्या बळावर, सध्या अनेक शेतकरी यशस्वी शेती करत आहेत. अशाच प्रयोगशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देण्याचा उपक्रम, कृषी दिनानिमित्त नाशिकमध्ये करण्यात येत आहे. फुले आणि फळपिकांसाठी देशभर प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यात, अनेक शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरली. ठिबक सिंचन, सेंद्रिय शेती, संरक्षित शेती, पॉलीहाऊस, हवामानाधारित पीक व्यवस्थापन, मूल्यवर्धनसारख्या प्रयोगांमुळे, शेती अधिक किफायतशीर ठरली आहे. आज शेतकऱ्यांचा कृषी पर्यटन, प्रक्रिया उद्योग आणि निर्यातक्षम उत्पादनांवर भर असून, उत्पन्नाचे नवे मार्गही खुले केले आहेत.
हाच धागा पकडून कृषीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या शेतकरी, महिला व संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनातर्फे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये ‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न’ (तीन लाख), ‘वसंतराव नाईक कृषिभूषण’ (दोन लाख), ‘जिजामाता कृषिभूषण’ (दोन लाख), ‘सेंद्रिय शेती’ पुरस्कार (दोन लाख), ‘युवा शेतकरी’ पुरस्कार (एक लाख, 20 हजार) आणि ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी’ पुरस्कार (44 हजार) अशा विविध पुरस्काराचा समावेश आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव केल्याने त्यांच्या कार्याला योग्य सन्मान तर मिळेलच, शिवाय इतर शेतकऱ्यांनाही यातून प्रेरणा मिळेल. शेतीतील यश केवळ नशिबावर अवलंबून नसून नियोजन, तंत्रज्ञानाचा वापर आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांवरही अवलंबून असते, हा संदेशही यातून प्रभावीपणे पोहोचू शकतो. नाशिकसारख्या कृषिप्रधान जिल्ह्यात युवा पिढीला शेतीकडे आकर्षित करण्यासाठीची, ही आशावादी पेरणी निश्चितच लाभदायक ठरेल.