…एका महाजालाचे ठप्प होणे

    19-Nov-2026   

Microsoft Global Outage
 
मुंबईतले नोकरदारांसाठी ‘मुसळधार पावसाने लोकल ठप्प’ त्यामुळे कार्यालयीन ‘कामकाज ठप्प’ ही जशी पावसाळ्यातील एक ठरलेली बातमी आणि अनियोजित सुटीचे मिळालेले कारण. तसा यंदा गेल्या आठवड्यात ‘मायक्रोसॉफ्ट’ ठप्प झाल्यानंतर जो काही इन्स्टाग्रामवर रिळा पडण्याचा धडाका दिसला, त्या सेवा ठप्प होण्यामाची नेमकी कारणं काय? त्याबद्दलचे हे आकलन.
 
‘मायक्रोसॉफ्ट’ आणि ‘आऊटलूक’ची सेवा संपूर्ण दिवसभर ठप्प राहिल्यानंतर एका दिवसात पुन्हा सुरू झाली. मात्र, या सगळ्या बिघाडाची व्याप्ती जगभर होती. मुळात विमान कंपन्यांना बसलेल्या फटका हा सर्वाधिक होता. आधीच गटांगळ्या खात असलेल्या जगभरातील विमानसेवा कंपन्यांची अवस्था त्यानंतर होणारा अशा प्रकारचा मोठा बिघाड दूरोगामी परिणाम करणारा ठरू शकतो याचा झरोका यानिमित्ताने दिसला. दोन आठवड्यापूर्वीच युरोपमध्ये भयंकर मोठा सायबर हल्ला झाला. ज्यात सुपर मार्केट शृंखला असलेल्या एका कंपनीच्या सर्वच दालनांतील शीतकपाटांचे तापमान रात्रभर वाढविण्यात आले. ज्यामुळे मांसाहारी पदार्थ, अन्य नाशवंत वस्तू फेकून द्याव्या लागल्या. यामुळे कंपनीला आर्थिक फटका तर बसलाच, पण त्यांच्या व्यवस्थापन साखळीलाही नुकसान सहन करावे लागले होते.
 
अर्थात या ‘मायक्रोसॉफ्ट’च्या या बिघाडाला सायबर हल्ला म्हणून अद्याप तरी घोषित केलेले नाही. परंतू, त्याची व्याप्ती एका संकटापेक्षा काही कमी नाही. कंपनीने १३ नोव्हेंबर रोजी आपले ग्राहक आणि सहकारी कंपन्यांची माफी मागत याबद्दल पोस्ट लिहीली होती. कंपनी आपल्या पोस्टमध्ये म्हणते की, “घडला प्रकार आम्ही गांभीर्याने घेत आहोत. आमच्या सेवांवर आपला जो विश्वास आहे, त्यामुळे हा प्रकार आम्ही गांभीर्याने घेत आहोत.” या प्रकाराशी एआय एजंट्सचाही संबंध नाही. नेटवर्क क्षमतेत केलेल्या एका अद्यावतीकरणामुळे (अपग्रेड) काही त्रुटी राहिल्या. नेटवर्कबदलानंतर हा बिघाड झाला, असेही त्यांचे म्हणणे आहे. कंपनी भविष्यात याबद्दलचा अहवाल सादर करणार आहे.
 
आता हा संपूर्ण घोळ सावरायला एक दिवस का लागला? तर त्याबद्दल कंपनी म्हणते की, बाधित मशिन्सवर स्वयंचलित तपासणीत ‘हेल्थ चेक’ वारंवार बिघडू लागत होते. तसेच ‘सिक्यूअर्ड कनेक्शन प्रोसेस’वर दबाव पडत होता. सुरुवातीच्या काळात सर्व्हर रिस्टार्ट आणि ट्राफीक रि-रूट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, काही काळाने त्याचाही परिणाम शून्य झाला. अशाप्रकारे यंत्रणा पूर्ववत होण्यासाठी वेळ लागेल हे लक्षात आल्यानंतर एक स्थिर उपाययोजना करण्याची गरज आहे. हा घोळ मुळात १२ नोव्हेंबर रोजी सुरू झाला, एक्सचेंड ऑनलाईन आणि त्यानंतर मायक्रोसॉफ्ट टीम्स, मायक्रोसॉफ्ट ३६५, कोपायलट, शेअर पॉईंट आणि डिफेंडर एक्सडीआर सेवांवर दिसू लागला.
 
अशाप्रकारच्या सर्व्हर डाऊनचे वृत्त देणाऱ्या ‘डाऊन इंडिकेटर’ने दिलेल्या आकडेवारीनुसार, फक्त आऊटलूकवर १ लाख ३० हजार तक्रारी नोंद होत्या. मायक्रोसॉफ्टशी निगडीत ४७ हजार तक्रारी नोंदविण्यात आल्या. अशा एकूण ७४ लाख तक्रारी नोंदविण्यात आल्या. एअर इंडिया, इंडिगो, अकासा एअर आदी विमान कंपन्यांच्या उड्डाण सेवेवर परिणाम झाला. ग्राहकांना ई-मेल सेवा देण्यात अडचणी आल्याने अनेक विमान उड्डाणे रखडली. काही देशांचे शेअर बाजार, एआय सेवा देणाऱ्या ओपन एआय आणि एन्थ्रोपिक कंपन्यांना याचा फटका बसला. काही बँकांच्या व्यवहारांनाही याची झळ बसू लागली. काही रुग्णालयातील सेवा बाधित झाली, अनेक डॉक्टरांच्या बाह्य रुग्ण सेवा खोळंबल्या. काही देशांतील पोलीस ठाणी, व्यापारी आणि निर्यातदारांच्या संबंधित सेवा खोळंबल्या.
 
