देशातील बॅरियर-फ्री टोल नेटवर्कचा विस्तार; तामिळनाडूत तिसरी MLFF प्रणाली कार्यान्वित; चेन्नासमुद्रम टोल प्लाझावर वाहनांना न थांबता टोल भरता येणार!

फास्टॅग आणि एएनपीआर तंत्रज्ञानाचा वापर

 
MLFF Toll System
 
मुंबई (MLFF Toll System): भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तामिळनाडूतील रणिपेट जिल्ह्यातील चेन्नासमुद्रम टोल प्लाझावर मल्टी लेन फ्री फ्लो टोल प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीमुळे वाहनचालकांना पारंपरिक टोल नाक्यांवर थांबण्याची गरज न पडता टोल भरून पुढे जाता येणार आहे. तामिळनाडूमधील ही तिसरी एमएलएफएफ प्रणाली असून, यापूर्वी परनूर आणि नेमिली टोल प्लाझावर ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे.
 
चेन्नासमुद्रम टोल प्लाझा राष्ट्रीय महामार्ग ४८ वर वालाजापेटजवळ किलोमीटर १०४.९०० येथे स्थित आहे. चेन्नई-बंगळुरू या महत्त्वाच्या महामार्गावरील हा टोल प्लाझा असून, या मार्गावरील ४६.५ किलोमीटरच्या टोलयोग्य पट्ट्यातून मोठ्या प्रमाणावर वाहनांची वाहतूक होते. त्यामुळे येथे आधुनिक टोल प्रणाली कार्यान्वित केल्याने वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.  (MLFF Toll System)
 
या टोल प्लाझावर १२ टोल लेन असून, प्रत्येक लेनमध्ये ओव्हरहेड कॅमेरे आणि आरएफआयडी रीडर बसविण्यात आले आहेत. फास्टॅग असलेल्या वाहनांची ओळख आरएफआयडी तंत्रज्ञानाद्वारे केली जाणार आहे, तर वैध फास्टॅग नसलेल्या वाहनांच्या नंबर प्लेटची नोंद स्वयंचलित नंबर प्लेट रिकग्निशन (एएनपीआर) कॅमेऱ्यांद्वारे घेतली जाणार आहे. ही माहिती रिअल टाइममध्ये पडताळून संबंधित खात्यातून टोल शुल्क आकारले जाणार आहे. एमएलएफएफ प्रणालीमुळे वाहनांना ताशी १५० किलोमीटरपर्यंतच्या वेगाने टोल प्लाझा पार करता येणार आहे. (MLFF Toll System)
 
भारतामध्ये गुजरातमधील चोरयासी टोल प्लाझावर मे २०२६ मध्ये देशातील पहिली एमएलएफएफ प्रणाली सुरू करण्यात आली होती. त्यानंतर राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीसह विविध ठिकाणी या तंत्रज्ञानाचा विस्तार करण्यात आला. तामिळनाडूमध्ये १ ऑक्टोबर २०२६ रोजी परनूर टोल प्लाझावर ही प्रणाली सुरू झाली, तर १३ नोव्हेंबर रोजी नेमिली टोल प्लाझा एमएलएफएफ प्रणालीशी जोडण्यात आला. (MLFF Toll System)
 
देशभरातील १६ टोल प्लाझांवर टप्प्याटप्प्याने ही प्रणाली लागू करण्याची योजना एनएचएआयने आखली आहे. वाहनचालकांनी नव्या प्रणालीअंतर्गत टोल भरण्यासाठी वैध फास्टॅग आणि त्यामध्ये पुरेशी शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा इलेक्ट्रॉनिक नोटीस किंवा शुल्कवसुलीसंदर्भातील कारवाईला सामोरे जावे लागू शकते. बॅरियर-फ्री टोलिंग प्रणालीच्या विस्तारामुळे महामार्गांवरील प्रवास अधिक वेगवान, सुलभ आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. (MLFF Toll System)
 
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर