‘महा-एमटीबी इकोफ्रेंडली गणेशा’ स्पर्धेचा आज पारितोषिक वितरण सोहळा

    26-Oct-2026
 
Maha MTB Gharguti Eco-Friendly Ganesha 2026
 
मुंबई : दै. ‘मुंबई तरुण भारत’ आयोजित, ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ प्रस्तुत ‘महा-एमटीबी घरगुती इकोफ्रेंडली गणेशा २०२६’ पावर्ड बाय ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा सोमवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी रवींद्र नाट्य मंदिर, मिनी थिएटर, प्रभादेवी, मुंबई येथे सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. राज्यभरातील ३ कोटी, ५० लाख गणेशभक्तांपर्यंत पोहोचलेल्या या स्पर्धेसाठी ‘विदा रिअल्टी’ सहप्रायोजक म्हणून लाभले आहेत. या पुरस्कार सोहळ्यास निसर्गप्रेमी गणेशभक्तांसह मराठी चित्रपट विश्वातील अनेक नामांकित मंडळी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. (Maha-MTB Eco-Friendly Ganesha 2026)
 
‘महा-एमटीबी घरगुती इकोफ्रेंडली गणेशा २०२६’ या स्पर्धेकरिता एकूण अडीच हजारांहून अधिक गणेशभक्तांनी आपल्या घरी पर्यावरणपूरक बाप्पाची आरास केली. स्पर्धेची लोकप्रियता पाहता, यंदा बृहन्महाराष्ट्रातील सर्व गणेशभक्तांचेही या उपक्रमात स्वागत करण्यात आले होते. केवळ राज्यभरातून नाही, तर गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश आदी राज्यांतूनही गणेशभक्तांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. पर्यावरणपूरक सण साजरा व्हावा, या भावनेने अनेक गणेशभक्त आणि कलाप्रेमींनी आपल्या लाडक्या बाप्पाची वैशिष्ट्यपूर्ण आणि सामाजिक संदेश देणारी आरास केली आहे.  (Maha-MTB Eco-Friendly Ganesha 2026)
 
या पारितोषिक सोहळ्यात एकूण प्रथम पाच क्रमांक आणि २० उत्तेजनार्थ स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकास ७५ हजार रुपयांचे पारितोषिक असून एकूण अडीच लाख रुपयांची पारितोषिके या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रदान करण्यात येतील. (Maha-MTB Eco-Friendly Ganesha 2026)
 
मान्यवरांची उपस्थिती
 
दरवर्षीप्रमाणे, यंदाही ‘वन्यवाणी फाऊंडेशन’ प्रस्तुत लोककलांवर आधारित धमाल मनोरंजन कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या सोहळ्यात ३० लोककलावंतांसह अभिनेत्री क्रांती रेडकर-वानखेडे यांच्यासह त्यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या ‘मैत्रेया’ चित्रपटाचा चमू उपस्थित राहणार आहे. ज्यामध्ये दिग्दर्शक क्रांती रेडकर यांच्यासह आयुषी भावे, रुची जैल, समर आणि स्काय यांची उपस्थिती असणार आहे. याखेरीज ‘मिरांडा वॉर्निंग’ चित्रपटातील अभिनेत्री त्रिशा कमलाकर, अभिनेता एकनाथ गीते, दिग्दर्शक सचिन धोत्रे आणि ‘संडे १९९६’ या चित्रपटातील अभिनेता ओंकार राऊत आणि दिग्दर्शक जीवन चव्हाण हेदेखील उपस्थित असतील. कार्यक्रमाचे निवेदन अभिनेत्री दीप्ती भागवत करतील. ‘वन्यवाणी फाऊंडेशन’चे मकरंद सावंत, महेश कापरेकर, सचिन शिंदे आणि पवन तटकरे आदी कलावंत गणरायासमोर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील.  (Maha-MTB Eco-Friendly Ganesha 2026)
 




संबंधित मजकूर