अल्पवयीनांना गुन्हेगारीत ढकलणाऱ्या टोळ्यांवर मोक्का; कायदा आणखी कठोर करण्यासाठी केंद्राकडे मागणी करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती
मुंबई : (MCOCA Action Against Gangs Using Minors) जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलांमधील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत गंभीर चर्चा झाली. जालना येथील आमदार अर्जुन खोतकर यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीकडे वळवणाऱ्या टोळ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला. अशा टोळ्या आढळून आल्यास त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, जानेवारी ते मे २०२६ या कालावधीत जालना जिल्ह्यात १७ खूनाच्या घटना घडल्या असून त्यापैकी ८ प्रकरणांमध्ये विधिसंघर्षित बालकांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. परतूर, अंबड आणि सिरसवाडी येथे अल्पवयीनांकडून कौटुंबिक वादातून खुनाचे गुन्हे घडल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. मात्र, या घटनांमध्ये गुन्हेगारी टोळ्यांनी अल्पवयीन मुलांचा 'सॉफ्ट टार्गेट' म्हणून वापर केल्याचे अद्याप निष्पन्न झालेले नसल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, १८ वर्षांखालील विधिसंघर्षित बालकांसाठी स्वतंत्र कायदेशीर तरतुदी असल्याने त्यांना कारागृहाऐवजी बालसुधारगृहात ठेवावे लागते. काही गुन्हेगारी टोळ्या याच कायद्याचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलांना पैशांचे आमिष दाखवून गुन्हेगारीकडे वळवत असल्याचे दिसून येत आहे.
"बालगुन्हेगारीच्या विद्यमान कायद्यात अशा व्यक्तींवर कारवाईची तरतूद आहे. मात्र, आजच्या परिस्थितीत हे कायदे अधिक कठोर करण्याची गरज आहे. जे लोक थेट किंवा अप्रत्यक्षपणे बालकांना गुन्हेगारीसाठी प्रवृत्त करतील किंवा त्यांना गुन्हेगारीत ओढतील, अशा टोळ्या आढळल्यास त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल," असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.(MCOCA Action Against Gangs Using Minors)
कायद्यात बदल करण्याचे अधिकार केंद्र सरकारकडे असल्याचे सांगत त्यांनी पुढे म्हटले की, खून, बलात्कार यांसारख्या अत्यंत गंभीर गुन्ह्यांमध्ये मानसिकदृष्ट्या सज्ञान असलेल्या १६ वर्षांवरील अल्पवयीनांना प्रौढ मानण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांच्या अनुषंगाने केंद्र सरकारकडे आवश्यक बदलांची मागणी करण्यात येईल.(MCOCA Action Against Gangs Using Minors)
दरम्यान, अल्पवयीनांमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी जालना पोलिसांकडून शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती, समुपदेशन, सायबर सुरक्षा आणि व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन केले जात आहे. 'पोलीस काका-दीदी' उपक्रमांतर्गत ८१ कार्यक्रम, तर जनजागृती व्हॅनद्वारे ६७ कार्यक्रम राबविण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत दिली.(MCOCA Action Against Gangs Using Minors)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.