लंघन ते कर्षण : सीमारेषा कुठे आखायची?

    03-Nov-2026

Intermittent Fasting
 
सध्या घराघरांतून दरवळतोय तो चकली, लाडू, चिवडा असा दिवाळीच्या फराळाचा खमंग घमघमाट. त्यामुळे एरवी डाएट पाळणार्‍या मंडळीही दिवाळीत का होईना स्वत:ला थोडीशी सूट देतात. पण, काहीजण ‘डाएटिंग’ अर्थात लंघनाच्या जरा जास्तच आहारी गेलेलेही दिसतात. त्यामुळे लंघनाची मर्यादा ओळखणेही तितकेच महत्त्वाचे. हल्लीच्या ’खपींशीाळीींंशपीं ऋरीींळपस’च्या वाढत्या प्रवाहाच्या पार्श्वभूमीवर आयुर्वेदाचा संतुलित संदेश देणारा हा लेख...
 
आजच्या काळात 'Intermittent Fasting (IF)' हा आरोग्य, वजन नियंत्रण आणि 'metabolic health' यासाठी लोकप्रिय झालेला आहारप्रकार. ’१४:१०’, ’१६:८’, ’१८:६’, ’२०:४’ अशा विविध फास्टिंग पद्धतींचा प्रसार होत आहे. उपवासामुळे वजन कमी होते, भूक नियंत्रणात येते, चयापचय सुधारतो इत्यादी कारणांनी अनेकजण त्याकडे आकर्षित होत आहेत.
 
मुळात ‘उपवास’ किंवा ‘लंघन’ ही संकल्पना आयुर्वेदासाठी नवीन नाही. उलट, ‘लंघन’ ही आयुर्वेदातील एक महत्त्वाची चिकित्सा आहे. परंतु, आयुर्वेदाचा संदेश केवळ ‘लंघन करा,’ एवढाच नसून त्यासोबत अत्यंत महत्त्वाचे प्रश्न येतात.
 
लंघन किती करायचे?
 
त्याचा योग्य परिणाम कधी झाला, हे कसे ओळखायचे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, लंघन कुठे थांबवायचे? याच ठिकाणी चरकाचार्यांचे आणि अष्टांगहृद्यकार वाग्भटाचार्यांचे विचार आजच्या ’खपींशीाळीींंशपीं ऋरीींळपस’च्यासंदर्भात विशेष महत्त्वाचे ठरतात.
 
लंघन म्हणजे शरीराला उपाशी ठेवणे, एवढेच नाही. आयुर्वेदात लंघनाचा व्यापक उद्देश गुरुत्व कमी करणे, दोषांचे पाचन/शमन करणे आणि शरीराला लघु करणे, हा आहे. चरकाचार्य म्हणतात,
 
लङ्घनेन क्षयं नीते दोषे
सन्धुक्षितेऽनले| विज्वरत्वं
लघुत्वं च क्षुच्चैवास्योपजायते॥
 
याचा चिकित्साशास्त्रीय अर्थ असा लावता येतो की, योग्य प्रकारे लंघन केल्याने दोषांचे प्रमाण कमी होते, अग्नी योग्य प्रकारे प्रदीप्त होतो आणि त्यानंतर लघुत्व, आरोग्य, भूक इत्यादी सकारात्मक लक्षणे निर्माण होतात. म्हणजेच, लंघनाचा उद्देश कमी खात राहणे नसून, आवश्यक तेवढे कमी करून योग्य शारीरिक अवस्था प्राप्त करणे, हा आहे. सम्यक् लंघनाची लक्षणे - शरीर स्वतः सांगते की, आता पुरे झाले. चरकसंहितेतील लंघनबृंहणीय अध्यायात सम्यक् लंघनाची लक्षणे अत्यंत सूक्ष्मपणे सांगितली आहेत.
योग्य लंघनानंतर - वात, मूत्र आणि पुरीष यांचे योग्य विसर्जन होते. शरीरात लाघव जाणवते. हृदय, कंठ आणि मुख यांची प्रसन्नता/स्वच्छता जाणवते. उद्गार (ढेकर) व्यवस्थित होतात. तंद्रा व ग्लानी कमी होते. स्वेदप्रवृत्ती होते. रुची निर्माण होते. क्षुधा व तृष्णा पूर्ववत होतात. शरीर व मनात स्वस्थता जाणवते. हे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण, येथे आयुर्वेद आता आणखी उपवास करा, असे सांगत नाही. उलट, शरीरातील अपेक्षित बदल प्राप्त झाल्यानंतर लंघनाची चिकित्सा पूर्ण झाल्याचे संकेत मिळतात. म्हणूनच लंघनात जसे 'START BUTTON' आहे, तसे 'STOP BUTTON' असते व तेच जास्त महत्त्वाचे असते.
 
उपवास सुरू करणे, ही पहिली पायरी आहे. परंतु शरीराने - लाघव + रुची + क्षुधा + तृष्णा + प्रसन्नता + कार्यक्षमता हे संकेत दिल्यानंतरही केवळ आता वजन आणखी कमी करायचे आहे, म्हणून लंघन चालू ठेवणे योग्य नाही. कारण, त्यानंतर लंघनाचे रूप कर्षणात बदलण्याची शयता असते. अतिलंघनाने चिकित्सा उलट दिशेने जाऊ लागते. चरकाचार्यांनी अतिलंघनाचे परिणामही स्पष्टपणे सांगितले आहेत.
 
पर्वभेदोऽङ्गमर्दश्च कासः
शोषो मुखस्य च|
क्षुत्प्रणाशोऽरुचिस्तृष्णा
दौर्बल्यं श्रोत्रनेत्रयोः॥
 
आणि पुढे -
मनसः सम्मोहोऽभीक्ष्णमूर्ध्ववातस्तमो हृदि| देहाग्निबलनाशश्च
लङ्घनेऽतिकृते भवेत्॥
 
अर्थात, अति लंघन केल्यास, सांधेदुखी, अंगमर्द, कास, शरीरातील रूक्षता/शोष, मुखशोष, क्षुधानाश, अरुची, अतितृष्णा, दुर्बलता, श्रवण व दृष्टीतील दुर्बलता, मानसिक भ्रम/अस्वस्थता, ऊर्ध्ववात, शरीराग्नीची हानी, बलाची हानी असे परिणाम होऊ शकतात. यातील शेवटचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, ‘देहाग्निबलनाशश्च.’ लंघनाचा हेतू अग्नी आणि बल वाढविणे/सुधारणे असताना, अतिलंघनामुळे अग्नी आणि बलच कमी झाले, तर ते लंघन राहत नाही; ते अति-कर्षणाच्या दिशेने गेले, असे म्हणावे लागेल. दोषपाकापर्यंत लंघन त्यापुढे नाही. येथे आयुर्वेदातील एक सूक्ष्म चिकित्सा सिद्धांत लक्षात घ्यावा लागतो. लंघनाचा प्रारंभ केल्यानंतर त्याचा उद्देश दोषांचे पाचन/शमन हा आहे. जेव्हा अपेक्षित दोषपाक होतो आणि सम्यक् लंघनाची लक्षणे दिसू लागतात, तेव्हा लंघनाची आवश्यकता संपत आली आहे, असे चिकित्सकाने ओळखणे आवश्यक आहे. त्या अवस्थेनंतरही लंघन चालू ठेवले, तर शरीरातील अनावश्यक घटकांबरोबर धातूंच्या पोषणावर परिणाम होण्याची शयता निर्माण होते. म्हणून चिकित्सेचा सिद्धांत असा मांडता येईल, दोषपाक होईपर्यंत लंघन; दोषपाक झाल्यावर लंघनाची मात्रा कमी/थांबवून योग्य पोषणाकडे वळणे, अन्यथा, दोषपाक - धातुपाक या दिशेने शरीराची अवस्था जाऊ शकते. अर्थात, धातुपाक हा येथे आयुर्वेदीय चिकित्साविचारातील परिणाम आहे; तो आधुनिक वैद्यकीय भाषेतील एखाद्या एकाच जैवरासायनिक प्रक्रियेचा समानार्थी शब्द नाही.
 
कर्षणापेक्षा बृंहण सुरक्षित हा चरकाचार्यांचा अत्यंत महत्त्वाचा इशारा आहे. हिक्काश्वासचिकित्सेतील चरकाचार्यांचे वचन विशेष लक्षात घेण्यासारखे आहे,
 
सर्वेषां बृहणे ह्यल्पः
शयश्च प्रायशो भवेत्|
नात्यर्थं शमनेऽपायो
भूयोऽशयश्च कर्षणे॥
 
याचा मूलभूत संदेश असा आहे की, अति कर्षणाचे उपद्रव झाले, तर ते हाताळणे तुलनेने कठीण ठरू शकते; बृंहणामुळे होणारे उपद्रव तुलनेने अल्प व व्यवस्थापनीय असतात. याचा अर्थ बृंहण नेहमी करा आणि लंघन करू नका, असा अजिबात नाही, तर अर्थ असा, जेवढे आवश्यक तेवढेच कमी करा; त्यापुढे शरीराला पोषणाची गरज असते. हीच चिकित्सेतील मात्रा आणि मर्यादा आहे. स्थूल व्यक्तीला कर्षण योग्य, पण कर्षणाचीही मर्यादा आहे.
 
अष्टांगहृदयातील वचन
न हि स्थूलस्य भैषज्यम्|
बृंहणं लंघनं वा तद्
बलमति मेदोऽनिलवातजित्॥
 
आणि पुढे
काश्र्यमेव वरं स्थौल्यात्
 
स्थौल्यामध्ये बृंहण हा उपाय नसून योग्य परिस्थितीत लंघन/कर्षणाचा विचार करावा, हे येथे स्पष्ट होते. परंतु, याचा अर्थ ‘स्थूल आहे म्हणजे जितके शय तितके उपाशी ठेवा,’ असा नाही. स्थौल्य कमी करणे आणि व्यक्तीला कृश/दुर्बल करणे, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. चरकाचार्यांचा विचार आपल्याला याच सीमारेषेची जाणीव करून देतो. 'Intermittent Fasting' मध्ये हीच चूक होऊ शकते. समजा, एखाद्या व्यक्तीने ’१६:८’ 'IF' सुरू केले. त्याला फायदा झाला. वजन कमी झाले, लाघव जाणवले, भूक व्यवस्थित लागली, ऊर्जा चांगली राहिली, व्यायामक्षमता टिकली, तर त्याने आपली पद्धत सुरू ठेवणे, ही एक बाब आहे. परंतु दुसर्‍या व्यक्तीला सतत थकवा, चक्कर, अरुची, झोपेचा त्रास, व्यायामक्षमता कमी होणे, स्नायूंची घट, अतिरूक्षता, अशक्तपणा जाणवू लागला आणि तरीही १६ तास झाले, आता १८ तास करूया; त्याने आणखी वजन कमी होईल, असे करणे म्हणजे चिकित्सेच्या उद्दिष्टापेक्षा पद्धतीला महत्त्व देणे होईल. लंघन व्यक्तिसापेक्ष असलेच पाहिजे, हा कदाचित या चर्चेतील सर्वांत महत्त्वाचा मुद्दा. एकच उपवास सर्व व्यक्तींना लागू होऊ शकत नाही. लंघनाची आवश्यकता, तीव्रता आणि कालावधी ठरवताना प्रकृती, वय, बल, अग्निबल, शरीररचना, स्थौल्याची तीव्रता, धातूंची अवस्था, व्यायाम, दैनंदिन श्रम, झोप, मानसिक अवस्था, विद्यमान रोग, औषधे, आधीपासून असलेली दुर्बलता यांचा विचार करावा लागतो. म्हणून ’१६:८’ सर्वांसाठी हा आयुर्वेदीय विचार नाही. काही व्यक्तींना कमी कालावधीचे लंघन पुरेसे असू शकते, काहींना त्याची गरजही नसू शकते, तर काही विशिष्ट परिस्थितींमध्ये वैद्यकीय सल्ल्याशिवाय लंघन करणे अयोग्य ठरू शकते.
 
शेवटी, वजनकाट्यापेक्षा शरीराची लक्षणे महत्त्वाची. आज वजन कमी होणे, हाच यशाचा प्रमुख मापदंड दिसतो. परंतु, आयुर्वेदाचा प्रश्न अधिक व्यापक आहे. वजन कमी झाले, पण नक्की काय कमी झाले? मेद कमी झाला का? की त्याबरोबर मांस/स्नायू, बल, अग्नी, ऊर्जा, कार्यक्षमता यांचाही र्‍हास झाला? म्हणून, 'Weight loss' आणि 'Health gain' हे समानार्थी शब्द नाहीत. आरोग्याच्या दृष्टीने शरीर हलके होणे चांगले; पण शरीर दुर्बल होणे चांगले नाही. आज ’खऋ’ कडे पाहताना दोन टोकांची भूमिका टाळणे आवश्यक आहे.
 
पहिले टोक : उपवास वाईट आहे; कधीही करू नये.
दुसरे टोक : उपवास जितका जास्त तितका फायदा जास्त.
आयुर्वेद या दोन्ही टोकांपासून दूर राहतो.
तो सांगतो, दोष अधिक असतील - लंघन करा.
दोषपाक होऊन सम्यक् लंघनाची लक्षणे आली - थांबा!
बल व धातूंची गरज असेल - बृंहण करा.
 
अति लंघनाची लक्षणे दिसली - कर्षण थांबवा आणि योग्य पुनर्पोषणाचा विचार करा. ही 'Dynamic Individualised Therapy' आहे. लंघनाचा खरा उद्देश किती कमी करायचे नव्हे, तर कुठे थांबायचे हा आहे.
 
आयुर्वेदाच्या या विचारातून 'Intermittent Fasting' चा विचार करताना हे लक्षात येते की, लंघन हे साधन आहे, अंतिम ध्येय नाही. उपवासामुळे जर शरीरातील अनावश्यक गुरुत्व कमी झाले, दोषपाक झाला, अग्नी योग्य झाला, लाघव आले, रुची व क्षुधा परत आली आणि बल टिकले, तर उद्दिष्ट साध्य होत आहे. पण, त्याच अवस्थेनंतरही आणखी कमी, आणखी उपवास, आणखी वजनकपात या विचाराने पुढे जात राहिलो, तर कर्षणाची दिशा बदलू शकते आणि तेथेच चरकाचार्यांचा इशारा लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
 नात्यर्थं... कर्शने - कर्षण अति करू नये.
 
आज 'Intermittent Fasting'चे जे आकर्षण निर्माण झाले आहे, त्यात आयुर्वेद उपवासाच्या विरोधात उभा राहत नाही; तो आपल्याला उपवासाच्या मर्यादेची जाणीव करून देतो. चरकाचार्यांच्या लंघनविषयक विचारात एक अत्यंत वैज्ञानिक चिकित्साबुद्धी दिसते, लंघन करा - परिणाम पाहा - दोषपाक ओळखा - सम्यक् लंघनाची लक्षणे पाहा - योग्य वेळी थांबा - आवश्यकतेनुसार बृंहण करा.
 
कारण, लंघनाचा फायदा किती काळ उपाशी राहिलो यात नसून, योग्य परिणाम मिळाल्यावर योग्य वेळी थांबलो यात आहे आणि म्हणूनच, उपवास सर्वांसाठी एकसारखा असू शकत नाही. लंघन व्यक्तिसापेक्ष असले पाहिजे. लंघनाची मात्रा रोग, दोष, अग्नी, बल आणि धातू यांचा विचार करून ठरली पाहिजे. दोषपाक झाल्यावर लंघनाची गरज संपते; त्यापुढील अति-कर्षण धातुपोषणाला बाधक ठरू शकते. त्यामुळे ‘किती लंघन’ या प्रश्नाइतकाच, किंबहुना त्याहून अधिक महत्त्वाचा प्रश्न आहे, ‘कुठे थांबावे’ आयुर्वेदाचा संदेश स्पष्ट आहे. दोष कमी करण्यासाठी लंघन करा; धातू कमी करण्यासाठी नाही.
 
(लेखक कायचिकित्सा विभाग आयुर्वेद महाविद्यालय, शीव, मुंबई येथे सहयोगी प्राध्यापक आहेत.)
(लेख ‘आरोग्य भारती’द्वारे प्रकाशित)
 
लेखक- डॉ. हेमंत पराडकर
 




संबंधित मजकूर