मुंबई (BMC Online Engineer Transfers 2026) : बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) अभियंता संवर्गातील ६९५ अभियंत्यांच्या बदल्या यंदा पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने केल्या आहेत. यामध्ये १५२ कनिष्ठ अभियंता, ४४४ दुय्यम अभियंता आणि ९९ सहाय्यक अभियंत्यांचा समावेश आहे. महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मान्यतेने ही बदली प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, संबंधित अभियंत्यांचे बदली आदेशही जारी करण्यात आले आहेत.
महानगरपालिकेच्या अभियंत्यांना विविध विभागांमध्ये काम करण्याची समान संधी मिळावी आणि बदली प्रक्रियेत पारदर्शकता राखली जावी, या उद्देशाने ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. प्रशासकीय गरजा, रिक्त पदांची उपलब्धता, अभियंत्यांचे विनंती अर्ज, विभागांकडून आलेल्या शिफारशी तसेच पदोन्नती आणि पदस्थापनेशी संबंधित बाबींचा विचार करून या बदल्या करण्यात आल्या आहेत. (BMC Online Engineer Transfers 2026)
या बदली प्रक्रियेसाठी पात्र अभियंत्यांकडून ५ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. प्रत्येक अभियंत्याला आपल्या पसंतीची पाच ठिकाणे प्राधान्यक्रमाने निवडण्याची संधी देण्यात आली होती. यामध्ये स्थापत्य तसेच यांत्रिकी आणि विद्युत विभागांतील कनिष्ठ, दुय्यम आणि सहाय्यक अभियंत्यांचा समावेश आहे. ऑनलाइन प्रक्रियेमुळे बदली व्यवस्थेत सुसूत्रता निर्माण झाली असून, निर्णयप्रक्रिया अधिक वस्तुनिष्ठ आणि निष्पक्ष होण्यास मदत झाली आहे.
बीएमसीच्या २७ जानेवारी २०२१ रोजीच्या धोरणानुसार अभियंता संवर्गातील बदल्या दरवर्षी केल्या जातात. रम्यान, प्रमुख कार्यरत अभियंत्यांची आवश्यकता लक्षात घेण्याबरोबरच दुर्धर आजाराने ग्रस्त अभियंते, गर्भवती महिला, दिव्यांग कर्मचारी आणि सेवानिवृत्तीस एक वर्षाचा कालावधी शिल्लक असलेल्या अभियंत्यांच्या विनंतीचाही विचार केला जातो. (BMC Online Engineer Transfers 2026)
बदली प्रक्रियेचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्तांच्या मंजुरीने स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत उपआयुक्त (पायाभूत सुविधा) आणि उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) यांचा सदस्य म्हणून, तर नगर अभियंता यांचा सदस्य सचिव म्हणून समावेश आहे. या ऑनलाइन बदली प्रक्रियेमुळे अभियंत्यांना महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये काम करण्याचा अनुभव मिळणार आहे. (BMC Online Engineer Transfers 2026)
1. वरिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) – ९९
2. सहाय्यक अभियंता (यांत्रिकी व विद्युत) – ५५
3. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – १२०
4. कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) – ३१
5. सहाय्यक अभियंता (स्थापत्य) – ४४
6. वरिष्ठ अभियंता (स्थापत्य) – ३४५
एकूण – ६९४ अधिकारी
“मुंबई महापालिकेच्या इतिहासात प्रथमच अभियंत्यांसाठी ऑनलाइन बदली प्रणाली लागू होणे हा प्रशासकीय पारदर्शकतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या मागणीला दिलेला भक्कम पाठिंबा आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासह प्रशासनाने दाखविलेली सकारात्मक भूमिका यामुळे हा निर्णय प्रत्यक्षात आला आहे. भविष्यात महापालिकेतील इतर संवर्गांच्या बदल्यांसाठीही अशाच ऑनलाइन प्रणालीचा अवलंब व्हावा, ही अपेक्षा आहे.” - अनिल गलगली, माहिती अधिकार कार्यकर्ते (BMC Online Engineer Transfers 2026)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.