मुंबई (Dawood Ibrahim stickers in Karnataka) : केरळच्या एका खासगी पर्यटक बसवर कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचे उदात्तीकरण करणारे स्टिकर्स आणि घोषवाक्ये लावण्यात आल्याचा प्रकार कर्नाटकातील चिक्कमंगळुरू जिल्ह्यात उघडकीस आला आहे. या घटनेमुळे हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले असून, सुरक्षेच्या मुद्द्यावरही चिंता व्यक्त केली जात आहे. या बसवर ‘दाऊद : राइज ऑफ डॉन’ आणि ‘एम्परर स्ट्राइक्स अगेन’ अशा प्रक्षोभक घोषणा लिहिलेल्या होत्या. या घोषणांमधून फरार अंडरवर्ल्ड डॉन आणि भारताने दहशतवादी घोषित केलेल्या दाऊद इब्राहिमचे नायकाप्रमाणे चित्रण करण्यात आले होते. (Dawood Ibrahim stickers in Karnataka)
चिक्कमंगळुरू शहरातील बोलारामेश्वर मंदिराजवळ ही बस आल्यानंतर हा प्रकार समोर आला. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांचे बसवरील स्टिकर्सकडे लक्ष गेले. त्यांनी बस अडवून चालक आणि क्लिनरला जाब विचारला. बसवर अशा घोषणा का लावण्यात आल्या आहेत, याबाबत त्यांची विचारपूस केली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बस आणि तिची कागदपत्रे तपासणीसाठी ताब्यात घेतली. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. (Dawood Ibrahim stickers in Karnataka)
या घटनेवर भाजप युवा मोर्चानेही टीका केली आहे. चिक्कमंगळुरूपर्यंत पोहोचेपर्यंत या बसने अनेक पोलीस तपासणी नाके पार केले असतील, तरीही तिच्यावरील आक्षेपार्ह मजकूर कोणाच्याही निदर्शनास कसा आला नाही, असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे. गुन्हेगार आणि देशविरोधी घटकांचे उदात्तीकरण करणारे संदेश सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करणे ही गंभीर बाब असल्याचे सांगत, भाजयुमोने संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अशा घटना पुन्हा घडल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. (Dawood Ibrahim stickers in Karnataka)
यापूर्वी सुमारे सहा महिन्यांपूर्वी म्हणजेच मार्च महिन्यातही कर्नाटकातील याच चिक्कमंगळुरू जिल्ह्यात अशाच प्रकारची घटना घडली होती. त्यावेळी तामिळनाडूतील कोईम्बतूर येथून आलेल्या एका खासगी पर्यटक बसवर दाऊद इब्राहिमच्या टोळीला समर्थन देणारे स्टिकर्स आणि मजकूर आढळला होता. यापूर्वीची घटना लक्षात आणून देत हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा केरळमधून आलेल्या बसवर अशा प्रकारचे संदेश कसे लावण्यात आले, असा प्रश्न उपस्थित केला आहे. एकाच जिल्ह्यात अशा घटना वारंवार घडत असल्याने सार्वजनिक स्तरावर चिंता व्यक्त होत असून, जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची अधिक कडक तपासणी करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, बसवरील स्टिकर्स कोणी लावले आणि त्यामागील नेमका उद्देश काय होता, याचा पोलीस तपास करत आहेत. (Dawood Ibrahim stickers in Karnataka)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक