मुंबई (विशेष प्रतिनिधी) : प्रसिद्ध छायाचित्रकार मोहन बने यांच्या ‘आपलं ताडोबा’ या वन्यजीवविषयक छायाचित्र प्रदर्शनाचे सोमवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरातील कलादालनात उद्घाटन झाले (mohan bane tadoba). माजी क्रिकेटपटू अमोल मुझुमदार, अभिनेते, लेखक, दिग्दर्शक दीपक करंजीकर आणि ज्येष्ठ अक्षरचित्रकार अच्युत पालव यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन पार पडले. बने यांनी ताडोबातील वाघांबरोबरच येथील वन्यजीवांचे टिपलेले चित्तथरारक क्षण यानिमित्ताने मुंबईकरांना पाहता येणार आहेत (mohan bane tadoba). हे प्रदर्शन २८ नोव्हेंबरपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी सात या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. (mohan bane tadoba)
आजवर ज्या कॅमेऱ्याने अनेक महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक आणि ऐतिहासिक घडामोडी टिपल्या त्या मोहन बने यांच्या कॅमेऱ्याने वन्यजीवांचे काही वेधक क्षण टिपले आहेत. ताडोबा-अंधारी वन्यजीव अभयारण्यात टिपलेले हे क्षण पाहण्याची संधी मुंबईकरांना आपलं ताडोबा या वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनाच्या निमित्ताने मिळणार आहे. माजी क्रिकेटपटू अमोल मुझुमदार यांनी उद्घाटनाप्रसंगी सांगितले आहे की, "वानखेडे स्टेडियम ते ताडोबातील जंगल असा बने यांचा प्रवास अचंबित करणारा असून ज्या माणसाने एकेकाळी क्रिकेटच्या मैदानात मुंबईतील वाघ टिपले त्याच माणसाने आज ताडोबातील अस्सल वाघ टिपले आहेत." बने यांनी आपल्या छायाचित्रणाचे कौशल्य पणाला लावून वाघांच्या आयुष्यातील काही थरारक क्षणांचा वेध घेतला आहे. निमवयस्क वाघाची निमवयस्कच असणाऱ्या अस्वलासोबत लागलेल्या झुंजीचे छायाचित्र असो वा प्लास्टिकच्या पिशवीचा कचरा वेचणाऱ्या वाघाचे छायाचित्र असो प्रत्येक छायाचित्रातून त्यांनी सामाजिक आणि मार्मिक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाघाने सांबराची शिकार करण्यासाठी केलेला आटापिटा त्यांनी लक्षवेधीपणे टिपला आहे. याशिवाय ताडोबातील निरनिराळे पक्षी, सरपटणारे जीव यांचाही आढावा छायाचित्र प्रदर्शनात मांडण्यात आला आहे. वन्यजीव छायाचित्रणाची आवड असणाऱ्या तसेच निसर्गप्रेमींसाठी हे प्रदर्शन विशेष आकर्षण ठरणार आहे.
प्रत्येक फोटोमागे गोष्ट
छायाचित्रांचे प्रदर्शन पाहिल्यानंतर मला जाणवले की, ताडोबातील सर्व वाघ हे रवींद्र नाट्य मंदिरात अवतरले आहेत. बने यांनी काही फोटो उत्तमरित्या टिपलेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे वाघांमध्ये रममाण होऊन त्यांनी ही छायाचित्र टिपली आहेत. त्यामुळे त्या प्रत्येक फोटोमागे एक गोष्ट दडलेली आहे. ती गोष्ट जर बने यांच्याकडून जाणून घेतल्यास तुम्ही नक्की वाघाच्या प्रेमात पडाल - अच्युत पालव, ज्येष्ठ अक्षरचित्रकार
कॅमेऱ्यामागच्या गोष्टी थरारक!
माझं काम आयुष्यभर कॅमेऱ्याच्या मागे राहिले आहे. ताडोबात वाघ टिपताना अशाच काही कॅमेरामागच्या गोष्टी अनुभवता आल्या. वाघाची अस्वलासोबत झालेली झुंज टिपण्याचा क्षण असो वा आपल्या पिल्लांसोबत नांदणारी गौरी वाघीण असो यांचे जीवनच्रक टिपणे थरारक होते. - मोहन बने, ज्येष्ठ छायाचित्रकार