शंखनादाने नाशिकचा

    27-Oct-2026
 
Nashik Shankhnaad World Record
 
नाशिक ही प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली, गोदावरीच्या तीरावर वसलेली आणि धार्मिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचा समृद्ध वारसा लाभलेली नगरी. कुंभमेळ्याची भूमी, संत-महात्म्यांच्या वास्तव्याने पवित्र झालेली भूमी आणि भारतीय संस्कृतीचे जतन करणारे महत्त्वाचे केंद्र, अशीच नाशिकची ख्याती जगभर आहे. अशा या पवित्र नगरीत शंखवादनाच्या विश्वविक्रमाची नोंद होणे, ही नाशिकच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारीच अभिमानास्पद बाब. भारतीय संस्कृतीमध्ये शंखनादाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूजाअर्चा, मंदिरातील आरती, तसेच विविध मंगलप्रसंगी शंखनाद केला जातो.
 
शंखाचा नाद हा केवळ धार्मिक परंपरेचाच भाग नसून तो मांगल्य, पावित्र्य, चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जेचेही प्रतीक मानला जातो. शंखवादनाच्या विश्वविक्रमामुळे या प्राचीन परंपरेची जागतिक स्तरावरील ओळख अधिक ठळकपणे अधोरेखित होणार आहे.
 
सामूहिक शंखनादातून भारतीय संस्कृतीची एकात्मता, शिस्त, सामूहिक सहभाग आणि आध्यात्मिक परंपरेचे दर्शनच घडते. सामूहिक शंखनादासारख्या अशा उपक्रमांमुळे, नव्या पिढीलाही आपल्या सांस्कृतिक वारशाची ओळख होतेच, शिवाय परंपरांचे जतन करण्याचीही ऊर्जा आणि प्रेरणाही मिळते. सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याच्या अगदी काही दिवस आधी, नाशिकमधील रामकुंडासारख्या धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठिकाणी हा उपक्रम विशेष महत्त्वाचा ठरला. ‘रामायणा’शी असलेले नाते, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची आध्यात्मिक परंपरा, गोदावरीचे पावित्र्य आणि कुंभमेळ्यामुळे लाभलेली जागतिक ओळख या सर्वच गोष्टी, नाशिकच्या सांस्कृतिक प्रतिष्ठेत भर घालतात. त्यात शंखवादनाच्या विश्वविक्रमाची भर पडल्याने, शहराच्या सांस्कृतिक ओळखीला जागतिक स्तरावर मानाचे स्थान मिळणार आहे. आजच्या आधुनिक आणि वेगवान जीवनशैलीत आपल्या परंपरांचे महत्त्व जपणे गरजेचे आहे. अशा विक्रमी उपक्रमांमधून, भारतीय संस्कृतीचा गौरव आणि संवर्धन करण्याचा संदेशही समाजमनावर कोरला गेला. हा विश्वविक्रम म्हणजे केवळ विक्रम नसून भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि परंपरेच्या गौरवाचा निनाद आहे. त्यामुळेच नाशिकच्या सांस्कृतिक महतीत निश्चितच मोलाची भर पडणार आहे.
 
सिंहस्थातून उद्योगांना संधी
 
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा धार्मिक महत्त्वासोबतच उद्योग, व्यापार आणि स्थानिक उद्योजकांसाठीही मोठीच संधी निर्माण करणारा सोहळा आहे. लाखो भाविक, साधू-महंत, पर्यटक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या आगमनामुळे, शहरातील पायाभूत सुविधा आणि नागरी सेवांची मागणी मोठ्याच प्रमाणात वाढणार आहे. या गरजा पूर्ण करताना उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीचा वापर आणि स्थानिक उद्योजकांचा सहभागही महत्त्वाचा ठरणार आहे. सिंहस्थासाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, आरोग्य केंद्रे, निवारा व्यवस्था, वाहनतळ, दिशादर्शक फलक, सार्वजनिक प्रकाश व्यवस्था आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या सुविधांची आवश्यकता भासणार असून, या सुविधा उभारण्यासाठी आणि त्यांच्या देखभालीसाठी मोठ्या प्रमाणावर नियोजन, मनुष्यबळ, तंत्रज्ञान आणि आर्थिक संसाधनांची गरज लागेल. बांधकाम क्षेत्रातील उद्योजकांना तात्पुरते निवारे, स्वच्छतागृहे आणि विश्रांतीस्थळे उभारण्याची संधी यातून मिळेल.
 
पाणीपुरवठा आणि सांडपाणी प्रक्रिया क्षेत्रातील कंपन्या जलव्यवस्थापनाची कामे करू शकतात, कचरा संकलन, पुनर्वापर आणि पर्यावरणपूरक उत्पादनांशी संबंधित उद्योगांना स्वच्छता मोहिमेत योगदान देता येईल, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या गर्दीचे व्यवस्थापन, डिजिटल दिशादर्शन, ऑनलाईन माहिती केंद्रे आणि आपत्कालीन संदेश यंत्रणा विकसित करू शकतात. तसेच वाहतूक, खानपान, निवास, सुरक्षा आणि वैद्यकीय सेवांशी संबंधित व्यावसायिकांनाही मोठीच मागणी निर्माण होणार आहे. या प्रक्रियेत ‘सीएसआर’ निधी सुविधा उभारण्यासाठी गरजेचा आहे. बरेचसे उद्योग आपले सामाजिक उत्तरदायित्व म्हणून पाणी, स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण आणि सार्वजनिक सुविधांसाठी योगदान देणार आहेत. सिंहस्थ हा नाशिकसाठी केवळ धार्मिक उत्सव नसून, आर्थिक विकासाला चालना देणारा महत्त्वाचा टप्पा आहे. योग्य नियोजन, पारदर्शकता आणि उद्योग-प्रशासन भागीदारीच्या माध्यमातून भाविकांना दर्जेदार सुविधा देता येतील, आणि स्थानिक उद्योजकांसाठी रोजगार व व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण करता येतील. सिंहस्थाचा लाभ तात्पुरता न राहता नाशिकच्या दीर्घकालीन विकासात परिवर्तित होणे, हेच या प्रयत्नांचे खरे यश ठरेल.
 
-विराम गांगुर्डे




संबंधित मजकूर