श्रीकांत पावगी : सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ता ते उत्कृष्ट प्रशासक!

    29-Nov-2026

Shrikant Pawgi 
 
‘महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी’ हे बिरुद मिरवणार्‍या डोंबिवली शहराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंडळींतील ज्येष्ठ सदस्य, ‘टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळा’चे माजी कार्याध्यक्ष, संगीत आणि नाट्यप्रेमी श्रीकांत पावगी यांचे दि. १७ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा लेख...
 
एखाद्या गावाचे चारित्र्य किंवा स्वभाव असतो. गावकर्‍यांची सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि बौद्धिक परिस्थिती व त्यांच्यातील नातेसंबंध असे सगळे घटक ते चारित्र्य घडवत असतात. ते चारित्र्य घडवण्यासाठी प्रत्येक शहरात समाजाला दिशा देणारी काही मंडळी असतात. डोंबिवली शहराचा ‘एक टुमदार गाव ते विस्तीर्ण शहर’ या प्रवासात अजूनही डोंबिवलीतील बर्‍याच ठिकाणी सुसंस्कृत-सुशिक्षित मध्यमवर्गीयांचे गावपण आजही टिकून आहे. त्याचे कारण ठरणार्‍या मंडळींचा समूह समाजात ठिकठिकाणी कार्यरत असतो. त्या दिशादर्शक मंडळींच्या सभोवताली निःस्वार्थी आणि निरलसपणे काम करणार्‍या कार्यकर्त्यांचा समूह असतो. दिशादर्शक मंडळींचे कार्य पुढे नेण्यासाठी असे कार्यकर्ते आवश्यक असतात. डोंबिवलीच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंडळींतील एक श्रीकांत पावगी!
 
सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात राहून, सभोवताली असलेल्या जाणत्या मंडळींच्या संस्कारांतून, व्यक्तिगत विकास साधण्यासाठी धडपड सुरू असताना, सोबत समाजातील नाट्य, साहित्य, राजकारण, पत्रकारिता, बँकिंग, संगीत आणि शिक्षण अशा विविध सांस्कृतिक क्षेत्रांत गेली सहा दशकांहून अधिक काळ मुशाफिरी करणारे एक डोंबिवलीकर म्हणजे श्रीकांत पावगी!
 
सतत सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहण्याची ओढ, अफाट स्मरणशक्ती, गेल्या काही दशकांत घडलेल्या कोणत्याही घटनेबद्दल तारीख-वार यांच्यासह तपशीलवार माहिती तोंडपाठ, ही वैशिष्ट्ये आणि डोंबिवली शहराच्या गाव ते शहर या प्रवासाचे महत्त्वाचे साक्षीदार म्हणून श्रीकांत पावगी यांचे नाव घ्यावे लागेल.
 
दौंड येथे जन्म आणि बालपणीची मोजकी वर्षे इगतपुरी येथे व्यतित झाल्यावर, रेल्वेत नोकरी करणार्‍या त्यांच्या वडिलांनी कुटुंब डोंबिवलीत स्थिरस्थावर करण्याचे ठरविले आणि पावगी कुटुंब १९५७ मध्ये डोंबिवलीत दाखल झाले.
 
जोशी हायस्कूल ही शाळा, दातार वाड्यातील घर आणि दातार वाड्याच्या समोर असलेले डोंबिवलीचे ग्रामदैवत श्रीगणेश मंदिर; यांच्या सान्निध्यात बालपणी सुसंस्कृतपणाचे आणि सामाजिक क्षेत्रात वावरण्याचे आणि मुख्य म्हणजे नैतिकतेचे संस्कार कळत-नकळत, गुणिजनांच्या सहवासात होत गेले.
 
त्याकाळात वाडा-संस्कृती सर्वदूर आपापल्या वैशिष्ट्यांसह नटली होती आणि डोंबिवलीतील दातार वाडा आणि गणेश मंदिर हे दोन्ही डोंबिवलीतील महत्त्वाच्या घडामोडींचे केंद्र असायचे. वाड्याच्या सान्निध्यात व्यक्तिमत्त्व घडले आणि गणेश मंदिराच्या सान्निध्यात श्रीकांत पावगी यांच्यातील कार्यकर्ता घडत गेला.
 
महाविद्यालयीन जीवनात युवक संघाच्या माध्यमातून साहित्य, नाट्य क्षेत्रातील मुशाफिरी सुरू झाली. तो क्षेत्रविस्तार शैक्षणिक क्षेत्रातील कार्यापर्यंत होत राहिला.
 
‘बँक ऑफ इंडिया’मध्ये नोकरी करत, तिथल्याही कारकिर्दीत यशस्वी होता-होता विविध पद्धतीने शाबासकीची थाप मिळत राहिली, ती त्यांच्या सहृदय; पण उत्कृष्ट प्रशासकीय कौशल्यांसाठीच. शिक्षण सुरू असताना सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत, नोकरी करत असताना, उच्चशिक्षण घेत सामाजिक क्षेत्रात कार्यरत, अशी बहुआयामी वाटचाल सुरू राहण्यासाठी आवश्यक असते, ती शक्ती आणि इच्छाशक्ती. कुटुंबवत्सल, धार्मिक आणि श्रद्धाळू वृत्तीची ही व्यक्ती घरात रमण्यापेक्षा डोंबिवलीत जास्त रमते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
 
‘बँक ऑफ इंडिया’मधील नोकरीच्या सुरुवातीच्या काळात लेखापरीक्षण विभागात काम करताना भारतात आणि त्यानंतर काही दिवस इंग्लंडमध्ये झालेली भ्रमंती, बँकेची आपल्या कर्मभूमीत शाखा स्थापन करण्यात महत्त्वाचा हातभार, त्याच शाखेत काही वर्षे व्यवस्थापक पदावर केलेले काम, या सर्व काळात जोडलेली, अनुभवलेली माणसे आणि त्यांच्या साथीला व्यावसायिकता आणि सामाजिक कार्य यांची जोडलेली निःस्वार्थी मोट विलक्षण आहे. बँकेत काम करताना बाळगलेल्या निःस्वार्थी, प्रामाणिक, सचोटीपूर्ण उच्च दर्जाच्या व्यावसायिकतेवर, त्यानंतर बँकेच्या संपदा विभागात झालेल्या नेमणुकीने जणू मोहोर उमटवली! त्यानंतर सरत्या शतकाच्या अखेरीस झालेल्या बढती आणि बदलीमुळे बडोदा आणि चंदीगढ येथे झालेल्या वास्तव्यादरम्यान श्रीकांत पावगी यांनी कौटुंबिक आणि व्यक्तिगत जबाबदारी पार पाडताना वियोग सहन केला, तो मात्र डोंबिवलीचा!
 
एकसष्टीचा समारंभ जाहीर स्वरूपात संस्मरणीय साजरा झाला. त्या समारंभात विविध क्षेत्रांतील दिग्गज आपल्या या निकटच्या मित्राच्या कौतुकासाठी आवर्जून उपस्थित होते.
 
या सर्व घडामोडींत या कुटुंबवत्सल व्यक्तीचे कुटुंब त्यांची पत्नी शुभदा पावगी यांनी कर्तव्यतत्परतेने सांभाळले. सहाजणांच्या कुटुंबातील कडू-गोड प्रसंग साजरे करणे, अवचित येणार्‍या आगंतुकांचे सुहास्य वदनाने आदरातिथ्य करणे आदी गृहकृत्ये नियमित सांभाळत, स्वतःचा सांगीतिक उत्कर्ष साधला आणि स्वतःला शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील अभ्यासू जाणकार म्हणून सिद्ध केले.
 
आयुष्यातील उमेदीच्या सर्वोच्च काळात या दाम्पत्याने आपापल्या क्षेत्रात आणि जोडीने केलेली मुशाफिरी विस्मयकारक आहे. ती मुशाफिरी ही एक आनंदयात्रा आहे, कोणत्याही स्वरूपात लाभार्थी न होता. एकमेकांच्या साथीने आणि एकमेकांच्या क्षमता विस्तारण्यास वाव देत जोडलेली माणसे आणि संस्था यांच्या नुसत्या आठवणीदेखील नवीन पिढीला अचंबित करून टाकत असत.
डोंबिवली शहरातील अनेक प्रथितयश संस्थांच्या स्थापनेसाठी आणि विकासासाठी आवश्यक असणार्‍या निरपेक्ष कार्यकर्त्यांसाठी श्रीकांत पावगी हे एक आदर्श उदाहरण नक्की ठरावे.
 
दिशादर्शक ठरणारी मंडळी काळानुरूप अस्तंगत होताना, श्रीकांत पावगी यांचा शेवटपर्यंत सुरू असलेला अत्यंत व्यस्त दिनक्रम सामाजिक क्षेत्रात येत असलेल्या नवीन पिढीसाठी मार्गदर्शक ठरत असे. पाच दशकांहून जास्त सामाजिक क्षेत्राचा अनुभव, व्यावसायिक कारणास्तव काळानुरूप बदलांचा स्वीकार आणि मुख्य म्हणजे कोणत्याही संस्थेच्या जडणघडणीत आवश्यक तपशिलांचे संपूर्ण ज्ञान आणि प्रचंड ऊर्जा, यामुळे उगवत्या सामाजिक पिढ्यांसाठी पावगीकाका एक मित्र आणि मार्गदर्शक झाले होते. निरलस, निःस्वार्थी कार्यकर्ता हा मूळ स्थायीभाव आणि अंगभूत, ज्येष्ठ-श्रेष्ठ सहकार्‍यांच्या सहवासातून विकसित झालेले उत्कृष्ट प्रशासकीय कौशल्य ही त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये होती.
 
गणेश मंदिर, ‘युवक संघ’ ते ‘टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ’पर्यंत ‘शिवानंद स्वामी प्रतिष्ठान’मार्फत झालेला श्रीकांत पावगी यांचा सामाजिक प्रवास ‘बँक ऑफ इंडिया’, ‘ठाणे भारत सहकारी बँक’ यांतील व्यावसायिक कारकिर्दीच्या जोडीने सुरू राहिला. लौकिकार्थाने निवृत्तीचा काळ कोणत्याही बाबतीत मनाने निवृत्ती न घेता, तेवढ्याच ताकदीने आणि उमेदीने सुरू राहिला. कारण, त्याला लौकिक व्यक्तिगत यशापेक्षा वेगळ्याच उन्नतीची आणि सुसंस्कृत व्यक्तींच्या सहवासात राहण्याची ओढ होती. सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंडळींची ओढ आणि कोणत्याही वयाच्या मंडळींसोबत सहज संवाद साधण्याची हातोटी, यांमुळे ‘श्रीकांत’ किंवा ‘पावगीसाहेब’ किंवा ‘पावगीकाका’ यांपैकी कोणत्याही नात्याने त्यांच्याकडे बघणारी व्यक्ती श्रीकांत पावगी यांच्यासोबत सहज आणि मनमोकळा संवाद साधू शकत असे. आपल्याकडे आलेल्या व्यक्तीला नेमके काय हवे आहे, हे चटकन ओळखून ते मिळवून देण्यासाठी ध्यास घेणे, हे त्यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होते.
 
अनेक संस्था आणि असंख्य व्यक्तींच्या सान्निध्यात ते शेवटपर्यंत होते. आपापल्या क्षेत्रात उच्च दर्जाची आणि उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या अनेक गुणिजनांचे कौतुक करत प्रोत्साहन देत असायचे. लौकिकार्थाने तशा कोणत्याही सन्मानाची स्वतःसाठी अभिलाषा न बाळगता, त्यांनी आजवर केलेला प्रवास त्यांच्यासाठी अचाट आणि अलौकिक आनंददायी आहे. या सर्वांचा तपशील त्यांच्या बोलण्यातून कित्येकदा उलगडत असे. डोंबिवली आणि एकंदरीत सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्राचा एक चालता-बोलता इतिहास श्रीकांत पावगी होते.
 
ध्येयपूर्तीसाठी कर्तव्यतत्परतेने अविरत कार्यरत राहणार्‍या शिस्तप्रिय, उमद्या मनाच्या, रुबाबदार, प्रसन्न आणि निर्लोभी, विनम्र, श्रद्धाळू व्यक्तिमत्त्वाचे श्रीकांत पावगी हे असंख्य व्यक्ती आणि संस्था यांच्यासाठी ऊर्जेचा स्रोत होते. माजी खासदार रामभाऊ म्हाळगी आणि प्रा. राम कापसे, डोंबिवलीच्या सामाजिक क्षेत्रात सिंहांचा वाटा असणारे बाजपेयी, वार्ताहर मित्रवर्य श्रीकांत टोळ, बच्चुभाई जोशी, गुरुवर्य गरुड, दातार वाड्याच्या सहवासातून स्नेह लाभलेले आप्पा दातार, कांत काका, त्यानंतर संगीत क्षेत्रातील तालयोगी पं. सुरेश तळवलकर, ‘पद्मश्री’ पं. उल्हास कशाळकर या आणि अशा अनेक खरोखरच दिग्गज असलेल्या कितीतरी जणांच्या स्नेहाचा, प्रेमाचा सहवास ही त्यांची शिदोरी होती.
 
नोकरीच्या निमित्ताने झालेल्या भ्रमंतीप्रमाणे पर्यटनाची आवड जोपासत त्यांनी जगभर प्रवास केला. विविध ठिकाणे आणि विविध माणसे यांच्याविषयी उत्सुकता, हाही त्यांच्या स्वभावातील आनंदाचा एक विषय होता. त्याच आवडीच्या निमित्ताने नर्मदा नदीच्या सान्निध्यात चार दिवस निवांत क्षण व्यतित करण्यासाठी ते इंदोर येथे गेले होते. स्वतः वडिलांची जन्मभूमी आणि स्वतःच्या आजोबांची कर्मभूमी असलेल्या आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या भूमीत त्यांचे निधन झाले.
 
डोंबिवली शहरासाठी काहीतरी करायला हवे, ही नैतिक जबाबदारी म्हणून स्वीकारलेली काही मंडळी असतात. डोंबिवली शहरातील असंख्य नागरी समस्यांची आणि त्यांची कारणे-उपाययोजना यांबद्दल त्यांचे ठाम विचार होते. डोंबिवली ते ठाणे शहरांतील भौगोलिक अंतर सुलभतेने पार करण्याचे महत्त्व ते गेली काही दशके सातत्याने अधोरेखित करत असत. त्याचप्रमाणे डोंबिवलीत सरकारी किंवा महानगरपालिका पातळीवर शास्त्रीय संगीत महोत्सव दरवर्षी आयोजित व्हावा, यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करत असत आणि त्यासाठी लागेल ते सर्व साहाय्य करण्यासाठी उपलब्ध असू, हे ते शेवटपर्यंत सांगत होते. या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांचे महत्त्व आणि आयाम दिवसेंदिवस बदलत गेले आहेत. पण, ते दोन्ही प्रकल्प पूर्णत्वास जाणे, ही डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बाब असेल.
 
लेखक- निकेत पावगी
 




संबंधित मजकूर