मुंबई (Mankhurd Traffic Cop Attack):मानखुर्द टी-जंक्शन येथे वाहतूक व्यवस्थापनावरून झालेल्या वादातून चार अनोळखी व्यक्तींपैकी एकाने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला हेल्मेटने मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस शिपाई नितीन मोहन भालेकर हे जंक्शन परिसरात वाहतूक नियंत्रणाचे कर्तव्य बजावत असताना हा प्रकार घडला. (Mankhurd Traffic Cop Attack)
मिळालेल्या एफआयआर कॉपीनुसार, नितीन भालेकर हे मानखुर्द वाहतूक विभागात कार्यरत असून, घटनेच्या दिवशी मानखुर्द टी-जंक्शन येथे कर्तव्यावर होते. सायंकाळी सुमारे ७.१५ वाजण्याच्या सुमारास घाटकोपरच्या दिशेने जाणाऱ्या दक्षिण आणि उत्तर मार्गिकांवरील पुलाखाली ते वाहतूक नियंत्रण करत होते. त्यावेळी एका कारचालकाचा दोन दुचाकींवरून प्रवास करणाऱ्या चार जणांशी वाद सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या वादामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याने भालेकर यांनी संबंधितांना रस्त्यावर वाहने थांबवू नका, असे सांगितले. तसेच कारचालकाला पुढे जाण्यास सांगितले. मात्र, कारला पुढे जाण्याची परवानगी दिल्यामुळे दुचाकीस्वार संतप्त झाले. त्यांनी भालेकर यांच्याशी वाद घालत कारचालकाला पुढे का जाऊ दिले, असा जाब विचारला. (Mankhurd Traffic Cop Attack)
यावर भालेकर यांनी संबंधितांना कारचा नोंदणी क्रमांक नोंदवून घेऊन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. मात्र, चौघांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर भालेकर यांनी त्यांना वाहतूक कार्यालयात येण्यास सांगितले. याचदरम्यान चौघांपैकी एकाने हेल्मेटने त्यांच्या चेहऱ्यावर जोरदार प्रहार केला. (Mankhurd Traffic Cop Attack)
या हल्ल्यामुळे भालेकर यांना चक्कर आली आणि ते रस्त्यावर कोसळले. त्यानंतर चारही आरोपी दुचाकींवरून पसार झाले. भालेकर यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्यांना मदत केली. प्रथम त्यांना वाहतूक चौकीत नेण्यात आले आणि त्यानंतर उपचारांसाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करून सीटी स्कॅनही केले. उपचारानंतर भालेकर यांनी मानखुर्द पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार, पोलिसांनी चार अनोळखी व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १२१(१), १३२, ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणे, शिवीगाळ करणे आणि त्यांना शासकीय कर्तव्य बजावण्यापासून रोखणे, असे आरोप आरोपींवर ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणी मानखुर्द पोलीस पुढील तपास करत असून, आरोपींची ओळख पटवून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. (Mankhurd Traffic Cop Attack)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक