नागालॅण्डमध्ये आरोग्यसेवेतून माणुसकीचा सेतू

    28-Oct-2026
 
Nagaland Free Medical Camp
 
आरोग्यसेवा ही केवळ आजारांवर उपचार करण्यापुरती मर्यादित नसते; ती माणसांच्या मनात विश्वास निर्माण करते, आशेचा किरण दाखवते आणि परस्परांतील नाती अधिक दृढ करते. याच सेवाभावी भावनेतून महाराष्ट्रातील वैद्यकीय पथकाने ‘आसाम रायफल्स’च्या सहकार्याने नागालॅण्डमधील दुर्गम भागांत आरोग्यसेवेचा उपक्रम राबविला. दि. १२ ऑक्टोबर रोजी भारत-म्यानमार सीमेजवळील मेलुरी येथे बहुविशेषज्ञ मोफत वैद्यकीय शिबीर आयोजित करण्यात आले होते. दुर्गम भागात राहणार्‍या नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. त्या पार्श्वभूमीवर सेवाभावी उपक्रमाचा मागोवा या लेखात घेतला आहे.
 
महाराष्ट्रातील वैद्यकीय पथकाने ‘आसाम रायफल्स’च्या सहकार्याने नागालॅण्डमधील दुर्गम भागांत आरोग्यसेवेचा उपक्रम राबविला. त्यानुसार भारत-म्यानमार सीमेजवळील मेलुरी येथे बहुविशेषज्ञ मोफत वैद्यकीय शिबीर आयोजित करण्यात आले होते. भारत आणि म्यानमारच्या सीमेवरील देशबांधवांसाठी आरोग्य शिबीर आयोजित करताना खर्‍या अर्थाने जाणवले की, डॉक्टरांचे कर्तव्य रुग्णालयाच्या चार भिंतींपुरते मर्यादित नसते. जिथे उपचारांची गरज आहे, तिथे पोहोचणे, रुग्णांचे म्हणणे समजून घेणे आणि त्यांना योग्य वैद्यकीय मार्गदर्शन देणे, हाच सेवेचा खरा गाभा आहे.
 
हा सीमाभाग सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. सीमाभाग असल्याने, तसेच भौगोलिक स्थितीमुळे या परिसरात आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करणे, हे आव्हान आहे. मात्र, हे आव्हान भारत सरकारने यशस्वीरीत्या पेलले. या पार्श्वभूमीवर समाज आदि देशाप्रति कर्तव्य बजावण्यासाठी या आरोग्य शिबिराचे आयोजन केले, तेव्हा जाणवले की अशा प्रकारच्या शिबिरांची इथे खरी गरज आहे. कारण आरोग्यसेवेचा लाभ घेण्यासाठी काही ग्रामस्थ अक्षरशः तब्बल नऊ ते दहा किमीचा प्रवास करून आले होते. त्यांचा प्रतिसाद आणि उपचारांबद्दलची अपेक्षा यातून एकच जाणवले की, या शिबिरांचे महत्त्व शब्दातीत आहे, तर या वैद्यकीय शिबिरांमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांना तपासणी, वैद्यकीय मार्गदर्शन आणि औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले. सामान्य औषधोपचार, त्वचारोग, अस्थिरोग, स्त्रीरोग आणि दंतचिकित्सा अशा विविध विभागांतून रुग्णांची तपासणी करण्यात आली. नोंदणी, औषधवितरण आणि रुग्णांना योग्य विभागापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. स्थानिक भाषेतील अडचणी दूर करून डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात संवाद साधण्यासाठी आशा सेविकांचे सहकार्य विशेष महत्त्वाचे ठरले.
 
या संपूर्ण मोहिमेच्या यशामध्ये ‘आसाम रायफल्स’चे नियोजन, समन्वय आणि सहकार्य महत्त्वाचे आहेे. मेलुरी येथील शिबिराच्या व्यवस्थापनात मेजर अभिषेक शिगवन यांचे विशेष योगदान लाभले. दुर्गम भागांतील प्रवास, निवास, भोजन आणि शिबिराच्या व्यवस्थापनासाठी लष्करी यंत्रणेने केलेल्या सहकार्यामुळे वैद्यकीय पथकाला आपले काम अधिक परिणामकारकपणे करता आले. किफिरे येथील शिबिरानंतर ३० ‘आसाम रायफल्स’च्या ‘रायझिंग सन बटालियन’तर्फे वैद्यकीय पथकासाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर कर्नल राजेश शर्मा यांनी डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबीयांना स्नेहभोजनासाठी आमंत्रित केले. या भेटीदरम्यान बटालियनतर्फे पथकाला स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. प्रत्युत्तरादाखल डॉ. ऋषिकेश परमार यांनी महाराष्ट्रातून आणलेल्या उपरण्यांनी अधिकार्‍यांचा सन्मान केला, तर डॉ. पर्वणी यांनी विशेष भेटवस्तू प्रदान केली. प्रसंगी वैद्यकीय पथकाच्यावतीने ‘देव देश प्रतिष्ठान’तर्फे मी, अधिकारी आणि जवानांच्या देशसेवेतील समर्पणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. दुर्गम भागांमध्ये देशाच्या सुरक्षेसोबतच स्थानिक नागरिकांच्या कल्याणासाठी कार्य करणार्‍या जवानांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे नमूद केले. तसेच अधिकाधिक तरुण डॉक्टरांनी अशा सेवाभावी मोहिमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
 
