अभिनंदन शरणकुमार लिंबाळे; समरसतेचे वर्तुळ पूर्ण झाले!

    29-Nov-2026   
 
Sharankumar Limbale 100th Marathi Literary Conference
 
पुण्यनगरीत होणार्‍या आगामी १००व्या अखिल भारतीय मराठीसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद शरणकुमार लिंबाळे भूषवणार आहेत. हे तमाम शोषित, वंचित आणि संधी नाकारल्या गेलेल्या सगळ्याच लोकांसाठी अभिमानास्पद असेच. या पार्श्वभूमीवर लिंबाळेंचा अल्पपरिचय करुन देणारा आणि त्यांच्या अध्यक्षपदासंदर्भात आगपाखड करणार्‍यांच्या आणि त्याच वेळी त्यांचे स्वागत करणार्‍यांच्या भूमिकेचा मागोवा घेणारे हे लेख...
 
शरणकुमार यांनी पूर्वी ‘सरस्वती’ पुरस्कार स्वीकारला आणि आता रा. स्व. संघाशी संबंधित लोकांच्या व्यासपीठावर जातात,” असे म्हणत काही लोक शरणकुमार लिंबाळे हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कसे बनले, यावर विद्वेषपूर्ण चर्चा करत आहेत. काय म्हणावे? लिंबाळे यांनी कोणत्या व्यासपीठावर जावे, काय बोलावे, याची काय त्यांनी परवानगी घ्यायची आहे का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून अभिव्यक्तिस्वातंत्र्य दिले, ते स्वातंत्र्य लिंबाळे यांना नाही का? पूर्वग्रहदूषित मानसिकतेचे अत्यंत कट्टरतावादी लोक, लिंबाळे यांनी संमेलनाचे अध्यक्षपद का स्वीकारले म्हणून काहीही बडबडत आहेत. अगदी समाजमाध्यमांवर शिवीगाळ करून लिंबाळेंचा बाप काढत आहेत. त्यांच्या आईबद्दल अश्लाघ्य बोलत आहेत. परिस्थितीचा बळी गेलेल्या एका आईबद्दल समाजमाध्यमांवर राळ उडवणारे हे लोक कोणत्या विचारधारेचे आहेत? या अकलेचे दिवाळे निघालेल्या लोकांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घ्यायचीही खरं तर लायकी नाही.
 
याउलट, ‘आम्ही विद्रोही आहोत आणि आम्ही प्रस्थापितांच्या विरोधातच आहोत,’ अशी भूमिका घेणारे काय करतात? विद्रोह गरजेचा आहे; पण कुणाच्या विरोधात? अत्याचार करणार्‍या नराधमांच्या विरोधात किंवा तसल्या मानसिकतेच्या विरोधात असावा. या पार्श्वभूमीवर ‘विद्रोही विचारांचे आहोत’ असे म्हणणारे काही लोक आज कुणाला विरोध करतात?
 
सत्य घटना सांगते. महाविद्यालयात असताना मला कवी संमेलनाला जायची आवड होती. एकेदिवशी मी कवी संमेलन आयोजित करण्याचे ठरवले. मी ज्या कवी संमेलनाला जायचे, तिथल्या कवींना मी संमेलनाला बोलावले. विक्रोळीला ठरलेल्या दिवशी सगळे कवी आले. संमेलन सुरू झाले. ‘आकाश’, ‘चंद्र’, ‘सूर्य’, ‘भाकरी’, ‘दुःख’, ‘झोपडी’ वगैरे वगैरे वर कविता सुरू झाल्या. दरम्यान, त्या भागात रा. स्व. संघाच्या तत्कालीन प्रचारकांचा दौरा होता. त्यांच्यासोबत गणवेशातले स्वयंसेवकही होते. ते नेमके आमच्या कवी संमेलनाच्या स्थळासमोरच उभे होते. त्यात त्यांचा काही हेतू नव्हता. कारण, ते त्यांच्या चर्चेत व्यस्त होते. मात्र, इतका वेळ निसर्ग आणि प्रेमावर कविता म्हणणारे काही कवी त्यांना पाहून अक्षरशः चवताळले. एकाने माईक घेतला आणि ‘प्रस्थापितांची आई मी *वतो’ म्हणत, प्रभू श्रीराम, सीता, कृष्ण वगैरेंना शिवीगाळ करू लागला. त्यावेळी माझे वय १९-२० वर्षांचे. असे देवाधर्माला शिव्याबिव्या देणारे शब्द कधीच ऐकले नव्हते. अक्षरशः थिजून गेले. मात्र, त्याचे कडवे पूर्ण न होऊ देता, मी त्याच्या हातातला माईक खेचला. "शेवटी आहेस तर ओबीसी ना? त्यांचीच बाजू घेणार!” असे म्हणत तो रागाने थरथरत निघून गेला. त्याच्यासोबत काहीजण निघून गेले. पण, काही लोक थांबले आणि म्हणाले, "लेका, बरे केले. कविता काय अशी असते? या अशा लोकांमुळे समाज बदनाम झाला.”
 
२० वर्षांपूर्वीची घटना. घाणेरडे शब्द, विचार मांडणार्‍यांना विरोध करणारेसुद्धा विद्रोही विचारधारेशी बांधिलकी असणारे होते. त्यामुळेच वाटते की, समाजात द्वेष-विद्वेष पसरवणार्‍या लोकांमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी नाळ जोडलेली खरी चळवळ आणि खरे चांगले लोक बदनाम होत आहेत. याअनुषंगाने शरणकुमारांचे विधान महत्त्वाचे आहे. ते म्हणाले की, "परिवर्तनवादी चळवळ आता जातिवादी होत चालली असून, त्यामुळे समाजाचे नुकसान होत आहे. आपण सध्या अघोषित सामाजिक हुकूमशाही अनुभवत आहोत.” ही तीच अघोषित हुकूमशाही आहे, जी समाजातल्या अनेकांना त्यांच्या मनाप्रमाणे जगू देत नाही. एखाद्याची देवावर श्रद्धा असली किंवा एखादा हिंदू विचारसरणीच्या व्यासपीठावर गेला की, ही हुकूमशाही त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकते, धमकावते. माझ्या ओळखीतील एकजण आहेत. त्यांनी मुंबईत एका हिंदुत्ववादी कार्यक्रमात पुरस्कार स्वीकारला, म्हणून त्यांना बहिष्कृत करण्यात आले. ते वैतागून कुटुंबासह गावी गेले. आजूबाजूला सगळे जातबांधव. त्यांची पत्नी एकदा एकटी घरी होती. तिला ‘हार्टअ‍ॅटक’ आला. ती तडफडत अंगणात पडली. पण, आजूबाजूचे नातेवाईक तिला उचलायला आले नाहीत. तिचा मृत्यू झाला. जर तिला वेळेत डॉक्टरांकडे नेले असते, तर ती वाचली असती. नातेवाईकांचे म्हणणे, "आम्हाला वाटले की, तिला उठवावे; पण आमच्यावर पण त्यांनी बहिष्कार घातला असता.” हे बहिष्कार घालणारे कोण आहेत? ‘बहिष्कृत भारत’ दैनिक काढून अस्पृश्यतेविरोधात आवाज उठवणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महामानवाचे हे असले लोक कधीच वारसदार असू शकत नाहीत.
 
असो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्रमाण मानून अत्यंत निष्ठेने आणि तळमळीने समाजाचे विचार-कार्य करणारे अनेक सज्जन माझे स्नेही आहेत. त्यांच्या सगळ्यांचे म्हणणे असते की, सामाजिक-आर्थिक दुबळ्या परिस्थितीमुळे आजही अनेक गुणवंत लोक आपणही काहीतरी करू शकतो, हे दाखवण्याच्या संधीपासून दूर आहेत. ते कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आयुष्यभर झिजतात. पण, कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधीपर्यंतही ते पोहोचत नाहीत. मग यशस्वी होण्याची गोष्टच सोडा! या पार्श्वभूमीवर समाजबंधू शरणकुमार लिंबाळे यांना १००व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद घोषित झाले. शतकापूर्वी महात्मा जोतिबा फुल्यांनी पुण्यातच साहित्य संमेलनाबाबत म्हटले होते की, "हे घालमोड्या दादांचे संमेलन आहे. इथे शोषित-वंचित समाजाचे प्रतिनिधित्व कुठे आहे?” त्याच पुण्यामध्ये ‘अक्करमाशी’ लिहिणार्‍या आणि त्याचे जिवंत दुःख भोगणार्‍या शरणकुमार लिंबाळे यांना १००व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद प्राप्त झाले आहे. सामाजिक समता, समरसतेचे एक वर्तुळ पूर्ण झाले. त्यामुळेच शरणकुमार लिंबाळे यांचे अभिनंदन!
 
विरोध का? कारण, ‘गंदा हैं पर धंदा हैं|’
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रा. स्व. संघाच्या समाजहिताचे कौतुक केले, असे दाखले आहेत. आरक्षणाचे समर्थन असू दे की, मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेच नाव देण्यासाठी खंबीर भूमिका घेणे असू दे; संविधान जागर असू दे की, महामानव डॉ. बाबासाहेबांचे स्मरण असू दे; रा. स्व. संघाने नेहमी समर्थनाची भूमिका घेतली. कुठलीही जाहिरातबाजी न करता कृती केली. या आयामात २०२४ साली अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यावेळी संघ स्वयंसेवक असलेल्या विठ्ठल कांबळे यांना सहपत्नी प्रभू रामाची पूजा करण्याचा सन्मान मिळाला होता. कारण, ‘सब समाज को साथ लिये’ ही संघाची भूमिका, नव्हे शोषित-वंचित समाजाच्या उत्थानासाठी संघाचे हजारो प्रकल्प कार्यरत आहेत. मात्र, काही लोक कोणत्याही गोष्टीत संबंध नसतानाही संघाला खेचून स्वतःची प्रसिद्धी मिळवण्याचा धंदा करत असतात. ते तरी काय करणारा? त्यांचा तो, ‘गंदा हैं पर धंदा हैं|’ या गंद्या धंद्यातूनच आता त्यांनी शरणकुमार लिंबाळेंच्या अध्यक्षपदावर गरळ ओकायला घेतली इतकेच!
 
मराठी साहित्य संस्कृतीच्या वारशात मोलाची भर पडणार! 
 
संघर्ष आणि विद्रोह याबरोबरच सामाजिक समन्वयाचे सेतू बांधून समाज निर्दोष करण्याची शरणकुमार लिंबाळे यांची भूमिका महत्त्वाची आहे. अलीकडच्या काळात साहित्य संमेलनाचे व्यासपीठ वापरून राजकीय विमर्श पुढे रेटण्याचे प्रकार सर्रास होतात. लिंबाळे सरांच्या अध्यक्षपदाचा काळ याला सणसणीत अपवाद ठरेल. मराठी साहित्य व संस्कृतीच्या वारशात मोलाची भर पाडणारे उपक्रम-कार्यक्रम या काळात होतील, ही रास्त अपेक्षा!
 
- डॉ. प्रसन्न पाटील, कार्यवाह, समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र
लिंबाळेंना विरोध कशासाठी?
 
शरणकुमार लिंबाळे यांना अध्यक्षपद मिळाले, याचा काही लोकांना त्रास कशासाठी झाला? या लोकांना दलित साहित्यिक मुख्य प्रवाहाच्या सर्वोच्च खुर्चीवर बसलेला चालत नाही काय? आपल्या समाजातील माणसाला प्रतिष्ठा मिळाली, तर त्या प्रतिष्ठेचा सन्मान करण्याचा मोठेपणा आपण दाखवणार की नाही? त्यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत उपेक्षितांचे प्रश्न अधिक व्यापकतेने मांडले जावोत आणि भारतीय साहित्यविश्वात मराठीचा वैचारिक ठसा अधिक ठळकपणे उमटावा, ही मनःपूर्वक अपेक्षा!
 
- विजय इंगळे, समाज अभ्यासक
संपूर्ण समाजासाठी अभिमानास्पद!
 
प्रसिद्ध साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड ही केवळ एका व्यक्तीची उपलब्धी नसून वंचित, शोषित आणि आंबेडकरी समाजासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या यशाचे स्वागत करण्याची उदारता आपण दाखवली पाहिजे. टीका जरूर करा; पण द्वेष आणि ‘ट्रोलिंग’ नको.
 
- अ‍ॅड. संदीप जाधव, अध्यक्ष, तथागत आंबेडकरी विचारक संघ
आमच्या आंबेडकरी चळवळीच्या सन्मानाची बाब
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, "आहे त्याठिकाणी सर्वोच्च स्थानावर जाण्याचा प्रयत्न करा.” मला वाटते की, शरणकुमार लिंबाळे संमेलनाचे अध्यक्ष होणे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना वाहिलेली ही खरी कृती आहे. त्यातच त्यांची निवड बिनविरोध झाली आहे, हीसुद्धा आंबेडकरी चळवळीच्या सन्मानाची बाब आहे.
 
- स्मिता कवडे, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता
समाजासाठी मोठी उपलब्धी
 
शोषित-वंचित समाजाला काय भोगावे लागते, याची जाणीव समाजासमोर मांडणारे शरणकुमार लिंबाळे हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, ही खूप मोठी उपलब्धी आहे. वेदनेचा सागर पार करून इथपर्यंत आलेली व्यक्ती संमेलनाचा अध्यक्ष झाली म्हणून खरंच खूप आनंद होत आहे.
 
- ज्योती साठे, अध्यक्ष, मातंग स्त्रीशक्ती अधिष्ठान

मानवी मूल्यांचा उद्घोष करणारे साहित्य!
 
शरणकुमार लिंबाळे यांचे साहित्य संत रविदासांनी सांगितलेल्या शाश्वत मानवी मूल्यांच्या न्यायाचा उद्घोष करते. त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची संधी मिळाल्याने समाजाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
 
- धनंजय वायंगणकर, सक्रिय सदस्य, संत रोहिदास समाज संघ, मुंबई 
मराठी साहित्यात महत्त्वाचे पाऊल!
 
डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे, ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. आपल्या साहित्याने वंचित, शोषित आणि उपेक्षित समाजाच्या वेदनांना शब्द दिले. आपली ही निवड मराठी साहित्याच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. आपल्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! नमो बुद्धाय! जय भीम!
 
- सुभाष कांबळे, अध्यक्ष,सधम्म सामाजिक संस्था, नवी मुंबई
 




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर