लंडन (Hindu Population in Pakistan) : पाकिस्तानातील हिंदू आणि अन्य धार्मिक अल्पसंख्याकांच्या परिस्थितीबाबत ब्रिटनस्थित ‘इनसाइट यूके’ या हिंदू संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. संघटनेच्या अहवालानुसार, १९४१ मध्ये सध्याच्या पाकिस्तानच्या भूभागात हिंदूंची लोकसंख्या १४.६ टक्के होती. आता ती सुमारे १.७ टक्क्यांवर आल्याचा दावा करण्यात आला आहे. फाळणीनंतरचे विस्थापन, हिंसा, मालमत्तेवरील हक्क गमावणे आणि कथित जबरदस्तीचे धर्मांतर ही यामागील प्रमुख कारणे असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. (Hindu Population in Pakistan)
अहवालानुसार, १९४७ च्या फाळणीदरम्यान आणि त्यानंतर हजारो हिंदू कुटुंबांना आपली घरे सोडावी लागली. अनेक कुटुंबांच्या वडिलोपार्जित जमिनी आणि शेतजमिनींवरही त्यांना हक्क गमवावा लागल्याचा दावा करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या मालमत्ताविषयक कायद्यांमुळे भारतात स्थलांतरित झालेल्या नागरिकांच्या संपत्तीवर सरकारने ताबा घेतल्याचा मुद्दाही अहवालात उपस्थित करण्यात आला आहे. (Hindu Population in Pakistan)
महिलांच्या अपहरणाचा आरोप
पाकिस्तानात दरवर्षी एक हजार किंवा त्याहून अधिक हिंदू आणि ख्रिश्चन महिला व मुलींचे अपहरण केले जाते. त्यानंतर त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर करून विवाह लावले जातात, असा गंभीर आरोप अहवालात करण्यात आला आहे. यामध्ये अल्पवयीन मुलींचाही समावेश असल्याचे संघटनेने म्हटले आहे. या दाव्यांची स्वतंत्र पुष्टी आवश्यक आहे. (Hindu Population in Pakistan)
पाकिस्तानच्या संविधानातील अनुच्छेद ४१ आणि ९१ नुसार राष्ट्रपती आणि पंतप्रधानपदासाठी मुस्लिम असणे आवश्यक आहे. त्यामुळे धार्मिक अल्पसंख्याकांना सर्वोच्च घटनात्मक पदांवर संधी नसल्याचा मुद्दाही अहवालात उपस्थित करण्यात आला आहे. (Hindu Population in Pakistan)
ब्रिटिश सरकारकडे पाच मागण्या
पाकिस्तानातील मंदिरांची सुरक्षा, धार्मिक छळाच्या प्रकरणांची जलद सुनावणी, ब्रिटनकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीचा मानवाधिकार सुधारणांशी संबंध, ब्रिटिश उच्चायुक्तालयात अल्पसंख्याक प्रतिनिधींची नियुक्ती आणि छळग्रस्तांना ब्रिटनमध्ये आश्रय मिळण्यासाठी सुरक्षित व्यवस्था, अशा पाच मागण्या संघटनेने केल्या आहेत. (Hindu Population in Pakistan)