या शिबिराच्या सेवाअनुभवावर माझे मित्र डॉ. ऋषिकेश परमार यांचे विधान आठवते. ते म्हणतात, ”आपल्या सुखासीनतेच्या चौकटीतून बाहेर पडून ज्यांना सेवेची सर्वाधिक गरज आहे, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचतो, तेव्हाच सेवेचा खरा अर्थ उलगडतो.” त्यांच्या म्हणण्यातले सत्य आणि तथ्य या शिबिरादरम्यान आम्हाला अनुभवायला मिळाले. याचअनुषंगाने आम्ही आमच्या ज्ञानकौशल्याचा उपयोग डॉक्टर म्हणून दुर्गम भागातील समाजबांधवांसाठी करत होतो, महाराष्ट्रातून आसामच्या सीमाभागात येऊन आरोग्य शिबिराचे आयोजन करताना समाधान वाटत होते. या मोहिमेत माझ्यासोबत डॉ. ऋषिकेश परमार, डॉ. सुधीर भंबर, डॉ. योगिता भंबर, डॉ. पर्वणी भंबर, डॉ. अवधूत कंटक, डॉ. श्रद्धा चौधरी, डॉ. सीमा केळकर, डॉ. सचिन जिभकाते, डॉ. आनंद लिमये, डॉ. ओमप्रकाश गजरे आणि वृषाली कौल यांच्यासह सपोर्ट स्टाफमधील स्वप्नील वैद्य आणि जयगणेश मुरुगन सहभागी झाले होते.
 
त्यानंतर दि. १३ ऑक्टोबर रोजी वैद्यकीय पथकाने किफिरे जिल्हा रुग्णालयात सेवा दिली. प्रवासादरम्यान वाहनाचा किरकोळ अपघात झाला; मात्र सुदैवाने सर्वजण सुरक्षित राहिले आणि नियोजित वैद्यकीय उपक्रम पुढे सुरू ठेवण्यात आला. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चिक्रोजो किझो आणि त्यांच्या सहकार्‍यांनी पथकाचे स्वागत करून आवश्यक सहकार्य केले. शिबिराच्या आयोजनात आणि समन्वयात ‘आसाम रायफल्स’च्या अधिकार्‍यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. लष्करी वैद्यकीय अधिकारी आणि स्थानिक आरोग्य यंत्रणेच्या समन्वयामुळे रुग्णांना तपासणी, वैद्यकीय सल्ला आणि औषधोपचार उपलब्ध करून देणे शक्य झाले. सेवेचा हात पुढे केला की अंतर कमी होते, विश्वास वाढतो आणि माणुसकी अधिक समृद्ध होते.
 
तसेच या दौर्‍याचा उद्देश केवळ वैद्यकीय सेवा देणे एवढाच नव्हता, तर स्थानिक समुदायांच्या गरजा समजून घेणे, त्यांच्याशी विश्वासाचे नाते निर्माण करणे आणि भविष्यातील सहकार्याच्या संधी विकसित करणे, हाही होता. या मोहिमेसोबत पत्रकारिता आणि जनसंवाद विषयाचे विद्यार्थीही सहभागी झाले होते. त्यांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक अनुभवांची व्याप्ती वाढावी, या दृष्टीने डॉ. ऋषिकेश परमार यांनी या विद्यार्थ्यांना नाशिक आणि मुंबई येथे आमंत्रित करण्याची इच्छा व्यक्त केली. अशा देवाणघेवाणीतून विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची संस्कृती, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक जीवन जवळून अनुभवता येईल. त्याचबरोबर महाराष्ट्र आणि ईशान्य भारतातील तरुणांमध्ये परस्पर समज, मैत्री आणि सहकार्याची भावना अधिक दृढ होईल. आपण म्हणत असतो की, ‘चलो जलाए दीप वहाँ जहाँ अब भी अंधेरा हैं|’ तर हा आरोग्यसेवेचा दीप भारत-म्यानमारच्या सीमाभागामध्ये आपल्या देशबांधवासांठी प्रज्वलित झाला आहे.
 
डॉ. वैभव देवगिरकर
९८६९६९७९५८




संबंधित मजकूर