अयोध्या (Saryu-Kamala Express) : प्रभू श्रीरामाची जन्मभूमी अयोध्या आणि माता सीतेची जन्मभूमी जनकपूर यांना जोडणाऱ्या सरयू-कमला एक्स्प्रेस रेल्वेसेवेचा सोमवारी शुभारंभ करण्यात आला. नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे रेल्वेला हिरवा झेंडा दाखविला. अयोध्या धाम रेल्वेस्थानकावर आयोजित मुख्य कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते.
या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, सरयू-कमला एक्स्प्रेसमुळे भारत आणि नेपाळमधील पवित्र संबंधांना नवे परिमाण मिळणार आहे. अयोध्येला भेट देणाऱ्या भाविकांना जनकपूर येथे जाऊन माता सीतेचे दर्शन घेणे सुलभ होईल. लुंबिनी आणि बोधगया यांसारख्या बौद्ध धार्मिक स्थळांसह शिव-शक्ती परंपरेशी संबंधित तीर्थक्षेत्रांची संपर्कव्यवस्थाही सुधारण्यासाठी दोन्ही देश प्रयत्न करणार आहेत. (Saryu-Kamala Express)
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भारत आणि नेपाळमधील हजारो वर्षांच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि कौटुंबिक संबंधांचा उल्लेख केला. दोन्ही देशांचे नाते ‘रोटी-बेटी’चे असून, अयोध्या आणि मिथिला यांच्यातील प्राचीन सांस्कृतिक संबंध या रेल्वेसेवेमुळे पुन्हा दृढ होतील, असे त्यांनी सांगितले. नेपाळमधील भाविकांना अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेता येईल, तर भारतीय भाविकांना जनकपूरमध्ये माता जानकीचे दर्शन घेणे सोपे होईल, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी उत्तराखंडमधील धारचुला मोटार रस्ते पुलाचे उद्घाटन आणि बनबसा येथे एकात्मिक तपासणी नाक्याचे भूमिपूजन करण्यात आले. नेपाळमधील दोधारा चांदनी येथील तपासणी नाक्याचे कामही वेगाने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. (Saryu-Kamala Express)
अयोध्या ते जनकपूरदरम्यानचे सुमारे ६०४ किलोमीटरचे अंतर ही रेल्वे सुमारे १९ तासांत पार करणार आहे. २८ नोव्हेंबरपासून नियमित सेवा सुरू होणार असून, धार्मिक पर्यटनासह व्यापार आणि सीमापार प्रवासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.(Saryu-Kamala Express)