उत्तर प्रदेशमध्ये बिगर-भाजप पक्षांमध्ये सारा खेळ हा जास्तीत जास्त मुस्लीम मते कोण आपल्याकडे खेचून घेतो, यासाठी सुरू आहे. त्यात समाजवादी पार्टी हा पक्ष प्रमुख दावेदार असला, तरी आता ‘एमआयएम’ या पक्षानेही आपली दावेदारी दमदारपणे जाहीर केली आहे. या चढाओढीत काँग्रेस हा एकप्रकारे संदर्भहीन बनत चालला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचे तापमान वाढत चालले आहे. समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात जागावाटप होणार, हे निश्चित असले; तरी ‘प्रथमग्रासे मक्षिकापात:’ या उक्तीप्रमाणे, काँग्रेससाठी पहिल्या फेरीलाच कडवटपणा आला आहे. उत्तर प्रदेश विधानसभेत ४०१ जागा आहेत. यांपैकी समाजवादी पार्टीने, काँग्रेससाठी केवळ २४ जागा सोडण्याची तयारी दर्शविली आहे. अर्थात, येत्या काही दिवसांत होणार्या वाटाघाटींमध्ये हा आकडा वाढेल. पण, समाजवादी पक्षाने इतया कमी जागांपासून प्रारंभ करून, काँग्रेसची खरी लायकी किती, तेच एकप्रकारे सूचित केले आहे.
काँग्रेसकडे राज्यात एकही नाव घेण्याजोगा नेता नाही की, त्या पक्षाची संघटना शिल्लक नाही. मुस्लीम मतदारही आता काँग्रेसबद्दल पुनर्विचार करण्याच्या मनस्थितीत आहे. कारण, त्याला ‘एमआयएम’ या मुस्लीम पक्षाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस उत्तर प्रदेशात हळूहळू राजकीयदृष्ट्या निष्प्रभ आणि संदर्भहीन बनत चालला आहे.
काँग्रेसने यापूर्वीच आपल्या पक्षाला निदान २०० जागा लढवायच्या आहेत, हे सूचित केले होते. वाटाघाटींमध्ये मोल-तोल होऊन, सुमारे १८०-१८५ जागा मिळण्याची अपेक्षा काही काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली होती. गेल्या निवडणुकीत काँग्रेस केवळ दोन जागांवर विजयी झाला होता. हे लक्षात घेता, काँग्रेसचा २०० जागांचा दावा हा हास्यास्पद आणि अतिरेकीच वाटतो, हे अखिलेश यादव यांनाही चांगलेच ठाऊक आहे. पण, त्यांच्यापुढेही पेच आहे. कारण, समाजवादी पार्टीला मुस्लीम मतांमध्ये पडणारी फूट टाळायची आहे. राष्ट्रीय पातळीवर मुस्लीम मतदार हे नेहमीच काँग्रेसला पहिल्या पसंतीचा पक्ष मानतात. काँग्रेसशी युती झाली नाही, तर समाजवादी पार्टीला मिळणार्या मुस्लीम मतांमध्ये काँग्रेस वाटेकरी होऊ शकतो. काँग्रेस भले जागा जिंकणार नाही; पण काँग्रेसचे उमेदवार समाजवादी पार्टीची मते खाऊ शकतात. म्हणूनच, कितीही नकोसा झाला, तरी समाजवादी पार्टीला काँग्रेसचा हात सोडता येत नाही. त्यातच आता मुस्लीम मतांमध्ये वाटेकरी वाढत चालले आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये बिगर भाजप पक्षांचा सारा खेळ हा जास्तीत जास्त मुस्लीम मते आपल्याकडे कोण खेचून घेतो, यासाठी सुरू आहे. राज्यात समाजवादी पार्टी हा आजही मुस्लिमांसाठी पहिल्या पसंतीचा पक्ष असला, तरी आजच्या काळात ‘सपा’साठीही समीकरणे वाटतात तितकी सोपी राहिलेली नाहीत. मुस्लीम मतदारांमध्ये आता पहिला मुद्दा हा या समाजाच्या भागीदारीचा आहे. आजवर काँग्रेस, समाजवादी पार्टी किंवा ‘बसपा’ यांनी मुस्लीम मतदारांकडे, केवळ मतपेढी स्वरूपातच पाहिले आहे. मुस्लिमांची मते तर पाहिजेत; पण मुस्लीम समाजातील व्यक्तीला उमेदवारी देण्यात हे सर्व पक्ष टाळाटाळ करीत होते. आता मुस्लिमांना आपला प्रतिनिधी हा मुस्लीमच हवा आहे. यामुळे समाजवादी पार्टी व काँग्रेस यांच्यापुढे मोठेच आव्हान उभे राहिले आहे. एकतर या पक्षांकडे पुरेसे मुस्लीम उमेदवार नाहीत. तसेच समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांचा गोतावळा खूप मोठा असून, विधानसभेत आपल्या अधिकाधिक नातेवाईकांचीच वर्णी कशी लागेल, यालाच ते प्राधान्य देत असतात. ‘सपा’च्या खात्रीच्या जागांवर नेहमीच यादव कुटुंबातील व्यक्ती उमेदवार असते. मात्र, मुस्लिमांना आता आपला प्रतिनिधी हवा आहे. थोडक्यात मते पाहिजे असतील, तर सत्तेत वाटाही हवा आहे.
या पार्श्वभूमीवर ‘एमआयएम’ पक्षाचे प्रमुख व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी चंद्रशेखर आझाद यांच्या ‘आझाद समाज पार्टी (कांशीराम)’ या पक्षाशी जी युती केली आहे, त्याकडे पाहिले पाहिजे. ओवेसी हे नेहमीच मुस्लीम व्यक्तीला उमेदवारी देण्याबाबत आग्रही असतात. ‘अबकी बार अब्दुल दर्री नहीं बिछाएगा,’ असे त्यांनी, गेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत म्हटले होते. म्हणजे, यापुढे मुस्लिमांना केवळ कामाला लावले जाणार नाही, तर जास्तीत जास्त मुस्लीम व्यक्तींना उमेदवारी दिली जाईल आणि शय तिथे सत्तेत वाटाही दिला जाईल, हे त्यांना सुचवायचे होते. त्यांच्या या युक्तिवादाचा मोठा प्रभाव मुस्लीम मतदारांवर पडला असून, त्यांनी बिहारमध्ये सहा आमदार निवडून आणले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीतही, काँग्रेसपेक्षा अधिक नगरसेवक हे ‘एमआयएम’चेच आहेत. यावरून ओवेसी यांचा मुस्लीम मतदारांवरील वाढता प्रभाव जाणवतो. आता उत्तर प्रदेशातही त्यांनी मुस्लिमांच्या भागीदारीचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर उठवण्यास सुरुवात केली आहे. शिवाय, चंद्रशेखर यांच्या पक्षाशी युती करून, दलित मतेही आपल्याकडे वळविण्याचा दमदार प्रयत्न ते करत आहेत. चंद्रशेखर हे मायावती यांच्याच ‘चमार’ (जाटव) या जातीचे आहेत. मायावती यांनी जवळपास ‘राजकारण संन्यास’ घेतला असल्याने, त्यांच्या ‘जाटव’ समाजाची मते आपल्याकडे खेचण्याचा चंद्रशेखर यांचा प्रयत्न आहे.
‘एमआयएम’-आझाद यांच्या युतीचा फार मोठा परिणाम घडण्याची शयता कमी असली, तरी ३०-४० जागांवर ही युती ‘सपा’ची मते खाण्याची शयता आहे. तसे झाले, तरी समाजवादी पार्टीच्या राजकीय भवितव्यावर परिणाम होईल. काँग्रेसने गेल्या निवडणुकीत केवळ दोन जागी विजय मिळविला होता. त्या पक्षासाठी सोडलेल्या जागा या वाया गेलेल्या जागा, असेच समाजवादी पार्टी मानते. म्हणूनच, अखिलेश यादव हे काँग्रेसला अधिक जागा देण्यास राजी नाहीत. पण, मुस्लीम मतांमध्ये फूट टाळण्यासाठी काँग्रेसशी युती करण्यावाचून त्यांना पर्यायही नाही.