मुंबई (अक्षय मांडवकर) - महाराष्ट्रात ऑलिव्ह रिड्ले कासवांच्या घरट्यांची संख्या देशात तिसऱ्या क्रमांकावर असून, पश्चिम किनाऱ्यावरील सर्वाधिक घरटी राज्यात नोंदवली गेली आहेत (maharashtra sea turtle nesting) . ‘भारतीय वन्यजीव संस्थान’ने (डब्लूआयआय) नुकत्याच प्रकाशित केलेल्या ‘पॅन इंडिया – असेसमेंट ऑफ मरीन टर्टल्स’ या अहवालानुसार, २०२४-२५ च्या हंगामात महाराष्ट्रात २ हजार ९२९ घरटी नोंदली गेली (maharashtra sea turtle nesting). देशात आंध्र प्रदेश ६ हजार ६६२ नोंदवलेल्या घरट्यांसह पहिल्या, तर ओडिशा ३ हजार ३४५ घरट्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तमिळनाडूत २ हजार ८८० घरटी नोंदली गेली. (maharashtra sea turtle nesting)
राज्यात समुद्री कासव संवर्धनाचे काम हे वन विभागाचा कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठानकडून स्थानिक ग्रामस्थांना हाताशी धरुन केले जाते. रायगड ते सिंधुदुर्ग या भागात ऑलिव्ह रिड्ले कासवांची महत्त्वाची वीणस्थळे आहेत. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर कासव विणीच्या संख्येत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. २०२४-२५ च्या हंगामातील पश्चिम किनारपट्टीवरील एकूण ४ हजार १६५ घरट्यांपैकी सुमारे ७० टक्के घरटी महाराष्ट्रात होती. तुलनेत कर्नाटकात ५१६, गोव्यात ३६५, केरळमध्ये ३५५ आणि गुजरातमध्ये २०६ घरटी नोंदवली गेली. त्यामुळे महाराष्ट्रातील घरट्यांची संख्या या चार राज्यांतील एकत्रित नोंदींपेक्षाही अधिक आहे. ‘डब्लूआयआय’च्या अहवालनुसार रत्नागिरी जिल्ह्यात दाभोळ–गुहागर आणि गावखडी, तर सिंधुदुर्गात तांबळडेग–तोंडवली आणि वायंगणी–शिरोडा हे मोठ्या संख्येत कासवाची घरटी होणारे किनारे आहेत. अहवालातील तुलनेनुसार, वायंगणी ते शिरोडा या १२.८ किलोमीटर पट्ट्यात ९९७ घरटी नोंदली गेली आहेत. म्हणजेच या पट्ट्यात प्रति किलोमीटर ७८ घरटी आढळली. भारतातील एकाच किनारी पट्ट्यातील ही सर्वाधिक नोंद असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. किनाऱ्यांवरील घरटी सुरक्षित ठेवणे आणि नोंदींमध्ये नियमितता आणण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
अहवालानुसार, महाराष्ट्रातील घरटी स्थलांतरित करून उबवणी केंद्रात नेण्याच्या पद्धतीमुळे नैसर्गिक तापमानातील फरक आणि पिल्लांच्या लिंगगुणोत्तरावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सर्व घरटी हलवण्याऐवजी निवडक घरटीच स्थलांतरित करावीत; शक्य तिथे घरटी मूळ जागी संरक्षित करावीत. उबवणी केंद्रात आणि नैसर्गिक ठिकाणी तापमान नोंदवणारी उपकरणे वापरणे, घरट्यांची तारीख व अचूक जागा नोंदवणे आणि पिल्लांच्या उगमाचे निरीक्षण करणे आवश्यक असल्याचे अहवाल सुचवतो.
संवर्धनाला गावकऱ्यांचे बळ
कांदळवन कक्षामार्फत महाराष्ट्र किनारपट्टीवर सुरू असणाऱ्या कासव संवर्धनाच्या कामाने पश्चिम किनारपट्टीवर आघाडी घेतली आहे. याचे सर्व श्रेय कासव संवर्धनात सहभागी असणारी गावे आणि संवर्धनासाठी नेमलेल्या बीच मॅनेजर यांचे आहे. कांदळवन प्रतिष्ठानने त्यांना दिलेले भक्कम सहकार्यही तितकेच महत्त्वाचे आहे. कासव संवर्धनाचे महत्त्व ओळखणाऱ्या गावकऱ्यांचेही यासाठी विशेष कौतुक करायला हवे. - एन.आर.प्रवीण - मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष
कृत्रिम प्रकाशाचा धोका
महाराष्ट्रातील बहुतांश विणीचे किनारे तुलनेने मानवी हस्तक्षेपापासून मुक्त असले, तरी आंजर्ले, तांबळडेग, वेंगुर्ला आणि वेळागर-शिरोडा या महत्त्वाच्या किनारपट्ट्यांवर कासव विणीच्या अनुषंगाने काही समस्या आहेत. पर्यटनासाठी उभारण्यात येणारे कृत्रिम दिवे, पर्यटकांची वाढती वर्दळ, किनारी बांधकामे आणि टेट्रापॉडची उभारणी यांचा कासवांच्या अधिवासावर परिणाम होण्याची शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. विणीच्या किनाऱ्यांवर रात्रीच्या प्रकाशाची सरासरी तीव्रता तुलनेने कमी असून ती ०.५१ नॅनोवॅट प्रति चौरस सेंटीमीटर प्रति स्टेरेडियन इतकी आहे. मात्र, गुहागरमध्ये पर्यटनासाठी उभारलेल्या दिव्यांमुळे आणि जवळच्या नैसर्गिक वायू (LNG) प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर कृत्रिम प्रकाशाचे प्रमाण वाढले आहे. याउलट, वायंगणी किनाऱ्यावर थेट प्रकाशाची व्यवस्था नसल्याने तेथे प्रकाश प्रदूषणाचे प्रमाण कमी असल्याचे नोंदवण्यात आले आहे.