'आरे'तील विहीरीत सापडले मगरीचे नवजात पिल्लू; कोणी सोडले की...

    28-Jun-2026   

Aarey Colony

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - आरे कॉलनीतील युनिट क्रमांक ३२ परिसरातील एका विहिरीमध्ये रविवार दि. २८ जून रोजी नवजात मगरीचे पिल्लू दिसून आले (Aarey Colony) . स्थानिक रहिवाशांनी ही माहिती वन्यजीव बचाव संघटनेला दिसल्यानंतर वन विभागाच्या मदतीने मगरीच्या पिल्लाला ताब्यात घेण्यात आले आणि नैसर्गिक अधिवासात तिची सुटका करण्यात आली (Aarey Colony). मात्र, विहीर हे मगरीचे नैसर्गिक अधिवास नाही (Aarey Colony) . त्यामुळे घटना चिंताजनक आणि संशयास जागा निर्माण करणारी ठरली आहे. (Aarey Colony)

 
 

आरेमधील विहिरीत मगर पडल्याची माहिती मिळताच वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशचे (डब्लूडब्लूए) प्रशिक्षित बचावकर्ते घटनास्थळी पोहोचले. आवश्यक ती सर्व सुरक्षा खबरदारी घेत त्यांनी विहिरीतून मगरीच्या पिल्लाला सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर या पिल्लाला वैद्यकीय तपासणीसाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल बांगार यांनी तपासणी केल्यानंतर हे २८ सेंटीमीटर लांबीचे मादी पिल्लू असल्याचे स्पष्ट केले. ते पूर्णपणे निरोगी असल्याचे आढळल्याने त्याला त्याच्या नैसर्गिक व सुरक्षित अधिवासात सोडण्यात आले.

 

आरे कॉलनीत गेल्या काही वर्षांत मगरी आढळण्याच्या घटना अधूनमधून समोर येत आहेत. मिठी नदी, पवई व विहार तलाव तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाशी जोडलेल्या जलप्रवाहांमुळे मगरींची हालचाल या परिसरात होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढल्याने लहान मगरी किंवा नवजात पिल्ले नाले किंवा पाणवठ्यांमध्ये भरकटून येण्याच्या घटना घडतात. अशा सर्व घटनांमध्ये वनविभाग आणि डब्लूडब्लूएच्या मदतीने मगरींचे सुरक्षित रेस्क्यू करून त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले जाते. मात्र, रविवारी विहीरीत आढळलेले मगरीचे पिल्लू हे कोणी सोडले का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आरेतील मगर रेस्क्यू घटना:

  • २०१७ – युनिट क्रमांक १५ परिसरातील नाल्यातून सुमारे ७ फूट लांबीची मगर पकडून सुरक्षितस्थळी हलविण्यात आली.
  • २०१९ – रॉयल पाम परिसराजवळील नाल्यात आलेल्या मगरीचे वन विभागाने रेस्क्यू केले.
  • २०२० – मुसळधार पावसानंतर आरेतील जलवाहिनीत दिसलेल्या मगरीला पकडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील योग्य अधिवासात सोडण्यात आले.
  • २०२१–२०२४ – पावसाळ्यात आरेतील विविध नाले, तलाव आणि वसाहतीलगत अनेक वेळा मगरी दिसल्याच्या घटना घडल्या. प्रत्येक वेळी वन विभाग, रेस्क्यू टीम आणि स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीने मगरींना सुरक्षितपणे पकडून योग्य अधिवासात स्थलांतरित करण्यात आले.




अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.

संबंधित मजकूर