रा. स्व. संघ शताब्दी समारोह : डॉ. हेडगेवार, श्रीगुरुजींचे पुतळे उभे न करता कार्यविस्तार करणारी संघशताब्दी!

    29-Nov-2026

RSS Centenary
 
हिंदुत्व विचाराला केंद्रबिंदू मानून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डॉक्टर केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी १९२५ साली विजयादशमीला नागपुरात केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १०० वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करून शताब्दी वर्षसुद्धा संपूर्ण देशात साजरे केले आहे. आता संघ १०१ वर्षांच्या दिशेने आगेकूच करीत आहे. ही आगेकूच करताना संघाने व संघ कार्यकर्त्यांनी अनेक प्रकारच्या संघर्षाला तोड दिलेले आहे, अनेक चढ-उतार पाहिले, मान-अपमान पचवून परकीय तथा स्वकीयांचा उपहास-विरोध सहन करीत यशस्वी सिद्धता प्राप्त केली. या सिद्धतेमागे जुन्या काळातील सामान्य कुटुंबांमधून आलेले पांढर्‍या वस्त्रातील आधुनिक ऋषी असलेले प्रचारक तथा गृहस्थी कार्यकर्त्यांची तपश्चर्या, सामान्य स्वयंसेवकांची संघकामावरील निष्ठा, चिकाटी होय. त्यामुळेच हिंदूंचे विशाल संघटन असलेला संघ देशव्यापी नव्हे; तर जगव्यापी होऊन शताब्दी साजरी करू शकला आहे. आज देशातील एक लाख तीन हजार गावांत संघाचे कार्य सुरू असून, शताब्दी वर्षात १० कोटी २२ लक्ष घरांशी संपर्क साधण्यात आला आहे. आज, दि. २९ नोव्हेंबर रोजी दिल्लीमध्ये शताब्दी वर्षाची सांगता होत असून, त्यानिमित्ताने हा लेखप्रपंच...
 
देशव्यापी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नेमकी कार्यपद्धती काय आहे? संघाचे काम कसे चालते? संघकामाचे दृढीकरण कसे होते? व नवीन कार्यकर्ता कसा तयार होतो? असे अनेक प्रश्न अनेकांना पडत असतात. त्याची मीमांसासुद्धा होत असते. संघकार्याविषयी सर्वसाधारण विचार केल्यास संघाची कार्यपद्धती अत्यंत साधी आणि सोपी. भारतमातेची भक्ती करणारी आणि निरंतर कार्यकर्ता निर्मितीचे केंद्र असलेली एक तासाची संघ शाखा हे संघाचे बलस्थान. शाखेत रोज एकत्र येऊन स्वदेशी खेळ खेळणे, सामूहिक देशभक्तिगीत, सहभोजन अशा साध्य व सोप्या कार्यक्रमांमधून हिंदू समाजात आपण एक आहोत, भारतमातेचे पुत्र आहोत आणि भारतमातेसाठी आपल्याला काम करायचे आहे, ही समान प्रेरणा व समान धारणा निर्माण करून हिंदू एकतेच्या विचाराला व्यावहारिक कृतीची जोड शाखेवर दिली. संघ शाखेने समाजात नि:स्वार्थ समाजसेवेचा भावसुद्धा निर्माण केला आहे. अशा साध्या व सोप्या कार्यपद्धतीमुळे संघकामाचा विस्तार होऊन संघाने शताब्दी साजरी केली.
 
संघाच्या कार्यपद्धतीप्रमाणे संघात कोणताही कार्यक्रम केवळ ‘इव्हेंट’ म्हणून साजरा करण्याची पद्धत नाही. त्यामुळे संघशताब्दी वर्षात संघ स्वयंसेवकांनी गावागावांत डॉ. हेडगेवार, श्री गोळवलकर गुरुजी यांचे पुतळे उभे न करता; गावागावांत संघाच्या शाखा उभ्या केल्या. दुर्गम भागातील पाडे, तांडे, छोट्या वस्त्यांमध्ये संघाचे सेवाप्रकल्प उभे करून संघकामाचा प्रचंड विस्तार केला आहे. यापूर्वी, डॉ. हेडगेवार जन्मशताब्दीमध्ये ‘सेवाकार्य’ अभियान, श्री गोळवलकर गुरुजी यांच्या जन्मशताब्दीमध्ये ‘राष्ट्र जागरण’ अभियान आणि आता ‘पंच-परिवर्तन’सारख्या गुणवत्तापूर्ण सामाजिक उपक्रमांची रचना केली होती.
 
डॉक्टर हेडगेवार जन्मशताब्दी
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे जन्मशताब्दी वर्ष १९८८-८९ मध्ये संपूर्ण देशात साजरे करण्यात आले होते. जन्मशताब्दी वर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवाकार्यांना मोठी चालना देण्यात आली. देशातील दुर्गम भाग आणि सेवा वस्त्यांमध्ये सेवाप्रकल्प सुरू करून समाजातील वंचित घटकांपर्यंत शिक्षण व आरोग्यसेवा पोहोचविण्यावर भर देण्यात आला. देशभरात जवळपास ७६ हजार कार्यक्रम आयोजित करण्यात येऊन सुमारे १५ कोटी लोकांसोबत संपर्क साधून संघकामाची माहिती देण्यात आली होती. डॉ. हेडगेवार जन्मशताब्दीनिमित्ताने देशभरात सेवाप्रकल्प आणि सेवाकार्याचे जाळे विणले गेले. संघाच्या वेगवेगळ्या आयामामध्ये सेवाकार्याचा कार्य विभाग प्रभावी करून संघाचे अखिल भारतीय अधिकारी के. सूर्यनारायण राव यांच्याकडे देशभरातील सेवाकार्याचे काम देण्यात आले होते. डॉक्टर हेडगेवार यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने देशात सेवाकार्याला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात आली. छ. संभाजीनगर येथील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान’द्वारा चालविला जाणारा ‘डॉ. हेडगेवार रुग्णालय वैद्यकीय सेवाप्रकल्प’ याच काळात उभा झाला आहे. डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी वर्षात देशाच्या विविध भागांत समाजसेवी विविध उपक्रम झाले. परंतु, त्यांचे पुतळे उभारण्यात आले नाहीत.
 
श्री गोळवलकर गुरुजी जन्मशताब्दी
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर (गुरुजी) यांची जन्मशताब्दी २००६-०७ याकाळात ‘राष्ट्र जागरण’ अभियान म्हणून साजरी करण्यात आली. जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ विजया एकादशी, दि. २४ फेब्रुवारी २००६ रोजी नागपूर येथील रेशीमबाग, तत्कालीन सरसंघचालक सुदर्शनजी व अटल बिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत झाला होता; तर दि. १८ फेब्रुवारी २००७ रोजी दिल्ली येथे समारोपाचा कार्यक्रम तत्कालीन उपराष्ट्रपती भैरवसिंह शेखावत यांच्या उपस्थितीत झाला होता. श्री गोळवलकर गुरुजींच्या जन्मशताब्दीमध्ये संघकामाच्या विस्तारासाठी देशातील प्रत्येक तालुका स्थानावर विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात येऊन ‘सामाजिक समरसता’ विषयावर विशेष भर देण्यात आला होता. नंतरच्या काळात संघाच्या कार्य विभागामध्ये समरसता कार्य विभाग सुरू झालेला आहे. संघाचे कार्य सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी उभे करण्यासाठी संघ शाखाआधारित कार्यक्रमाची रचनासुद्धा करण्यात आली होती. सरसंघचालक सुदर्शनजी यांचे पत्र संघ स्वयंसेवकांना घरी जाऊन देण्यात आले होते.
 
श्री गोळवलकर गुरुजी जन्मशताब्दी काळात संघाच्या वतीने देशभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये प्रबुद्ध नागरिकांसोबत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक राष्ट्रवाद, सामाजिक समरसता, राष्ट्रीय सुरक्षा व दहशतवाद, भारतीय संस्कृतीचे संरक्षण, स्वदेशी आणि आर्थिक स्वावलंबन, सेंद्रिय शेती व गोआधारित अर्थव्यवस्था, लोकसंख्येतील असमतोल अशा विषयांवर देशात चर्चासत्रे झाली होती. पण, श्रीगुरुजी यांच्या जन्मशताब्दी वर्षात पुतळे उभे न करता, सामाजिक समरसतेच्या उपक्रमाला प्राधान्य दिले.
 
गावात पुतळे नव्हे; संघकार्याचा विस्तार!
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्ष साजरे करताना मोठ्या कार्यक्रमाची रचना केली नाही किंवा गावागावांत संघ संस्थापक डॉटर केशव बळीरामपंत हेडगेवार, श्री गोळवलकर गुरुजी किंवा बाळासाहेब देवरस यांचे पुतळे उभारले नाहीत, त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ट्रस्ट किंवा स्मारके उभी केली नाहीत, गावागावांत ‘डॉटर हेडगेवार अमर रहे’, ‘सरसंघचालकजी आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’ अशा घोषणासुद्धा दिल्या नाहीत. काश्मीरपासून कन्याकुमारी व आसेतुहिमाचल येथील संघ कार्यकर्त्यांनी आपआपल्या गावांत संघाला अपेक्षित असलेल्या हिंदू समाजाला एकतेच्या सूत्रात बांधण्याचे काम अर्थात, संघकार्य उभे केले. संघकार्याचा विस्तार करून गावागावांत संघाच्या शाखा, संघाचे साप्ताहिक मिलन, संघमंडळी उभी केली. ‘पंच-परिवर्तन’मधून संघाच्या शाखेवर भारतमातेची भक्ती करणारा व जातिपातीच्या वर उठून समरस, एकात्म हिंदू समाज भगव्या ध्वजाखाली एकत्र उभा केला. ‘जॉईन आरएसएस’च्या माध्यमामधून भारतमातेची आराधना करणारे लाखो तरुण स्वयंसेवक घडविले; ज्यांनी समाजजीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत जाऊन नि:स्वार्थपणे काम करण्याची प्रेरणा घेतली. त्यामुळेच आज संघशताब्दी वर्षाचा समारोप होत असताना संघकामाचा प्रचंड विस्तार होऊन जवळपास एक लाख तीन हजार गावांत कार्य सुरू आहे. संघाच्या विविध क्षेत्राचे कामसुद्धा मोठ्या प्रमाणात विस्तारले गेले आहे.
 
‘व्यक्तिनिर्माणातून राष्ट्रनिर्माण’ हे उच्च ध्येय घेऊन संघ आणि संघाचे कार्यकर्ते राष्ट्रउभारणीच्या कार्यात गेल्या १०० वर्षांपासून कार्यरत आहेत. संघाची शाखा आणि संघाचे विविध आयाम, समाजोपयोगी प्रकल्पामुळे संघाचे काम आता सर्वस्पर्शी, सर्वव्यापी दिसत आहे. आरोग्याचे प्रकल्प, स्वदेशीचा आग्रह, ग्रामविकास, पर्यावरण, पाण्याची समस्या, गोरक्षण तथा गोसंवर्धन, समरसता अशा वेगवेगळ्या आयामामुळे समाजात सकारात्मक बदल होऊन चांगले परिणाम पाहावयास मिळत आहेत. सामाजिक समरसतेच्या विचारामुळे ‘एक गाव, एक पाणवठा’, दलित समाजातील तरुणांना पौरोहित्य प्रशिक्षण देऊन मंदिरात पूजापाठ होत आहे, दुर्गम भागात वनवासी बंधूंच्या शैक्षणिक तथा आरोग्य सुविधांसाठी सेवाप्रकल्प उभे केले. त्यामुळे धर्मांतरणाला आळा बसला आहे. बाटवाबाटवीच्या कृतीला लगाम लागून ‘मीनाक्षीपुरम’सारख्या घटनांची देशात कुठेही पुनरावृत्ती झालेली नाही. संघशताब्दी वर्षात संघाने उपरोक्त उल्लेखित आयाम व चळवळी संपूर्ण देशात उभ्या करून समाजपरिवर्तन व राष्ट्र जागरणाच्या कार्यात आगेकूच केली आहे.
 
लेखक- अशोक राणे
 




संबंधित मजकूर