कॅमेर्‍यापलीकडची नजर

    26-Oct-2026

Sitaram Raul Wildlife Photographer
 
वाळवंटाच्या अथांग पसार्‍यात स्वतःसाठी खड्डा खोदणार्‍या एका छोट्याशा विंचवाची जगण्याची गोष्ट सीताराम राऊळ यांनी आपल्या कॅमेर्‍यात टिपली. लंडनच्या ‘नॅचरल हिस्ट्री म्युझियम’च्या 'Wildlife Photographer of the Year' या प्रतिष्ठित स्पर्धेत या छायाचित्राने ‘अपृष्ठवंशीय प्राण्यांचे वर्तन’ या श्रेणीत विजेतेपद मिळवले. मात्र, या यशामागे केवळ एका क्षणाचे छायाचित्रण नाही, तर १४ वर्षांची साधना, निसर्गाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी आणि त्यातील अर्थ शोधण्याची सवय आहे. दोडामार्गच्या निसर्गातून सुरू झालेला सीताराम राऊळ यांचा प्रवास जागतिक व्यासपीठापर्यंत कसा पोहोचला, याची ही गोष्ट...
 
वाळूचा अथांग पसारा. चहुबाजूंनी पसरलेले रखरखते वाळवंट. त्या अफाट विस्तारात एक जीव आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहे. आकाराने अगदी छोटासा. पण त्याच्या त्या छोट्याशा हालचालीत जगण्याची मोठी गोष्ट दडलेली आहे. वाळूत स्वतःसाठी खड्डा खोदणारा तो विंचू सीताराम राऊळ यांच्या कॅमेर्‍यात बंदिस्त झाला आणि एका क्षणात त्याची गोष्ट जैसलमेरच्या वाळवंटापलीकडे, देशाच्या सीमांपलीकडे पोहोचली.
 
जगभरातून आलेल्या ६४ हजार ४०३ छायाचित्रांमधून निवडले गेलेले हे छायाचित्र केवळ एका विंचवाचे नाही. म्हणूनच त्याच्या आकारापेक्षा त्याचा आशय मोठा ठरला. लंडनच्या ‘नॅचरल हिस्ट्री म्युझियम’ने आयोजित केलेल्या 'Wildlife Photographer of the Year' या स्पर्धेत 'Behaviour : Invertebrates' म्हणजेच ‘अपृष्ठवंशीय प्राण्यांचे वर्तन’ या श्रेणीत विजेतेपद मिळवत बदलापूरचे वन्यजीव छायाचित्रकार सीताराम दिनकर राऊळ यांनी महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. सीताराम राऊळ यांचे मूळ कोकणातील दोडामार्गचे. हिरवाई, डोंगर, पाऊस, जंगल आणि त्यात वावरणारे असंख्य जीव या वातावरणाने राऊळ यांच्या कलात्मकतेला आकार दिला. त्यांच्या गावी वनविभागातील वनरक्षकही राहायचे. गावी गेल्यावर त्यांच्यासोबत रंगणार्‍या गप्पांमधून जंगलातील अनेक कथा त्यांच्या कानांवर पडत. कोणता प्राणी कुठे दिसतो, त्याचे वर्तन कसे असते आणि प्रत्येक जीव आपले अस्तित्व कसे टिकवतो, याची वेगळी दुनिया त्यांच्या समोर उलगडत गेली. त्यांच्या समोर उलगडत गेलेली ही दुनिया त्यांना सतत आकर्षित करत राहिली.
 
लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. कागदावर रेषा उमटवताना एखादी कल्पना आकार घेते, याचा आनंद त्यांना माहीत होता. पुढे हातात पेन्सिलऐवजी कॅमेरा आला. पण चित्र काढण्याची तीच वृत्ती कायम राहिली; फरक एवढाच की, कॅनव्हास त्यांनी स्वतः रंगवायचा नव्हता. निसर्गाने आधीच रंगवलेल्या कॅनव्हासमध्ये त्यांना स्वतःची ‘फ्रेम’ शोधायची होती. बदलापूरमध्ये प्राण्यांचे ‘रेस्यू’ करणार्‍या संस्थेत काम करताना राऊळ यांचा वन्यजीवांशी संबंध अधिक जवळचा झाला. जखमी प्राणी-पक्ष्यांचे फोटो काढताना कॅमेरा त्यांच्या हातात अधिक सहज झाला. सर्पमित्र म्हणून काम करताना हा अनुभव आणखी प्रगल्भ झाला. सापांविषयीची भीती, गैरसमज आणि त्यांच्या जगण्याची वास्तविकता यांचा जवळून परिचय झाला. फोटोग्राफी त्यांच्या आयुष्यात छंद म्हणून आली, पण हळूहळू ती त्यांची भाषा बनत गेली.
 
गेल्या १४ वर्षांपासून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या मते, फोटो म्हणजे फक्त सुंदर दृश्य नाही. चित्र आपण घडवतो; पण फोटोग्राफीमध्ये घडलेल्या किंवा घडत असलेल्या गोष्टीतून ‘थॉट’ शोधायचा असतो. पण या सगळ्यांचे सुंदर फोटो काढणे, म्हणजे छायाचित्रकाराचे अंतिम कौशल्य नाही. त्या दृश्यात आपली नजर काय शोधते, तो क्षण कोणत्या पद्धतीने मांडला जातो आणि एका फ्रेममधून प्रेक्षकाला काय जाणवते, इथे खरी परीक्षा सुरू होते. बदलापूर येथे आयोजित ’Exposure Photography Competition’ मध्ये मिळालेला पहिला पुरस्कार त्यांच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरला. त्यावेळी परीक्षक असलेले ज्येष्ठ छायाचित्रकार केदार भट्ट यांनी त्यांच्या कौशल्याची दखल घेतली. त्यानंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा प्रवास सुरू झाला. ’Nature in Focus, Golden Turtle,’ इटलीतील ’Nature in Focus, Golden Turtle,’ इटलीतील 'Asferico International Nature Photography Competition' आणि अमेरिकेतील BigPicture : Natural World Photography Competition यांसारख्या प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये त्यांच्या कामाला गौरव मिळाला.
 
या प्रवासात महत्त्वाचे वळण आले ते 'The Creative Nature Photography (CNP) Forum' मुळे. ‘मोर सुंदर आहेच; पण तुमचा फोटो कशामुळे वेगळा?’ हा प्रश्न छायाचित्रकाराला अस्वस्थ करू शकतो. ’CNP Forum' मधील तज्ज्ञांनी सामान्य फोटोग्राफीच्या पलीकडे जाऊन स्वतःची सर्जनशीलता कशी वापरायची, एखादे दृश्य नेहमीपेक्षा वेगळ्या कोनातून कसे पाहायचे, याची दिशा दिली. त्यांच्या फोटोग्राफीला इथे नवा ‘क्रिएटिव्ह अँगल’ मिळाला. म्हणूनच पुढे त्यांच्या कॅमेर्‍यात मोठ्या प्राण्यांइतकाच सूक्ष्म जीवही महत्त्वाचा ठरू लागला. ‘मायक्रो फोटोग्राफी’कडे त्यांचा ओढा वाढला. निसर्गाच्या मोठ्या चित्रात दिसून न येणार्‍या छोट्या हालचालींमध्येही एक स्वतंत्र विश्व असते, हे त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिले.
 
आजच्या स्पर्धात्मक जगात एखाद्या पुरस्काराच्या निकषांनुसार छायाचित्र काढण्याचा मोह असतो. मात्र, फील्डवर गेल्यावर समोर कोणती स्पर्धा आहे किंवा कोणत्या श्रेणीत फोटो पाठवायचा आहे, याचा विचार राऊळ करत नाहीत. समोर आलेला क्षण आधी पाहतात, अनुभवतात, समजून घेतात आणि मग कॅमेर्‍यात पकडतात. कदाचित म्हणूनच, त्यांच्या छायाचित्रांमध्ये कृत्रिमपणा जाणवत नाही. जैसलमेरच्या वाळवंटात दिसलेला विंचूही असाच एका क्षणाचा शोध होता. त्याच्या कृतीत त्यांना केवळ प्राणी दिसला नाही; प्रतिकूलतेत जगण्याची विलक्षण प्रक्रिया दिसली. या स्पर्धेचा निकाल मार्चमध्ये आला. मात्र, पुरस्काराची अधिकृत घोषणा होईपर्यंत गोपनीयता राखणे आवश्यक असल्याने हा आनंद मनात ठेवावा लागला. मागील वर्षी याच स्पर्धेत णीलरप थळश्रवश्रळषश श्रेणीत राऊळ यांना उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला होता. यंदा त्याच व्यासपीठावर श्रेणी विजेतेपद मिळणे, ही त्यांच्या सातत्याची पोचपावती ठरली.
 
जागतिक पुरस्कार मिळाल्यानंतरही राऊळ यांच्या बोलण्यात स्वतःपेक्षा कुटुंबाचा उल्लेख आधी येतो. या यशामागे आई-वडील आणि कुटुंबाचा मोठा वाटा असल्याचे ते सांगतात. तुला जे हवे ते कर, ही मुभा आणि विश्वास त्यांनी दिला. गुरू सुरेश भोसले, बदलापूरमधील छायाचित्रकार मित्र आणि या प्रवासात साथ देणार्‍या अनेक व्यक्तींचे योगदानही ते आवर्जून मान्य करतात. सीताराम राऊळ यांच्या पुरस्कारप्राप्त छायाचित्रातील विंचू या संपूर्ण प्रवासाचे सुंदर प्रतीक आहे. त्याच्याकडे वाघासारखी दहशत नाही, सिंहासारखी ताकद नाही, मोरासारखे देखणेपण नाही. तरीही त्याच्या जगण्यात एक कथा आहे. वाळवंटाच्या कठीण परिस्थितीत तो स्वतःचा निवारा निर्माण करतो आणि जगण्याचा मार्ग शोधतो. राऊळ यांनी तो क्षण पाहिला आणि जगानेही तो क्षण पाहिला.
 
ज्यांत खरोखर रस आहे, ते मनापासून करा. मार्ग आपोआप सापडत जातात, असा त्यांचा तरुणांना संदेश आहे. दोडामार्गच्या निसर्गातून सुरू झालेली उत्सुकता, बदलापूरच्या ‘रेस्यू सेंटर’मध्ये वाढलेली वन्यजीवांशी मैत्री, हातात आलेला कॅमेरा, १४ वर्षांचे निरीक्षण, गुरूंचे मार्गदर्शन आणि कुटुंबाचा विश्वास या सगळ्यांनी मिळून एक नजर घडवली. ती नजर आज जगाला निसर्गाची नवी भाषा दाखवत आहे. कदाचित म्हणूनच, सीताराम राऊळ यांच्या कॅमेर्‍यातील सर्वांत मोठी गोष्ट त्यांचा कॅमेरा नाही. ती आहे, पाहण्याची त्यांची नजर!
 
लेखक- वसुमती करंदीकर
 




संबंधित मजकूर