आशुतोष दीक्षित भारताचे नवे एअर चीफ मार्शल; एपी सिंह यांच्या निवृत्तीनंतर स्वीकारला पदभार

    31-Oct-2026   
 
Ashutosh Dixit New Air Chief
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी भारतीय हवाई दलाच्या नव्या प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली. एअर चीफ मार्शल (माजी) अमर प्रीत सिंह यांच्या निवृत्तीनंतर आशुतोष दीक्षित यांनी पदभार स्वीकारला. ए.पी. सिंह यांना आतापर्यंत तीन अधिकृत निरोप समारंभांद्वारे निरोप देण्यात आला आहे. यामध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचाही समावेश आहे. पदावरील त्यांच्या कार्यकाळातील अखेरच्या दिवशी, म्हणजेच शनिवारी त्यांना औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देऊन निरोप देण्यात आला. (Ashutosh Dixit New Air Chief)
 
एअर मार्शल आशुतोष दीक्षित हे भारतीय हवाई दलातील स्वदेशी विमाने आणि संरक्षण उपकरणांना प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांकरिता ओळखले जातात. हलके लढाऊ विमान (एलसीए) तेजससह हवाई दलाच्या अन्य स्वदेशी विमान प्रकल्पांना पुढे नेण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. संरक्षण क्षेत्रातील सरकारच्या आत्मनिर्भरतेच्या मोहिमेला त्यांच्या नेतृत्वाखाली आणखी बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Ashutosh Dixit New Air Chief)
 
एअर मार्शल दीक्षित यांना ६ डिसेंबर १९८६ रोजी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमान विभागात कमिशन मिळाले होते. त्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), बांगलादेशमधील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज आणि नॅशनल डिफेन्स कॉलेज येथे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांच्या नावावर ३,५०० तासांहून अधिक विमान उड्डाणाचा अनुभव आहे. (Ashutosh Dixit New Air Chief)
 
संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या ऑपरेशनल आणि प्रशासकीय पदांची जबाबदारी सांभाळली आहे. कमांडिंग ऑफिसर म्हणून त्यांनी क्रमांक ९ स्क्वॉड्रनमध्ये मिराज-२००० लढाऊ विमानांचा समावेश केला. त्यानंतर त्यांनी पश्चिम विभागातील एका महत्त्वाच्या अग्रिम लढाऊ हवाई तळाची आणि दक्षिण विभागातील एका प्रमुख लढाऊ विमान प्रशिक्षण तळाची धुरा सांभाळली. (Ashutosh Dixit New Air Chief)
 
त्यांनी दक्षिण हवाई कमांडमध्ये हवाई संरक्षण कमांडर म्हणूनही काम केले आहे. याशिवाय हवाई दलाच्या मुख्यालयात (वायू भवन) सहायक हवाई दलप्रमुख (प्रकल्प) आणि सहायक हवाई दलप्रमुख (नियोजन) यांसारख्या महत्त्वाच्या पदांवरही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. देशाप्रती केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल एअर मार्शल दीक्षित यांना अनेक लष्करी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. यामध्ये २००६ मध्ये वायुसेना पदक, २०११ मध्ये विशिष्ट सेवा पदक, २०२३ मध्ये अति विशिष्ट सेवा पदक आणि २०२६ मध्ये परम विशिष्ट सेवा पदक यांचा समावेश आहे. (Ashutosh Dixit New Air Chief)
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर