विस्तारित ‘अग्निवीर’ योजना ः उद्याच्या रक्षणकर्त्यांचे सक्षमीकरण

    19-Nov-2026

Extended Agniveer Scheme
 
‘अग्निवीर’ ही योजना सैन्यासाठी जशी लाभदायक ठरली, तशी तिच्या योग्य अयोग्यतेची चर्चाही व्यापक प्रमाणात झाली. या योजनेचा नवा आराखडा अलीकडेच केंद्र सरकारने प्रसिद्ध केला असून, त्यानुसार अग्निवीरांना दोन वर्षे अतिरिक्त सेवेची मिळणार आहेत. या नव्या आराखड्यातील तरतुदींचा मागोवा घेणारा हा लेख...
 
जून २०२२ मध्ये सुरू करण्यात आलेली ‘अग्निवीर’ योजना, हा देशाच्या लष्करी भरतीच्या उत्क्रांतीतील ऐतिहासिक बिंदू! तरुण, चपळ, तंत्रज्ञानाशी सहज जुळवून घेणारे आणि युद्धसज्ज संरक्षण दल उभारण्याच्या उद्देशाने आखलेल्या या उपक्रमाने, देशभक्त तरुण आणि सशस्त्र दले यांच्यातील नात्याचेच आधुनिकीकरण केले. अग्निवीरांची पहिली तुकडी चार वर्षांचा सेवाकाळ पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर असतानाच, सरकारने संस्थात्मक अभिप्राय, कार्यात्मक मूल्यमापन आणि सर्वोच्च लष्करी नेतृत्वाच्या शिफारशींच्या आधारे दोन वर्षांच्या दुसर्‍या सेवाकाळाची सुधारणा आता लागू केली.
 
हा बदल राष्ट्रीय सुरक्षेच्या गरजा आणि तरुणांच्या आकांक्षांचा सुसंवादी मेळ आहे. सेवेचे पर्याय, आर्थिक पॅकेज, सेवाज्येष्ठतेचे संरक्षण आणि नियमित ‘केडर’मध्ये १०० टक्के समावेशाचे स्पष्ट मार्ग खुले करून, सुधारित ‘अग्निवीर’ योजना ही व्यवहार्य आणि तरुणपिढीला अनुकूल धोरणनिर्मितीचे उत्कृष्ट उदाहरण ठरावी. ही योजना तरुण सैनिकांच्या समर्पणाचा सन्मान करते आणि तसेच सशस्त्र दलांना सक्षम, प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देते.
 
सुधारित ‘अग्निवीर’ संरचनेचे स्वरूप : २०२२च्या मूळ आराखड्यानुसार, उमेदवारांना चार वर्षांच्या सेवेसाठी घेतले जाई. त्यानंतर गुणवान अग्निवीरांपैकी २५ टक्के जणांची नियमित ‘केडर’साठी निवड केली जाणार होती. या चार वर्षांच्या सखोल आढाव्यानंतर, प्रशिक्षित जवान कार्यक्षमतेच्या शिखरावर असतानाच, त्यांना सेवेत कायम ठेवण्याची शिफारस लष्करी नेतृत्वाने केली. ७५ टक्के अग्निवीर सेवामुक्त होण्याच्या काही आठवडे आधीच सरकारने तत्परतेने ही संकल्पना प्रत्यक्षात आणत, त्यांना दोन वर्षांची मुदतवाढ दिली. सुधारित व्यवस्थेमुळे दोन-स्तरीय प्रगतीचा मार्ग तयार होतो. चार वर्षांची मूलभूत सेवा पूर्वीप्रमाणेच अखंडपणे सुरू राहील. हा कार्यकाळ संपल्यानंतर, इच्छुक आणि गुणवान २५ टक्के अग्निवीरांचा थेट भारतीय सशस्त्र दलांमध्ये समावेश केला जाईल. सेवा सुरू ठेवू इच्छिणार्‍या उर्वरित ७५ टक्के अग्निवीरांसाठी, दोन वर्षांच्या सेवेचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. या दुसर्‍या सेवाकाळानंतर, निकष पूर्ण करणार्‍या सर्व इच्छुक अग्निवीरांना नियमित ‘केडर’मध्ये भरतीचा प्रस्ताव दिला जाईल. अशाप्रकारच्या सुधारणेमुळे प्रशिक्षित लष्करी गुणवत्तेचा जराही अपव्यय होणार नाही. शिवाय, प्रत्येक अग्निवीराला दीर्घकालीन नियमित लष्करीसेवेचा मार्ग उपलब्ध होईल.
 
सर्वसमावेशक लाभ आणि आर्थिक सुरक्षा : सुधारित योजनेमुळे तरुण जवानांना आर्थिक, करिअरविषयक आणि वैयक्तिक लाभही मिळतात. दुसर्‍या सेवाकाळात अग्निवीरांना वाढीव निश्चित मासिक वेतन आणि लागू असलेले भत्ते मिळतील; मुदतवाढीच्या पहिल्या वर्षी दरमहा रु. ४३ हजार ५०० आणि दुसर्‍या वर्षी दरमहा रु. ४७ हजार ५००/- इतके वेतन मिळेल. शिवाय, दुसर्‍या सेवाकाळात सेवा निधी कोषातील सरकारचे योगदान वाढवून, मासिक वेतन पॅकेजच्या तब्बल ७० टक्के करण्यात आले आहे. सहा वर्षांनंतर नागरी जीवनात परतण्याचा पर्याय निवडणार्‍यांना, जमा व्याज वगळता, १०.९२ लाखांचा आयकरमुक्त सेवा निधी मिळेल. यामुळे सेवा पूर्ण करून बाहेर पडणार्‍या अग्निवीराकडे स्वत:चे आणि कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी भरीव भांडवल उपलब्ध असेल. कर्तव्य बजावताना मृत्यू झाल्यास अग्निवीराच्या कुटुंबाला/निकटच्या नातेवाईकांना विनाअंशदायी जीवनविमा रु. ४८ लाख आणि सानुग्रह अनुदान रु. ४४ लाख एकरकमी मिळणार. सेवा न झालेल्या कालावधीचे वेतन, चार वर्षांच्या कार्यकाळातील उर्वरित कालावधीचे पूर्ण वेतन, अपेक्षित सेवा निधी योगदानही मिळणार आहे. ’आर्ल्ड फोर्सेस बॅटल कॅज्युअल्टी फंड’सारख्या स्रोतांकडून, सुमारे रु. ८ लाख आणि कल्याणकारी संघटनांकडूनही अनुदान मिळेल.
 
सेवाज्येष्ठतेचे पूर्ण संरक्षण : नियमित ‘केडर’मध्ये समावेश होण्यापूर्वी, अतिरिक्त दोन वर्षे सेवा केल्याने आपल्या करिअरवर परिणाम होईल का? ही तरुण अग्निवीरांमधील एक महत्त्वाची चिंता. हे धोरण सर्व जवानांच्या सेवाज्येष्ठतेचे स्पष्टपणे संरक्षण करते. दुसर्‍या सेवाकाळानंतर नियमित ‘केडर’मध्ये समाविष्ट होणार्‍या अग्निवीरांना, चार वर्षांनंतर नियमित सेवेत दाखल त्यांच्या सहकार्‍यांच्या नंतरचे स्थान मिळेल. यामुळे ते कधीही कनिष्ठ ठरणार नाहीत. शिवय, त्यांच्या पदोन्नतीच्या संधी आणि व्यावसायिक प्रतिष्ठा अबाधित राहील.
 
देशव्यापी विस्तार :‘अग्निवीर’ उपक्रमाने भरतीची व्याप्ती देशातील प्रत्येक जिल्ह्यापर्यंत पोहोचली. यातून खर्‍या अर्थाने लोकशाहीवादी, पारदर्शक निवड यंत्रणा निर्माण झाली. विशेष म्हणजे, या योजनेने सैन्याच्या विविध शाखा, महिला अग्निवीरांसाठी खुल्या झाल्या.
 
ऐकणारे आणि कृती करणारे सरकार ;प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे धोरणांचा आढावा घेणे, त्यांत सुधारणा करुन, ती प्रभावी करणे, यासाठी लागणारे धैर्य हीच सुशासनाची खरी ओळख आहे. ‘अग्निवीर’ योजनेचा विस्तार हे पुराव्यावर आधारित धोरणनिर्मितीचे उत्कृष्ट उदाहरण. प्रशिक्षित सैनिकांना सहा वर्षे सेवेत ठेवल्यास युद्धसज्जता आणि ‘रेजिमेंट’ची ताकद लक्षणीयरीत्या वाढते, असे कमांडर आणि लष्करी संस्थांनी कळवल्यावर प्रशासनाने त्यानुसार कार्यवाही केली. हाच व्यवहार्य दृष्टिकोन राष्ट्रनिर्माणाच्या इतर क्षेत्रांतही परिवर्तनकारी ठरला आहे. उदाहरणार्थ, चार वर्षांच्या सल्लामसलतीतून २९ गुंतागुंतीचे आणि कालबाह्य कामगार कायदे चार आधुनिक संहितांमध्ये एकत्रित करणे; सुटसुटीत ‘जीएसटी २.०’ संरचना आणि गुन्हेगारीमुक्तीविषयक सुधारणा करणे आणि देशांतर्गत सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांच्या संरक्षणासाठी २०१९ मध्ये, ‘आरसीईपी’मधून माघार घेऊन द्विपक्षीय मुक्त व्यापार करारांवर लक्ष केंद्रित करणे.
 
उल्लेखनीय बाब म्हणजे, सरकारने ‘अग्निवीर’ योजना सुरुवातीला लागू केली, तेव्हा इतक्या कमी कालावधीत प्रशिक्षणाचा कितपत दर्जा गाठता येईल, याबाबत सशस्त्र दलांतीलच अनेकजण साशंक होते. म्हणूनच, सरकारने एकूण तुकडीपैकी सर्वोत्तम प्रशिक्षित केवळ २५ टक्के जणांनाच स्वीकारण्याचे ठरवले. मात्र, चार वर्षे अनुभवल्यानंतर सशस्त्र दलांतील त्याच वरिष्ठ नेतृत्वाने, अधिक जणांना सेवेत कायम ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. उर्वरित ७५ टक्के अग्निवीरांना अतिरिक्त दोन वर्षांचा ऐच्छिक कालावधी देऊन, वैयक्तिक क्षमता विकासाठी अतिरिक्त वेळ देणे आणि दीर्घकालीन सेवा सुरू ठेवण्याचाही पर्याय देणे, याचे श्रेय सरकारच्या दूरदृष्टीलाच जाते. यामुळे एक संस्था म्हणून सशस्त्र दलांची संपूर्ण गरज पूर्ण होतेच, शिवाय प्रत्येक अग्निवीराला सेवा सुरू ठेवण्याचे किंवा अन्य करिअर निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळते.
 
तरुण अग्निवीरांसाठी प्रोत्साहनाचा संदेश : गणवेश परिधान करणार्‍या शूर तरुणांना एक स्पष्ट संदेश जातो की, "तुम्ही आधुनिक आणि कणखर भारताचे अग्रदूत आहात. तुमचा उत्साह, तंत्रज्ञानातील प्रावीण्य, अतुलनीय शिस्त आणि उच्च मनोबलामुळे तुम्ही देशाची सर्वोच्च प्रशंसा मिळवली आहे. सुधारित अग्निवीर आराखडा, तुमच्या क्षमतांवरचा विश्वास आहे. तुमचे कठोर परिश्रम, त्याग आणि बांधिलकीला पाठबळ, करिअरचे स्पष्ट मार्ग आणि आर्थिक सुरक्षा लाभेल, याची हमी हा आराखडा देतो.” त्यांचा प्रवास नियमित सेवेतील आजीवन सेवेकडे नेणारा असो किंवा नागरी क्षेत्रातील अन्य भूमिकांकडे, अग्निवीर सेवेचा काळ त्यांना जागतिक दर्जाची कौशल्ये, नेतृत्वगुण आणि राष्ट्रसेवेची अढळ मूल्यनिष्ठा प्रदान करतो. ‘अग्निवीर’ योजना करिअरबरोबरच, भारताचे भवितव्यही घडवते.
 
नेपाळी गोरखांची भरती : गोरखा सैनिक दोन शतकांहून अधिक काळ, भारतीय लष्करात कर्तव्य बजावत आहेत. १८१५ ते १९४७ याकाळात त्यांनी ब्रिटिश भारतीय लष्करात सेवा केली. स्वातंत्र्यानंतर काठमांडूशी सलोख्याचे संबंध राखण्यासाठी, भारताने नेपाळी सैनिकांना सेवेत कायम ठेवण्यास सहमती दर्शवली. त्यांच्या शौर्याची एक गौरवशाली गाथा आहे. मात्र, गेल्या चार वर्षांत नेपाळमधून एकाही गोरखा सैनिकाची भारतीय लष्करात भरती झाली नाही. कारण, जून २०२२ मध्ये सुरू झालेल्या ‘अग्निवीर’ योजनेत, केवळ चार वर्षांची सेवा देऊ केली होती. त्यानंतर हे प्रशिक्षित नेपाळी सैनिक कुठे जाणार? हा प्रश्न असल्याने, ही व्यवस्था तर्कसंगत नव्हती. यातून सुरक्षेचे मोठेच आव्हान निर्माण होऊ शकते. आता नेपाळ सरकार एक संधी म्हणून हा बदल स्वीकारून भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करेल, अशी आशा आहे. यासाठी भारत सरकारने नेपाळ सरकारशी सक्रियपणे संवाद साधून, या क्रांतिकारी बदलांची माहिती पोहोचवली पाहिजे.
 
निष्कर्ष ः सर्वांसाठी लाभदायक स्थिती:-विस्तारित ‘अग्निवीर’ योजनेने दोन अत्यावश्यक उद्दिष्टांचा यशस्वीपणे मेळ साधला. पहिले म्हणजे, आपल्या सैनिकांच्या करिअरविषयक अपेक्षा आणि कल्याणाचा सन्मान राखत तरुण, आधुनिक आणि किफायतशीर सैन्य टिकवणे. तर, दुसरे म्हणजे, स्पष्ट निवड मार्ग, आर्थिक पाठबळ, सेवाज्येष्ठता आणि सेवेच्या विस्तारित संधींमुळे हे धोरण संरक्षण आधुनिकीकरणातील एक मापदंड ठरले. ‘विकसित भारत २०४७’च्या भविष्याकडे भारत आत्मविश्वासाने वाटचाल करताना, सीमांचे रक्षण अधिक तरुण, तंदुरुस्त, तंत्रज्ञानाने सक्षम आणि देशवासीयांचा मनापासून आदर लाभलेले दल करत आहे. आपल्या तरुण अग्निवीरांना संदेश स्पष्ट आहे, ‘कृतज्ञ राष्ट्र तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे हे जाणून, अभिमानाने आणि ताठ मानेने पुढे चला.’
 
(लेखक भारतीय लष्कराच्या दक्षिण-पश्चिम, पूर्व आणि मध्य कमांडचे माजी आर्मी कमांडर आहेत.)
लेखक- (नि) ले.जनरल. अभय कृष्ण
 




संबंधित मजकूर