मुंबई (Anjuman-I-Islam Women's Cricket Team) : भारतीय महिला क्रिकेट संघाच्या पहिल्या कर्णधार डायना इडुल्जी यांनी मुंबईतील अंजुमन-ए-इस्लाम टी-२० आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी एका विशेष संघाकडे मोठ्या अपेक्षेने पाहत या संघातील अनेक खेळाडू भविष्यात क्रिकेटविश्वात आपले नाव मोठे करतील, असा विश्वास व्यक्त केला. हा संघ म्हणजे अंजुमन-ए-इस्लामचा महिला क्रिकेट संघ. या संस्थेने प्रथमच महिला क्रिकेट संघाची स्थापना केली आहे.
अंजुमन-ए-इस्लाम ही मुंबईतील १५० वर्षांहून अधिक जुनी शैक्षणिक आणि सामाजिक संस्था आहे. सामाजिक सुधारणांसह शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या या संस्थेची स्थापना १८७४ मध्ये झाली. संस्थेच्या इतिहासात प्रथमच महिला क्रिकेट संघ मैदानात उतरला आहे. महिला क्रिकेटपटूंचा हा संघ तयार झाल्याबद्दल डायना इडुल्जी यांनी आनंद आणि अभिमान व्यक्त केला. या संघातील खेळाडू भविष्यात जागतिक स्तरावर आपली छाप पाडतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. (Anjuman-I-Islam Women's Cricket Team)
भारतीय क्रिकेटपटू सलीम दुर्रानी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अंजुमन-ए-इस्लाम संस्थेतून वसीम जाफर, गुलाम पार्कर आणि यशस्वी जैस्वाल यांच्यासारखे क्रिकेटपटू घडले आहेत. आता याच संस्थेचा महिला क्रिकेट संघही मैदानात उतरला आहे. मुली आणि मुलांना समान संधी मिळाव्यात तसेच क्रीडा क्षेत्रातील लिंगसमतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने हा संघ तयार करण्यात आला आहे. (Anjuman-I-Islam Women's Cricket Team)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक