मुंबई (Cristiano Ronaldo International Retirement) : जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. वयाच्या ४१व्या वर्षी गुरुवारी सोशल मीडियावर व्हिडिओ संदेश प्रसिद्ध करून त्याने हा निर्णय चाहत्यांना सांगितला. नोव्हेंबरमधील आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या विश्रांतीनंतर पोर्तुगालच्या राष्ट्रीय संघाची प्रतिष्ठित सात क्रमांकाची जर्सी परत करणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले. या घोषणेमुळे पोर्तुगालकडून दोन दशकांहून अधिक काळ गाजवलेल्या त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट होणार आहे.
रोनाल्डोचा आंतरराष्ट्रीय प्रवास २० ऑगस्ट २००३ रोजी कझाकस्तानविरुद्धच्या सामन्याने सुरू झाला. त्यावेळी तो अवघ्या १८ वर्षांचा होता. त्यानंतरच्या २३ वर्षांत त्याने पोर्तुगालकडून २३४ सामने खेळले आणि तब्बल १४६ गोल केले. पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक सामने आणि सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याने ४६ गोलसाहाय्यही केले आहे. गोलसाहाय्य म्हणजे गोल करणाऱ्या सहकारी खेळाडूला निर्णायक पास देणे. (Cristiano Ronaldo International Retirement)
रोनाल्डोच्या नेतृत्वाखाली पोर्तुगालने २०१६ मध्ये प्रथमच युरोपियन अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. त्यानंतर २०१९ आणि २०२५ मध्ये यूईएफए नेशन्स लीगचे विजेतेपदही पटकावले. सहा विश्वचषक स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा मानही त्याला मिळाला. (Cristiano Ronaldo International Retirement)
निवृत्तीची घोषणा करताना हा निर्णय सोपा नव्हता, असे रोनाल्डोने म्हटले. त्याच्या गोलमुळे एखाद्या चाहत्याच्या चेहऱ्यावर आनंद आला असेल किंवा देशाचा अभिमान वाटला असेल, तर तेच आपल्यासाठी मोठे समाधान असल्याची भावना त्याने व्यक्त केली. पोर्तुगाल हा कायम आपल्या हृदयात राहील, असेही त्याने सांगितले.
रोनाल्डोच्या या निर्णयामुळे पोर्तुगालच्या फुटबॉल इतिहासातील एका महत्त्वपूर्ण पर्वाची सांगता होत आहे. (Cristiano Ronaldo International Retirement)