साधना ते संवेदना!

    28-Oct-2026
 
Sadguru Mangeshda Kriyayog Foundation
 
‘सद्गुरू मंगेशदा क्रियायोग फाऊंडेशन’ ही एक नोंदणीकृत समाजोपयोगी संस्था असून या संस्थेची स्थापना परमपूज्य सद्गुरू योगीराज डॉ. मंगेशदांनी अनेक वर्षांपूर्वी केली. क्रियायोगाचा प्रसार, प्रचार त्याचसोबत विविध स्वरूपाची समाजोन्नतीची कार्ये संपन्न व्हावी व आपल्या शिष्यांमध्ये नि:स्वार्थ सेवेची आवड निर्माण व्हावी, सेवावृत्ती अंगी बाणावी, या उद्देशाने डॉ. मंगेश वढावकर यांनी या फाऊंडेशनची स्थापना केली. ‘सद्गुरू मंगेशदा क्रियायोग फाऊंडेशन’च्या कार्याचा मागोवा घेऊ.
 
‘वैश्विक बंधुभाव व शांततेसाठी निरपेक्ष प्रेम व निरपेक्ष क्षमाशीलता’ या संस्थेच्या ब्रीदानुसार ‘सद्गुरू मंगेशदा क्रियायोग फाऊंडेशन’ची विश्वभरांतील ९५ केंद्रे सक्रिय आहेत. डॉ. मंगेशदा हे एक कर्मयोगी असून आपले सर्व जीवन त्यांनी क्रियायोगाच्या माध्यमातून समाजाच्या मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक उन्नतीसाठी वाहून घेतले आहे. फाऊंडेशनतर्फे अनेक समाजोपयोगी उपक्रम चालवले जातात, ज्यात ‘आय प्लेज-वी प्लेज’ हा महत्त्वाकांक्षी ‘नेत्रदान जागृती अभियान’ (ज्यात आतापर्यंत करोडो लोकांनी नोंदणी केलेली आहे), तुळस वाटप मोहीम, महिला सक्षमीकरणासाठी स्वसंरक्षण वर्ग, मोफत योग शिबिरं, वृक्षारोपण, स्वच्छता मोहिमा (ज्यात मुंबई ते कैलास मानससरोवर या आंतरराष्ट्रीय स्वच्छता मोहिमेचा समावेश आहे), शालेय विद्यार्थ्यांसाठी योग वर्ग, ‘इंडियन कॅन्सर सोसायटी’ आदींसाठी निधीची मदत, शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप आदी अनेक उपक्रमांचा समावेश आहे.
 
योगाकडे केवळ शारीरिक व्यायाम म्हणून न पाहता, त्यामागील तत्त्वे, अभ्यासपद्धती आणि दैनंदिन जीवनातील उपयोग समजून घेण्यावर त्यांच्या कामात भर दिला जातो. योग, ध्यान, श्वसन आणि शिस्तबद्ध जीवनशैली यांचा आरोग्याशी असलेला संबंध लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम विविध माध्यमांतून केले जाते. त्याचवेळी योगाबाबत अंधश्रद्धा किंवा गैरसमज वाढू नयेत, यासाठी विवेकपूर्ण विचार आणि प्रत्यक्ष अभ्यासाला महत्त्व देण्याची भूमिका मांडली जाते. योगाचा नियमित सराव हा दैनंदिन जीवनाचा भाग कसा बनवता येईल, यावरही भर दिला जातो.
 
याचबरोबर योगाचा प्रसार वेगवेगळ्या वयोगटांपर्यंत करण्यासाठी योगशिक्षकांच्या माध्यमातून शाळा आणि अन्य ठिकाणी योग व ध्यानाचे प्रशिक्षण देण्याचे उपक्रम राबविले जातात. मुलांमध्ये लहान वयापासून शारीरिक हालचाल, एकाग्रता आणि शिस्त यांची सवय लागावी, तर ज्येष्ठांना त्यांच्या वयाला अनुरूप योगाभ्यासाची ओळख व्हावी, यासाठी वेगवेगळ्या पातळीवर काम केले जाते, तर ‘आय प्लेज, वी प्लेज’ या अभियानातून मरणोत्तर नेत्रदानाबाबत जनजागृती करण्यात आली. नेत्रदानाची संकल्पना समाजापर्यंत पोहोचविणे आणि त्याबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी माहितीपर उपक्रम घेणे, हा या अभियानाचा भाग आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही तिच्या नेत्रदानातून दुसर्‍याच्या आयुष्यात उपयोग होऊ शकतो, ही सामाजिक जाणीव वाढविण्यासाठी अशा जनजागृती उपक्रमांची भूमिका महत्त्वाची ठरते.
 
योगप्रसार आणि सामाजिक कार्यासाठी डॉ. मंगेशदा यांना यापूर्वी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मॉरिशस येथील ‘योग शिरोमणी’, बाली येथील ‘ग्लोबल इंडियन अचिव्हर अ‍ॅवॉर्ड’, ‘ए. पी. जे. अब्दुल कलाम अ‍ॅवॉर्ड’, ‘महात्मा गांधी अहिंसा सन्मान’, ‘इंडो-व्हिएतनाम अ‍ॅवॉर्ड’, ‘योग रत्न पुरस्कार’ आणि ‘इंटरनॅशनल आयकॉनिक अ‍ॅवॉर्ड’ यांचा त्यात समावेश आहे. लंडन येथे २०२६ मध्ये त्यांना ‘विश्व लीडर डॉ. बी. आर. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला, तर योगाचा प्रसार किती लोकांपर्यंत पोहोचला, याबरोबरच त्यातून समाजात कोणती जाणीव निर्माण होते, हा प्रश्नही महत्त्वाचा ठरतो. आरोग्य, शिस्त, सामाजिक सहभाग आणि इतरांच्या गरजांकडे पाहण्याची संवेदना या बाबी एकत्र आणण्याचा प्रयत्न डॉ. मंगेशदा यांच्या विविध उपक्रमांतून केला जात आहे. त्यामुळे योग हा केवळ स्वतःपुरता केलेला अभ्यास न राहता, समाजाशी जोडणारे माध्यम ठरू शकतो, अशी या कार्याची दिशा आहे.
 
- ऋषिकेश आंबये




संबंधित मजकूर