‘हडल’मधून क्रीडाक्रांती

 

Sonam Taneja 
 
वकिलीच्या चौकटी बाहेर निघून 'स्पोर्ट्स टेक'मधून क्रीडा संस्कृतीला नवा आयाम देणाऱ्या सोनम तनेजा यांच्या प्रवासाविषयी...
 
क्रीडाक्षेत्रात करिअर करण्याची पूर्वनियोजित महत्त्वाकांक्षा नव्हती, ना उद्योजकतेचा वारसा. कायद्याचे शिक्षण, कॉर्पोरेट क्षेत्रातील अनुभव आणि वकिलीची व्यावसायिक वाटचाल सुरू असतानाच, सोनम तनेजा यांना एक प्रश्न पडला की, भारतात खेळण्याची इच्छा असणार्‍या लाखोंना प्रत्यक्ष मैदानापर्यंत पोहोचण्यासाठी संघर्ष का करावा लागतो? यामुळेच वकिलीतून त्या ‘स्पोर्ट्स टेक’ उद्योगाकडे वळल्या. आज ‘हडल’ या क्रीडा तंत्रज्ञान व्यासपीठाच्या सहसंस्थापक आणि व्यवसाय विकास प्रमुख म्हणून, भारतातील क्रीडासंस्कृती अधिक समावेशक आणि तंत्रज्ञानस्नेही करण्याचा प्रयत्न करत आहेत. (Sonam Taneja)
 
सोनम यांचा प्रवास हा एका समस्येकडे उद्योजकीय दृष्टिकोनातून पाहण्याचा आणि त्यावर तंत्रज्ञानाच्या मदतीने उपाय शोधण्याचा प्रयत्न आहे. खेळण्यासाठी मैदान शोधणे, वेळ निश्चित करणे आणि बुकिंगमधील गोंधळ टाळणे, या साध्या वाटणार्‍या बाबी, अनेकांसाठी मोठा अडथळाच ठरतात. खेळाची आवड असूनही सुविधांच्या अभावी, अनेकजण मैदानापासून दूर राहतात. ही दरी भरण्यासाठीच ‘हडल’ची सुरुवात झाली. (Sonam Taneja)
 
पुण्यातील नामांकित ‘आयएलएस लॉ कॉलेज’मधून कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यावर, तनेजा यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात काम केले. याचदरम्यान त्यांनी ‘सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायर्न्मेंट’मध्ये, अन्नसुरक्षा आणि विषारी घटक नियंत्रणाशी संबंधित कार्यक्रमांचे व्यवस्थापनही केले. मात्र, बॅडमिंटन, फुटबॉल, व्हॉलीबॉलसारख्या खेळांविषयीची त्यांची आवड कायम होती. २०१४ मध्ये लांब धावण्याची आवड निर्माण झाल्याने, खेळाशी त्यांचा संबंध दृढ झाला. यातूनच खेळ हा वैयक्तिक छंद नसून सामाजिक सहभाग, आरोग्य आणि समुदायनिर्मितीचे प्रभावी माध्यम ठरू शकतो, याचीही जाणीव त्यांना झाली. (Sonam Taneja)
 
या प्रवासाला निर्णायक वळण लाभले, ते ‘दिल्ली-एनसीआर’मध्ये फुटबॉलसाठी जागा शोधताना आलेल्या अडचणींमुळे. सुरक्षित मैदान, चांगल्या सुविधा आणि नियमितपणे सोबत खेळणारा गट शोधणे सोपे नव्हते. विशेषतः, महिलांसाठी खेळण्याच्या संधी केवळ आवडीवर अवलंबून नसतात; त्यासाठी सुरक्षित वातावरण, दर्जेदार सुविधा आणि सहज उपलब्धताही आवश्यक असते. या समस्येवर तातडीचा उपाय म्हणून तनेजा यांनी, हौशी महिला खेळाडूंना एकत्र आणणारा व्हॉट्सअ‍ॅप समूह सुरू केला. सामन्यांचे आयोजन आणि महिलांना खेळण्यासाठी प्रोत्साहन देणार्‍या या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. लोकांना खेळण्यासाठी आवश्यक व्यवस्थाच उपलब्ध नाही, हेच यातून अधोरेखितही झाले. ‘हडल’ची स्थापना २०१६ मध्ये त्यांचे पती सुहेल नारायण यांनी क्रीडा स्पर्धांसाठीचे व्यासपीठ म्हणून केली. २०१८ मध्ये या संकल्पनेत बदल करून, क्रीडा समुदायाला जोडणार्‍या डिजिटल प्लॅटफॉर्मचा विकास करण्यात आला. सोनम सुरुवातीला संस्थापकांच्या भूमिकेत नव्हत्या. ‘कोविड’पूर्व काळात त्या व्यवसायवाढ आणि धोरणात्मक नियोजनाच्या माध्यमातून जोडल्या गेल्या. क्रीडा उद्योगाचे स्वरूप, त्यातील व्यावसायिक संधी आणि वापरकर्त्यांच्या गरजा समजून घेतल्यावर, २०२३ मध्ये त्या कंपनीच्या सहसंस्थापक झाल्या. (Sonam Taneja)
 
आज ‘हडल’च्या माध्यमातून खेळाडूंना क्रीडा सुविधा शोधणे आणि ऑनलाईन मैदान बुक करणे सुलभ होताना दिसत आहे. त्याचवेळी क्रीडा केंद्रांच्या मालकांना ‘बुकिंग’, ‘पेमेंट’, सदस्यत्व आणि ‘बिलिंग’चे व्यवस्थापनही डिजिटल पद्धतीने करता येते. म्हणजेच, हे व्यासपीठ केवळ खेळाडू आणि मैदान यांच्यातील दुवा नसून, क्रीडा सुविधा व्यवस्थापनाला अधिक कार्यक्षम करण्याचा प्रयत्न आहे. खेळाडूंना टॅक्सीसारखीच मैदानाची नोंदणी करता यावी, हीच तनेजा यांची यामागील मध्यवर्ती भूमिका. महिलांच्या क्रीडा सहभागाबाबतही त्या सकारात्मक असून, महिलांना खेळण्यासाठी स्वच्छ स्वच्छतागृहे, पुरेशी पार्किंग व्यवस्था, सुरक्षित परिसर आणि दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध असणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्या म्हणतात. महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी, पायाभूत सुविधांचा विकास महत्त्वाचा, हा त्यांच्या कामातील महत्त्वाचा धडा. (Sonam Taneja)
 
वकिलीतील निश्चित चौकटीतून स्टार्टअपच्या अनिश्चित आणि वेगवान वातावरणात प्रवेश करताना त्यांना व्यवसायवाढ, उद्योगाची कार्यपद्धती आणि वैयक्तिक आयुष्यातील अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. मात्र, बदल स्वीकारणे, अनुभवातून शिकणे आणि स्वतःला एका भूमिकेपुरते मर्यादित न ठेवणे, याच दृष्टिकोनातून त्यांनी पुढची वाटचाल केली. (Sonam Taneja)
 
भारतातील दहा कोटी लोकांना खेळण्यासाठी प्रेरित करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून आज सोनम काम करत आहेत. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी तंत्रज्ञानाबरोबरच क्रीडा पायाभूत सुविधा, सुरक्षितता आणि सामाजिक सहभाग यांची सांगड घालणे आवश्यकच. ‘हडल’चा प्रवास या व्यापक आव्हानाला भिडण्याचाच एक प्रयत्न. खेळ हा सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग व्हावा, ही सोनम यांची दृष्टी आहे. कायद्याच्या क्षेत्रातून, ‘स्पोर्ट्स टेक’ उद्योगापर्यंतची त्यांची झेप समस्येतून संधी शोधण्याचे ठळक उदाहरण ठरते. सोनम तनेजा यांच्या पुढील वाटचालीसाठी दै.‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा! (Sonam Taneja)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर