ठाणे (Thane Baby Kidnapping) : ठाण्यातील माजिवडा परिसरातून चार महिन्यांच्या बालिकेचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत चितळसर पोलिसांनी अवघ्या दहा तासांत बालिकेचा शोध घेऊन तिची सुखरूप सुटका केली. या प्रकरणी ५२ वर्षीय कमल दत्तू मोरे या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे.
माजिवडा येथील पेट्रोल पंपाजवळ राहणारे २७ वर्षीय फिर्यादी ७ नोव्हेंबर रोजी सकाळी चितळसर पोलीस ठाण्यात आले होते. त्यांची चार महिन्यांची मुलगी सकाळी ५ ते ७ या वेळेत अज्ञात व्यक्तीने कायदेशीर रखवालीतून पळवून नेल्याची तक्रार त्यांनी दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ?(Thane Baby Kidnapping)
घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वरकडे यांनी वरिष्ठांना माहिती दिली. पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांच्या सूचनेनुसार परिमंडळ ५ मधील पाच तपास पथके बालिकेच्या शोधासाठी रवाना करण्यात आली. कापूरबावडी परिसर, ठाणे रेल्वे स्थानक आणि कळवा परिसरात गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे शोधमोहीम राबविण्यात आली. (Thane Baby Kidnapping)
अखेर कळवा येथील सायबा नगर परिसरातील सार्वजनिक बांधकामाच्या बाजूला असलेल्या शौचालयाजवळ ५२ वर्षीय कमल दत्तू मोरे ही महिला बालिकेसह आढळून आली. तिच्या ताब्यातून बालिकेची सुखरूप सुटका करून तिला आईच्या स्वाधीन करण्यात आले. (Thane Baby Kidnapping)
पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त अशोक दुघे, उपायुक्त प्रशांत कदम आणि सहायक पोलीस आयुक्त ममता डिसोझा यांच्या मार्गदर्शनाखाली ही शोधमोहीम राबविण्यात आली. (Thane Baby Kidnapping)