नालासोपाऱ्यात शस्त्रधारी जमावाचा हैदोस; घरे, वाहने आणि मीटर बॉक्सची तोडफोड

स्थानिक रहिवाशांवर आली घर सोडून जाण्याची वेळ

    04-Nov-2026   
 
 
Nalasopara Vandalism Incident
 
मुंबई (Nalasopara Vandalism Incident) : नालासोपारा पूर्व येथील श्रीराम नगर परिसरात २ नोव्हेंबरच्या रात्री शस्त्रधारी जमावाने घुसून तोडफोड केल्याचा आणि नागरिकांना धमकावल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्लेखोरांनी जाताना पुन्हा परत येण्याची धमकी दिल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. त्यामुळे अनेक कुटुंबांनी घरांना कुलूप लावून नातेवाइकांकडे किंवा अन्य सुरक्षित ठिकाणी रात्र काढल्याचे निदर्शनास आले आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास ५० ते ६० जणांचा जमाव धारदार शस्त्रे घेऊन परिसरातील रहिवासी चाळींमध्ये घुसला. या जमावाने अनेक घरांचे दरवाजे, खिडक्यांच्या काचा आणि वीजमीटर बॉक्सची तोडफोड केली. काही ठिकाणी खुर्च्या आणि वाहनांचेही नुकसान करण्यात आले. सुमारे तासभर सुरू असलेल्या या धुडगुसामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. भीतीपोटी अनेक रहिवासी घरांमध्येच लपून बसले होते. ज्यांच्या घरांचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले, त्यांचा हल्लेखोरांशी कोणताही वाद नव्हता, तरीही त्यांच्या घरांना आणि वस्तूंना लक्ष्य करण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. (Nalasopara Vandalism Incident)
 
दि. १ नोव्हेंबर रोजी कुत्र्यावरून झालेल्या वादानंतर दोन गटांमध्ये मारहाण झाल्याचे सांगण्यात येते आहे. गल्लीमधून जाणाऱ्या एका व्यक्तीने तेथे बसलेल्या कुत्र्याला लाथ मारल्याचा आरोप आहे. यावरून कुत्र्याचा मालक आणि संबंधित व्यक्ती यांच्यात वाद झाला. पुढे या वादाचे रूपांतर शिवीगाळ आणि मारहाणीत झाले. या मारहाणीत परिसरातील काही अन्य लोकही सहभागी झाल्याचा स्थानिकांचा दावा आहे. या घटनेनंतर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. २ नोव्हेंबरच्या रात्री घडलेल्या तोडफोडीच्या घटनेचा संबंध याच वादाशी असल्याचे काही स्थानिकांचे म्हणणे आहे. (Nalasopara Vandalism Incident)
 
घटनेची माहिती मिळताच पेल्हार पोलीस, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि राखीव पोलीस दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी केली तसेच नुकसानग्रस्त कुटुंबांशी संवाद साधून त्यांना सुरक्षेचे आश्वासन दिले. या घटनेतील आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू असून त्यांच्या शोधासाठी विविध ठिकाणी छापे टाकले जात आहेत. घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा तसेच अन्य आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. तपासाच्या आधारे आरोपींची ओळख उघड करून पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. (Nalasopara Vandalism Incident)
 
श्रीराम नगर वासियांना सुरक्षा पुरवा
 
हल्लेखोर घरात घुसण्याचा प्रयत्न करत होते. लाईटच्या मीटरची त्यांनी तोडफोड केली. 'जो पण बाहेर दिसेल; त्यांना मारून टाकू' अशी धमकी ते देत होते. हा जमान कुठून आला काहीच कल्पना नाही. सर्व आरोपींवर लवकरात लवकर करवाई व्हावी आणि श्रीराम नगर वासियांना सुरक्षा पुरवावी अशी विनंती. - स्थानिक रहिवासी
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर