मुक्त क्रिया प्रतिपादी| सगुण भक्ती उच्छेदी|
स्वधर्म आणि साधन निंदी|
तो येक पढतमूर्ख ॥ (२.१०.४)
समर्थ रामदास स्वामींनी ‘दासबोधा’त सांगितलेले हे पढतमूर्खांचे लक्षण. हे ‘पढतमूर्ख’ नेमके कोण, तर आपल्या बुद्धिज्ञानाचा गर्व करून इतरांना मूर्खात काढणारे, लोकांमध्ये कायम दोष शोधणारे, स्वतःला विद्वान समजून जर कोणाचे गुण याला सांगितले, तर त्याच्यातील सदैव दोष पाहणारे, असे हे पढतमूर्ख! पण, आजच्या कलियुगात साक्षात देवांची उथळ शब्दांत तुलना करणार्यांना, चक्क देवातही दोष शोधणार्यांना समर्थांनी कोणत्या शब्दांत झोडपले असते, असा प्रश्न पडावा अशी घटना परवा घडली. बागेश्वरधामचे पं. धीरेंद्र शास्त्री यांनी त्यांच्या कीर्तनात राम-कृष्णाची तुलना करण्याचा अगोचरपणा दाखवला आणि मग टीकेची झोड उठताच सारवासारव करीत माफीनामाही सादर केला. परंतु, अशाप्रकारे कीर्तन-प्रवचनांतून ‘हिंदू धर्माचे जाणकार’ असल्याचा दावा करणारी मंडळीच, आपल्याच धर्मातील देव-देवतांचा असा जाहीर अनादर करणार असतील, तर अन्य धर्मियांच्या हाती आपणच आयते कोलित देत आहोत, एवढेही समज नसलेले हे समर्थ म्हणतात तसे ‘पढतमूर्ख’च!
ज्यांनी कुणी या शास्त्रींच्या कीर्तनातील वादग्रस्त टिप्पणी समाजमाध्यमांवरील व्हिडिओंमधून अद्याप ऐकली नसेल, त्यांच्यासाठी हे महाशय नेमके काय म्हणाले, त्याचा काही भाग इथे मुद्दामच जसाच्या तसा उद्धृत करावाच लागेल. कारण, त्याशिवाय शास्त्रींनी केलेल्या मुखभंगाची कल्पनाच येणार नाही. हे शास्त्री म्हणतात- "रामजी सीधे हैं-उनका नाम भी सीधा, चलना भी सीधा और दिखना भी सीधा हैं| इसके विपरीत भगवान कृष्ण तीन जगह से टेढ़े हैं (पांव के ऊपर पांव, कमर लचकाए, टेढ़ी गर्दन) और उनका नाम भी टेढ़ा हैं| बंसी बजाना तो खेल हैं, पर धनुष उठाना खेल नहीं| गाय चराना खेल हैं, बंदरों को नचाना खेल नहीं| तुम्हारे वाले ने पर्वत उठाया तो या बड़ी बात, हमारे भगवान के चेले हनुमान ने तो पूरा पर्वत ही उड़ा दिया| हमारा धाम अयोध्या सीधा, तुम्हारा वृंदावन टेढ़ा|” अशा अनाकलनीय टिप्पण्या करून हिंदू देवतांनाच दूषणे देणारे हे कुणीकडचे प्रवचन-कीर्तन?
चाहे कहो कृष्ण, चाहे कहो राम
मन में राम, तन में श्याम,
जीभ पे सदा रहे हरि का नाम|
चाहे कहो कृष्ण, चाहे कहो राम,
दोनों ही हैं प्रभू के प्यारे नाम॥
वरील भजनातील पंक्तींप्रमाणे शेकडो श्लोक, ओवी, अभंगांतून संतमहात्म्यांनी राम-कृष्णाचा अगाध महिमा वर्णिला आहे. कारण, मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीराम आणि भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीने पवित्र पावन झालेली ही पुण्य भारतभूमी. आपल्या महाराष्ट्रातही जयघोष केला जातो तो, ‘जय जय राम कृष्ण हरी’ असाच. मुखी रामही आहे आणि कृष्णही. दोन्ही साक्षात भगवान विष्णूचीच रूपे. एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणा हवे तर. प्रभू श्रीराम हे मर्यादांचे, आदर्शांचे प्रतीक; तर भगवान श्रीकृष्ण हे लीला, ज्ञान आणि व्यवहारचातुर्याचे प्रतीक! दोघांनीही वेगवेगळ्या युगांमध्ये पृथ्वीतलावर मनुष्यरूपी अवतार घेऊन समाजाला अंधकाराकडून प्रकाशाकडे नेले. त्यामुळे या दोघांमध्ये कुणी एक श्रेष्ठ, कुणी एक कनिष्ठ असा तसूभरही विचार मनाला स्पर्श करणे, हेच मुळी कोतेपणाचे लक्षण म्हणावे लागेल. अन्य धर्मियांकडून हिंदू देवी-देवतांच्या अपमानाचे प्रकार हे जितके संतापजनक, तितकीच राम-कृष्णाची असंबद्ध तुलनाही निंदास्पदच. मुळात हजारो अनुयायी जेव्हा कीर्तन-प्रवचन ऐकायला येतात, ते भक्तीसाठी, एका सकारात्मक ऊर्जेसाठी आणि जीवनाला अध्यात्मातून दिशादिग्दर्शन व्हावे म्हणून! ही कीर्तने खरं तर धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उत्थानाची माध्यमे. पण, जर अशा प्रवचनांमधून भाबड्या हिंदूंच्या मनात आपल्याच देवी-देवतांविषयी अयोग्य, आधारहीन गोष्टी पेरल्या जात असतील; तर त्याचा समाजमनावर काय परिणाम होईल, याचा क्षणभरही विचार या महाभागांना कसा शिवत नाही? अशा विधानांतून आपण हिंदूंचीच ‘रामभक्त विरुद्ध कृष्णभक्त’ अशी वाटणी करून एकमेकांसमोेर उभे करतोय, हेदेखील अशा लोकांना समजू नये, याचेच सखेद आश्चर्य वाटते. असो. त्यामुळे हिंदू बांधवांनीही अशी कीर्तन-प्रवचने ऐकताना, आपली सदसद्विवेकबुद्धी शाबूत ठेवावी एवढेच! कारण, राम हा भारताचा आत्मा, तर कृष्ण ही बुद्धी-चेतना! शेवटी ‘राम-कृष्ण’ हा भारतीय धर्मपरंपरेचा अद्वैताविष्कारच!