हृदयाची गिरीभरारी...

    28-Oct-2026
 
Hridaya Chavan Young Mountaineer
 
कणखर सह्यकड्यातून मिळालेल्या प्रेरणेच्या आधारे सैन्यात भरती होऊन देशसेवेचे स्वप्न बालवयात पाहणार्‍या हृदया चव्हाणविषयी...
 
डोंगराची वाट धरली की, गाव मागे पडतं. घरं, माणसं, गाड्यांचा गोंगाट हळूहळू दूर जातो आणि भोवताली उरतं ते रान, झाडं, दगडधोंडे आणि आभाळाशी गप्पा मारणारी सह्याद्रीची शिखरं! एखादी वाट झाडीत हरवलेली, एखादी कातळावरून जाणारी, तर एखादी थेट गडाच्या माथ्यावर नेणारी! प्रत्येक वाटेचा स्वभाव निराळा. कुठे चढण दम काढते, कुठे पाय घसरतील अशी धाकधूक वाटते, तर कुठे एखाद्या वळणावरून दिसणारं दृश्य सारा शीण विसरायला लावतं. गिरीभ्रमणात डोंगर सर करण्याची घाई नसतेच मुळी; त्याच्या वाटेवरचे दगड, माती, झाडं आणि वार्‍याची सोबत अनुभवायची असते. गडकोटांच्या पायथ्याशी उभं राहिलं की, इतिहासाची आठवण होते आणि माथ्यावर पोहोचलं की, आपल्या प्रयत्नांचं समाधान मिळतं. म्हणूनच, डोंगरवाटांची ओढ एकदा का मनाला लागली की, पाय आपोआपच पुढच्या मोहिमेची वाट पाहू लागतात. सह्याद्रीची ही भटकंती माणसाला निसर्गाच्या अधिक जवळ नेते आणि जगण्याकडे पाहण्याची नवी दृष्टीही देते. म्हणूनच, गिरीभ्रमण ही आयुष्याकडे अधिक उंचीवरून पाहायला शिकवणारी एक समृद्ध जीवनशाळा ठरते. या शाळेतील विद्यार्थिनी म्हणजे, हृदया चव्हाण!
 
हृदयाचा जन्म २०१४ मध्ये बोरिवली इथला. पण, बालपण मात्र दादरमध्येच गेलं. हृदयाचं बालपण सर्वसामान्य मुलांसारखंच गेलं. बाबा अमित इंजिनिअर, तर आई आरती गृहिणी. सर्वसामान्य मराठी कुटुंबात लहानाची मोठी होत असलेल्या हृदयावर गिर्यारोहणाचे संस्कार झाले, ते तिच्या बाबांमुळे! हृदयाच्या वडिलांना गिर्यारोहणाची आवड असल्याने लेकीलाही हे विश्व दाखवावं, या विचाराने त्यांनी हृदया लहान असतानाच तिला बरोबर नेण्यास सुरुवात केली. पाच वर्षांची असल्यापासून बाबांचा हात धरून किल्ले बघण्याचा, डोंगरदर्‍या सर करण्याचा तिचा प्रवास सुरू झाला. लहानपणी लागलेली ही आवड पुढे जाऊन हृदयाचा छंदच झाली.
 
डोंगररांगांची सफर करण्याचा हृदयाचा प्रवास आजही सुरूच आहे. या प्रवासामध्ये तिने आजवर तब्बल ५५ किल्ले सर केले आहेत. यामध्ये वयाच्या ११व्या वर्षीच तिने चढाईस अत्यंत कठीण समजला जाणारा भैरवगडही यशस्वीपणे सर केला. आजवर तिने सर केलेल्या अनेक किल्ल्यांमध्ये कलावंतीण, प्रबळगड, इर्शाळगड, सरसगड, राजगड, रायगड, माहुलीसारख्या कठीण किल्ल्यांचाही समावेश आहे.
 
तसेच हृदयाने उत्तराखंडच्या ‘केदारकंठ’ शिखरावरही यशस्वी चढाई करताना तिने आणि तिच्या चमूने राष्ट्रध्वज फडकावला. ८ ते १० अंश सेल्सिअस तापमानामध्ये १२ हजार ५०० फूट उंचीचं शिखर सर केलं. ‘केदारकंठ’ शिखरावर राष्ट्रध्वज फडकवणारी सर्वांत तरुण गिर्यारोहक म्हणून हृदयाचं नाव ‘इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड’मध्ये समाविष्ट करून तिला गौरवण्यात आलं. हृदयाच्या या यशामागे तिच्या वडिलांइतकाच आई आणि आजीचाही वाटा असल्याचं हृदया सांगते.
 
गिर्यारोहण शारीरिक क्षमतेचा कस पाहतेच. त्यामुळे शरीराची क्षमता उत्तम ठेवणं आवश्यकच. यासाठी हृदया विशेष मेहनत घेत असून, अलीकडेच तिने यासाठी ‘किक बॉक्सिंग’ शिकण्यासही सुरुवात केली आहे. सध्या हृदया पाचगणीच्या संजीवन विद्यालय येथे शिकत असून, तिसरीपर्यंतचं तिचं शिक्षण लोअर परळच्या ‘केजीटी इंटरनॅशनल स्कूल’मध्ये झालं.
 
हृदयाला सैन्याची प्रचंड आवड असून, भविष्यात भारतीय सैन्यदलात जाऊन देशसेवा करण्याचं स्वप्न तिने उराशी बाळगलं आहे. लहानपणी डॉक्टर अथवा वैमानिक होण्याचं स्वप्न हृदयाचं होतं. मात्र, संजीवन विद्यालयामधून भारतीय सैन्यदलाविषयी मिळालेल्या माहितीने हृदया भारावून गेली. यानंतर तिने देशसेवेचा हाच मार्ग करिअर म्हणून निश्चित केल्याचं हृदया आत्मविश्वासाने सांगते. हृदयाने आतापासून ‘एनडीए’च्या परीक्षेची तयारी सुरू केली आहे. यावरूनच स्वप्नांचा पाठलाग करण्यामागची तिची तळमळ दिसून येते.
 
हृदयाच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू म्हणजे, तिला असलेली नृत्याची आवड! खेळ, सैन्यदल आणि गिर्यारोहणासारखे प्रकार आवडणार्‍या हृदयाला नृत्याचीही आवड आहे. शालेयस्तरावर अनेकदा तिने ती जोपासली. मात्र, या आवडीला अधिक परिपक्व करण्यासाठी हृदया भरतनाट्यमही शिकत आहे.
 
भविष्यात अनेक शिखरं सर करण्याचा हृदयाचा मानस असला, तरी सध्या मात्र अभ्यासावरच लक्ष्य केंद्रित करणार असल्याचं लहानगी हृदया प्रमाणिकपणे सांगते. पांचगणीच्या निवासी शाळेत हृद्या असली, तरीही सुटी मिळाल्यावर बाबांच्या बरोबर नव्या वाटा चालण्यास, नवे डोंगर सर करण्यास हृदया चुकत नाही. डोंगरवाटांवरून चालताना कमावलेलं धैर्य, संकटांवर मात करताना अंगी बाणलेली जिद्द आणि उंच शिखरांकडे पाहताना मनात रुजलेली महत्त्वाकांक्षा हृदयाला नवं स्वप्न पाहण्याचं बळ देते. सह्याद्रीच्या कणखर कड्यांतून मिळालेली प्रेरणा उद्या देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावताना तिच्या कामी यावी आणि तिचं देशसेवेचं स्वप्न साकार व्हावं, याच हृदया चव्हाण हिला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
- कौस्तुभ वीरकर




संबंधित मजकूर