सोन्याच्या दीर्घकालीन चित्र मात्र भक्कम; मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या मौल्यवान धातूंवरील अहवालातील अंदाज

मौल्यवान धातूंबाबत सकारात्मक कल कायम; मध्यम कालावधीत सोने $4,500 ते $4,700 पर्यंत पोहोचण्याचा अंदाज

    05-Nov-2026

Gold Price Outlook 2026
 
मुंबई, (Gold Price Outlook 2026): मागच्या वर्षीच्या जबरदस्त तेजीनंतर 2026 मध्ये सोने आणि चांदीच्या बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेतील घडामोडी, अमेरिकेच्या व्याजदर धोरणाबाबत बदलत असलेले अंदाज आणि राजकीय पातळीवरील अनिश्चितता यामुळे भावावर मोठा परिणाम झाला आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ताज्या त्रैमासिक मौल्यवान धातू अहवालानुसार, सध्या अल्प काळासाठी काही आव्हाने दिसत असली तरी दीर्घकाळाचा विचार करता मौल्यवान धातूंची स्थिती भक्कम आणि आशादायी आहे. तसेच किमतींमध्ये होणारी घसरण ही गुंतवणूकदारांसाठी खरेदीची उत्तम संधी ठरू शकते.
 
'सोन्याची तेजी: केवळ लांबणीवर, थांबली नाही' या नावाच्या या अहवालात चालू वर्षात मौल्यवान धातूंमध्ये झालेल्या चढ-उतारांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. जानेवारी 2026 मध्ये सोन्याने प्रति औंस जवळपास $5,600 चा विक्रमी टप्पा गाठला होता. त्यानंतर मात्र भावात घसरण होऊन ते $4,000 च्या खाली आले आणि नंतर हळूहळू पुन्हा सावरले. दुसरीकडे, चांदीने प्रति औंस $100 चा टप्पा ओलांडला होता, पण त्यानंतर तिच्या भावात आणखी मोठी घसरण पाहायला मिळाली. जागतिक बाजारातील या हालचालींचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून आला, आणि त्यात डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात होणाऱ्या चढ-उतारामुळे सोन्या-चांदीचे भाव अधिकच हेलकावे खाताना दिसले.(Gold Price Outlook 2026)
 
2025 मध्ये बाजारात केवळ एकाच दिशेने सतत तेजी पाहायला मिळाली होती, पण 2026 मध्ये मात्र मौल्यवान धातूंमध्ये तीव्र चढ-उतार दिसून आले आहेत. अमेरिकेतील व्याजदरांबाबत बदलणारे अंदाज, सततची महागाई, सरकारी रोख्यांवरील वाढलेला परतावा आणि जागतिक पातळीवरील घडामोडी या कारणांमुळे हे मोठे फेरबदल झाले आहेत.
 
भारतात दिवाळी आणि धनत्रयोदशी हे सण सोन्या-चांदीच्या खरेदीसाठीचे सर्वात महत्त्वाचे प्रसंग मानले जातात. पारंपरिक खरेदीची सवय, लग्नसराईचा हंगाम आणि सोने-चांदीचे सांस्कृतिक महत्त्व यामुळे या दिवसांत मोठी मागणी असते. मात्र, जुने कल पाहिल्यास असे लक्षात येते की, या सणासुदीच्या मागणीचा थेट संबंध आंतरराष्ट्रीय किमतींपेक्षा देशांतर्गत प्रीमियम, आयात आणि प्रत्यक्ष बाजारातील खरेदीच्या प्रमाणाशी जास्त असतो.(Gold Price Outlook 2026)
 
दीर्घकाळाचा विचार केला तर देशांतर्गत बाजारात दिवाळीच्या काळातील सोन्याचे भाव 2016 मधील सुमारे ₹30,000 वरून 2026 मध्ये थेट जवळपास ₹1.50 लाख रुपयांवर पोहोचले आहेत. यावरून गेल्या एका दशकात सोन्याच्या मूल्यात झालेली प्रचंड वाढ दिसून येते. जुन्या आकडेवारीवरून हेही स्पष्ट होते की, दिवाळीनंतरच्या 30 दिवसांपेक्षा दिवाळीपूर्वीच्या 30 दिवसांमध्ये सोन्याने नेहमीच जास्त चांगला परतावा दिला आहे. हा कल 2025 मध्ये प्रामुख्याने जाणवला होता, जेव्हा सणापूर्वीच्या एका महिन्यातच सोन्यात जवळपास 20% आणि चांदीत सुमारे 38% इतकी मोठी वाढ नोंदवली गेली होती
 
भाव चढे असूनही गुंतवणुकीची मागणी मात्र बऱ्यापैकी भक्कम राहिली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर 2026 या काळात जागतिक गोल्ड ईटीएफमधील साठ्यात जवळपास 187 टनांची वाढ झाली, ज्यामुळे एकूण साठा 4,256 टनांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला; तर तिसऱ्या तिमाहीत ईटीएफमधील गुंतवणुकीने 31 अब्ज अमेरिकन डॉलरचा नवा उच्चांक गाठला. भारतातही सप्टेंबर 2026 मध्ये गोल्ड ईटीएफमधील मासिक गुंतवणूक 71% ने वाढून ₹44.5 अब्ज झाली, तर सिल्व्हर ईटीएफमध्ये ₹19.7 अब्ज रुपयांची गुंतवणूक झाली. दरम्यान, ऑगस्ट महिन्यातील 2.3 अब्ज अमेरिकन डॉलरच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये भारताची सोन्याची आयात कमी होऊन 1.8 अब्ज अमेरिकन डॉलरवर आली. वाढलेले भाव आणि सोन्याच्या अनिर्बंध आयातीला रोखण्यासाठी उचललेली पावले यामुळे आयातीत ही घट झाल्याचे दिसून येते.(Gold Price Outlook 2026)
 
मौल्यवान धातूंवर परिणाम करणाऱ्या घटकांवर भाष्य करताना मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे कमोडिटी संशोधन प्रमुख नवनीत दमानी म्हणाले:
 
"जागतिक अर्थव्यवस्था आणि राजकीय पातळीवरील अनिश्चिततेच्या काळात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचे महत्त्व आजही कायम आहे. पण नजीकच्या काळात सोन्याची वाटचाल कशी राहील, हे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे धोरण, महागाईची परिस्थिती, अमेरिकन डॉलरमधील चढ-उतार आणि सरकारी रोख्यांवरील प्रत्यक्ष परतावा यावर अवलंबून असेल. सप्टेंबरमध्ये अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 25 बेसिस पॉईंट्सची वाढ केल्यामुळे व्याजदर आता 3.75%–4.00% वर पोहोचले आहेत; यामुळे आर्थिक शिस्त अधिक कडक होण्याची चिंता वाढली आहे. त्याच वेळी, जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून सोन्याच्या साठ्यात होत असलेली वाढ, कायम राहिलेली गुंतवणुकीची मागणी आणि अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता यामुळे सोन्याच्या भावाला भक्कम आधार मिळत आहे. भारतात वाढलेल्या भावांमुळे दागिन्यांच्या हौशी खरेदीला काहीसा ब्रेक लागला असला, तरी लग्नसराईची खरेदी आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने होणारी मागणी मात्र अजूनही बऱ्यापैकी भक्कम आहे."(Gold Price Outlook 2026)
 
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे कमोडिटी विश्लेषक मानव मोदी पुढे म्हणाले:
 
"2026 मध्ये सोने आणि चांदी एका गुंतागुंतीच्या बाजारपेठेतून मार्ग काढत आहेत. एकीकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून मिळणारी मागणी आणि दुसरीकडे जागतिक अर्थव्यवस्थेतील अडचणी, या दोन्ही घटकांमुळे बाजारात मोठी अस्थिरता दिसून येत आहे. अमेरिकन सरकारी रोख्यांवरील वाढलेला परतावा आणि मजबूत डॉलरमुळे किमतींवर दबाव आला असला, तरी गुंतवणुकीची मूळ मागणी मात्र उत्साहवर्धक आहे. जागतिक गोल्ड ईटीएफमधील साठा विक्रमी पातळीवर गेला असून तिसऱ्या तिमाहीत यात मोठी गुंतवणूक झाली आहे. यावरून दिसून येते की, भावातील अलीकडच्या घसरणीनंतरही गुंतवणूकदारांचा सोन्यावरील विश्वास कायम आहे. दुसरीकडे, चांदीमध्ये भाववाढीची जास्त संधी असली, तरी तिच्या दरातील चढ-उतारही बरेच मोठे आहेत."
 
पुढील वाटचालीचा विचार करता, अमेरिकेतील रोख्यांवरील प्रत्यक्ष परतावा कोणत्या दिशेने जातो, यावर सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतील. वाढलेला परतावा आणि मजबूत डॉलरमुळे नजीकच्या काळात नफावसुली होऊन बाजारात चढ-उतार पाहायला मिळू शकतात; पण सततची महागाई, वित्तीय चिंता, राजकीय अनिश्चितता आणि जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून सोन्याच्या साठ्यात होणारी वाढ या गोष्टी मध्यम ते दीर्घ कालावधीत मौल्यवान धातूंना चांगला आधार देतील.(Gold Price Outlook 2026)
 
पुढील वाटचालीबाबत अंदाज व्यक्त करताना मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे कमोडिटी संशोधन प्रमुख नवनीत दमानी आणि कमोडिटी विश्लेषक मानव मोदी यांनी संयुक्तपणे सांगितले:
 
"नजीकच्या काळात चढ-उतार होण्याची शक्यता नाकारता येत नसली, तरी दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने मौल्यवान धातूंमधील संधी अजूनही भक्कम आहेत. सरकारी रोख्यांवरील प्रत्यक्ष परताव्यातील वाढ थांबेल तेव्हा सोन्यासाठी एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो; विशेषतः सततची महागाई, वित्तीय चिंता किंवा मंदावलेला आर्थिक विकास यामुळे व्याजदर धोरणाचा दृष्टिकोन बदलू लागल्यास हे पाहायला मिळू शकते. सोन्याचे भाव घसरल्यावर टप्प्याटप्प्याने खरेदी करण्याची आमची भूमिका कायम आहे. यात जागतिक बाजारात प्रति औंस $3,800– $3,900 ही पातळी खरेदीसाठी उत्तम असून अल्प मुदतीत $4,200 चे आणि मध्यम मुदतीत $4,500– $4,700 चे उद्दिष्ट समोर ठेवता येईल. देशांतर्गत बाजारात, डॉलरचा दर 96 रुपये गृहीत धरल्यास, ₹1,35,000 ही पातळी खरेदीसाठी अतिशय अनुकूल वाटते; ज्यामध्ये अल्प मुदतीचे उद्दिष्ट ₹1,48,000 तर मध्यम मुदतीचे उद्दिष्ट ₹1,60,000–₹1,68,000 असू शकते. चांदीमध्ये जास्त परतावा मिळवून देण्याची ताकद असली तरी गुंतवणूकदारांनी तिच्यातील तीव्र चढ-उतारांचे भान ठेवले पाहिजे. एकूणच, वाढत्या भावाच्या मागे धावण्यापेक्षा संपत्तीचे संरक्षण आणि गुंतवणुकीचे संतुलन साधण्यासाठी, भाव घसरतील तेव्हा शिस्तबद्ध रीतीने खरेदी करण्यावरच गुंतवणूकदारांनी भर दिला पाहिजे."(Gold Price Outlook 2026)
 
या सर्व पार्श्वभूमीवर, सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचे आकर्षण कायम आहे, तर चांदी अधिक नफ्याची संधी देत असली तरी तिच्यात चढ-उतारही बरेच जास्त आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती, व्याजदराबाबतचे अंदाज आणि राजकीय घडामोडींमुळे मौल्यवान धातूंच्या बाजाराला दिशा मिळत असल्याने, तात्पुरत्या तेजीच्या मागे न पळता भाव घसरल्यावर टप्प्याटप्प्याने खरेदी करण्याची रणनीती गुंतवणूकदार अवलंबू शकतात.(Gold Price Outlook 2026)
 




संबंधित मजकूर