‘ग्लोबल मार्केट फोर्सेस’ची संकल्पना समजून घेणे इथे अगत्याचे ठरते. कारण अशा कंपन्या आपल्यावर हे तंत्रज्ञान थोपविण्यासाठी आग्रही असतात की, असा मोठा बिघाड झाला की, त्यात फक्त आपणच नाही तर तर जगातील विकसित देशांसोबत विकसनशील देशही यात बळी पडतात. आपल्या क्षेत्रात कुणी प्रतिस्पर्धीच नाही आणि असला तरीही तोही तितकासा बलशाली नाही, त्यामुळे संपूर्ण बाजारावर मक्तेदारी एकाच कंपनीची राहील याची खबरदारी घेतली जाते.
 
इतक्या वर्षांत ‘मायक्रोसॉफ्ट’ला टक्कर देणाऱ्या अॅप्पलशिवाय अन्य कुठलीही कंपनी उभी राहिली नाही किंबहून उभी राहू शकणार नाही याची खबरदारी घेतली गेली. भारत सरकारच्या केंद्रीय मंत्र्यांनी काही महिन्यांपूर्वी भारतीय बनावटीची ‘झोहो’ कंपनीच्या पर्यायी आणि स्वदेशी सेवा उचलून धरण्याचा प्रयत्न केला होता. ज्यांनी तो स्वीकारला ते यातून तरले उर्वरित जे या ‘मायक्रोसॉफ्ट’वर निर्भर राहिले त्यांना याची झळ बसली. अर्थात एकाच कंपनीवर अवलंबित्व टाळलेच पाहिजे. मात्र, पर्यायही तितक्याच तोडीचा उभा राहिला पाहिजे. शिवाय ऑफलाईन डेटा बॅकअपही तितकाच महत्वाचा. म्हणजे एकाच वेळी अशा संकटाचा सामना असंख्य कंपन्यांना करावा लागल्या, त्याचा पर्यायी ऑफलाईन उपलब्धी किमान एक दिवसासाठी का होईना गरजेची आहे. यापुढचा प्रश्न येतो तो म्हणजे डेटाचा. सरकारी किंवा खासगी कंपन्यांचा डेटा देशांतर्गतच राहावा हे त्यामागील पहिले कारण आहे.
 
‘मायक्रोसॉफ्ट’ ही जगातील एक सर्वात बलाढ्य कंपनी म्हणून गणली जाते. एका छोट्या गॅरेजमध्ये कंपनीची सुरुवात झाली. मायक्रो कम्युटर या नावावरुन कंपनीने ‘मायक्रोसॉफ्ट’ हे नाव तयार केले. जगभरातील ७० टक्के संगणकांमध्ये ‘मायक्रोसॉफ्ट व्हिंडोज्’ हेच ‘सॉफ्टवेअर’ वापरात आहे. आउटलूक जगातील सर्वात मोठा ई-मेल प्लॅटफॉर्म आहे. टीम्स या सॉफ्टवेअरचे जगभरात ३२ कोटी वापरकर्ते आहेत. ‘मायक्रोसॉफ्ट’चे मुख्यालय ‘वॉशिंग्टन डीसी’ शहरात असून जगभरातील सेवा इथूनच हाताळली जाते. ‘मायक्रोसॉफ्ट’ने ‘चॅट जीपीटी’ ही सेवा देणाऱ्या ‘ओपन एआय’ या कंपनीतही १० अब्ज डॉलर्स गुंतवून हिस्सेदारी विकत घेतली, तेव्हापासूनच ‘कोपायलट’ची (एआय सॉफ्टवेअर) सेवा बाजारात आली. ‘मायक्रोसॉफ्ट’चा ‘एक्सबॉक्स’ म्हणजेच ‘गेमिंग कन्सोल’ ‘सोनी’च्या ‘प्ले स्टेशन’ला टक्कर देतो. संपूर्ण कंपनीचे भांडवली मुल्य ३ ट्रिलियन डॉलर म्हणजेच २६५ लाख कोटी रुपये इतके आहे. जगातील सर्वात बलाढ्य कंपन्यांमध्ये तिचे स्थान आहे.
 
त्यामुळेच जगभराला या घोळाचा फटका बसला. जपानमध्ये सरकारी सेवा ठप्प झाल्या. ऑस्ट्रेलियामध्ये पोलीसांची गोपनीय यंत्रणा ठप्प झाली. फिलीपिन्ससारख्या देशातील न्यायव्यवस्थेवर परिणाम झाला. यापूर्वी जुलै २०२४मध्ये ‘मायक्रोसॉफ्ट क्लाउडस्ट्राईक आऊट्रेज’ झाला होता त्यावेळी पाच हजारांहून अधिक विमानसेवा ठप्प झाल्या होत्या. ‘चेक-इन’ आणि ‘बोर्डिंग सेवा’ प्रभावित झाली होती. जानेवारी २०२३मध्ये अमेरिकेत ‘एफएए’ आणि ‘नोटॅम’ सेवा ठप्प झाल्या. तेव्हा १० हजार उड्डाणे रद्द झाली होती. तेव्हा पायलटला उड्डाण सेवांचा परिणाम दिसू शकला नाही. विमानांच्या उड्डाणांवर परिणाम दिसला. मुळात जगच इतक्या मोठी व्याप्ती असलेल्या यंत्रणेवर विसंबून राहिले असल्याने असे फटके बसणे स्वाभाविकच आहे. मात्र, अशा घटनांपासून धडे घेत तंत्रज्ञान क्षेत्रातील एकाच बलाढ्य संस्थेवरील अवलंबित्व कमी करणे गरजेचे आहे.
 




तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक. 

संबंधित मजकूर