भारतीय क्रीडा क्षेत्राचा इतिहास आजचा नाही. भारतीय जनमानसामध्ये खेळभावना रुजवण्यासाठी अनेकांनी योगदान दिले आहे. यामध्ये अनेक समाजसुधारक, संतमहंतांचा समावेश होतो. विजयादशमीच्या संबोधनात सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी उल्लेख केलेल्या समाजसुधारकांचे योगदानही तितकेच व्यापक. त्यांच्या क्रीडा योगदानाचा आढावा घेणारा हा लेख...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या स्थापनेची महत्त्वपूर्ण १०० वर्षे पूर्ण केली. याच्या सांगताप्रसंगी नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजीच्या विजयादशमी उत्सवात सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी मांडलेले विचार आपण ऐकले. आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात युवकांच्या हातात अफाट सोयी-सुविधा आहेत. मात्र, याच आधुनिक जगात, विशेषतः आजच्या ‘जेन-झी’सारख्या पिढीसमोर, व्यसनाधीनता आणि दिशाहीनतेचेही मोठेच संकट उभे ठाकले आहे. नुकत्याच संपन्न विजयादशमी उत्सवात, सरसंघचालकांनी एका समर्पक उदाहरणाद्वारे या अविवेकावर आणि व्यसनांच्या धोक्यावर प्रकाशझोत टाकला. दारू पिण्याने शरीराचे होणारे नुकसान पटवून देताना ते एका सरकारी बाबूचे उदाहरण देतात, जो एका ग्लासात मूठभर किडे टाकून त्यावर दारू ओततो आणि पोटातील किडे असेच मरतात, असा गैरसमज पसरवतो. यातून डॉ. भागवतांनी विवेकाचे महत्त्व अधोरेखित केले. उचित काय आणि अनुचित काय, हे ओळखण्याची बुद्धी नसेल, तर आधुनिकतेचा फायदा होण्याऐवजी तरुणाई विनाशाच्याच मार्गावर जाते. याच विवेक आणि परिवर्तनाच्या विचारांची वीण आपण क्रीडाविश्वाशी जोडल्यास, एक सकारात्मक दिशा मिळू शकते. क्रीडाविश्व हे केवळ शारीरिक कसरतीचे किंवा पदके जिंकण्याचे मैदान नाही, तर ती मानवी विवेक, संयम, चारित्र्य आणि शिस्त घडवणारी एक उत्तम प्रयोगशाळा आहे.
"शताब्दीनिमित्त गेल्या वर्षभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आज आपण या शताब्दीच्या समारोपाचे प्रतीक असलेल्या विजयादशमीचा उत्सव साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत,” असे सरसंघचालक त्याप्रसंगी सांगत होते. यावर्षी संतशिरोमणी रविदासजी महाराज यांची ६५०वी जयंती आहे, असे संत रविदास, तसेच ज्यांच्या बलिदानाला १०० वर्षे पूर्ण झाली, असे स्वामी श्रद्धानंद महाराज, ओडिशाचे स्वामी लक्ष्मणानंदांचीदेखील जन्मशताब्दी सध्या चालू आहे, महात्मा जोतिबा फुले यांचे गत दि. ११ एप्रिलला २००वे स्मरणवर्ष चालू झाले आणि बंगालचे श्रीमद्राज नारायण बसू यांचेही २००वे स्मरणवर्ष चालू आहे, अशा महाविभूतींचाही उल्लेख सरसंघचालकांनी केलेला आपण ऐकला. या महापुरुषांनी क्रीडाविश्वाला दिलेला मौलिक वारसा आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी कसा ठरतो, हेही आपण पाहायला हवे.
१. संत रविदास महाराज आणि क्रीडाविश्वाचा समतावादी दृष्टिकोन : यावर्षी संत रविदासजी महाराजांच्या जयंतीनिमित्त, देशभरात कार्यक्रम सुरू आहेत. संघाच्या शाखादेखील रविदासजींच्या जीवनकार्याविषयी माहिती देणारे कार्यक्रम करत आहेत. संत रविदास हे १५व्या शतकातील महान संत, समाजसुधारक आणि कवी. त्यांनी सामाजिक असमानतेच्या विरोधात आवाज उठवून भक्ती चळवळीला नवी दिशा दिली. क्रीडाक्षेत्रात कोणत्याही प्रकारचा जातिभेद, वर्गभेद किंवा उच्च-नीच भावाला स्थान नसतेच. मैदानात प्रत्येक खेळाडू हा केवळ खेळाडूच असतो. संत रविदास यांच्या समता, बंधुभाव आणि आत्मसन्मानाच्या विचारांनी भारतीय संस्कृतीला जो आधार दिला, तोच क्रीडाविश्वाचा आत्मा आहे. खेळाडूमध्ये असणारी निष्काम भावना, कष्टाळूपणा आणि प्रामाणिकपणा खेळाडूंना मैदानावर एकमेकांचा आदर करण्यास शिकवतो. आज क्रीडाजगतात ‘फेअर प्ले’ची जी भावना आहे, तिची वैचारिक जडणघडण संत रविदासांच्या समतावादी विचारांवर आधारलेली आहे.
२. स्वामी श्रद्धानंद महाराज आणि शरीरसौष्ठव, आखाडा संस्कृती आणि चारित्र्यसंवर्धन : स्वामी श्रद्धानंद हे आर्य समाजाचे ख्यातनाम नेते, स्वातंत्र्यसेनानी आणि शिक्षणतज्ज्ञ. त्यांनी गुरुकुल काँग्री विद्यापीठाची स्थापना करून, पारंपारिक शिक्षण पद्धतीला आधुनिक राष्ट्रवादाची जोड दिली. स्वामी श्रद्धानंद यांनी स्थापन केलेल्या विद्यापीठाच्या नावात ‘काँग्री’ (किंवा ‘कांग्री’) हा शब्दप्रयोग आहे. तो समजून घेणे खूप आवश्यकच. अनेकांना हा शब्द काँग्रेस पक्षाशी संबंधित वाटेल, पण वस्तुस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. श्रद्धानंद यांनी १९०२ मध्ये हरिद्वारजवळ ‘गुरुकुल कांग्री युनिव्हर्सिटी’ची स्थापना केली. ज्या ठिकाणी या गुरुकुलाची स्थापना झाली, त्या जागेचे नाव ‘कंकाल हर क्षेत्र’ (किंवा कांगडी/कांग्री) असे होते. हे ठिकाण हरिद्वारजवळ गंगा नदीच्या तीरावर आहे. त्या भौगोलिक ठिकाणावरूनच त्या गुरुकुलला ‘कांग्री गुरुकुल’ असे नाव देण्यात आले.
त्या काँग्री गुरुकुलाच्या स्वामी श्रद्धानंद यांनी, भारतीय शिक्षणपद्धतीत शारीरिक शिक्षणाला आणि ब्रह्मचर्यानुरूप संयमाला महत्त्वाचे स्थान दिले. केवळ बौद्धिक शिक्षण नव्हे, तर तंदुरुस्त शरीर आणि मजबूत मन हे राष्ट्रनिर्माणासाठी आवश्यक आहे, यावर त्यांचा भर असे. त्यांनी उत्तर भारतात आखाडा संस्कृती, देशी व्यायाम, मल्लखांब आणि कुस्तीसारख्या पारंपरिक भारतीय खेळांच्या प्रसाराला बळ दिले. एकाअर्थी, तरुणांमध्ये शिस्त, शारीरिक तंदुरुस्ती आणि राष्ट्रभक्तीची भावना रुजवण्यासाठीच त्यांनी, क्रीडा आणि शारीरिक शिक्षणाला आपले माध्यम केले.
३. स्वामी लक्ष्मणानंद : स्वामी लक्ष्मणानंद हे ओडिशाच्या दुर्गम भागात (कंदमाल जिल्हा) राहून वनवासी, आदिवासी आणि जनजातीय घटकांच्या उत्थानासाठी आयुष्यभर झटणारे संत! त्यांचीदेखील जन्मशताब्दी सध्या सुरु आहे. खेळ हे केवळ शहरी भागापुरतेच मर्यादित नसून, ते देशाच्या कानाकोपर्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलेपाहिजे, हा संदेश स्वामी लक्ष्मणानंद यांच्या जीवनकार्यातून मिळतो. दुर्गम भागातील आदिवासी युवकांमध्ये उपजत शारीरिक क्षमता, चपळाई आणि धाडस असते. स्वामीजींनी तिथल्या मुला-मुलींमध्ये खेळांचे महत्त्व रुजवण्यासोबत, त्यांना संघटित करण्याचे काम केले. खेळांच्या माध्यमातून आदिवासी युवकांना एकात्मतेच्या सूत्रात बांधणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे आणि व्यसनांपासून त्यांना दूर ठेवणे अशी काम त्यांनी केली. क्रीडा संस्कृतीला सामाजिक एकात्मतेचे साधन बनवण्यात त्यांचे योगदान मोठेच.
४. महात्मा जोतिबा फुले : महात्मा जोतिबा फुले हे महाराष्ट्रातील सत्यशोधक समाजाचे संस्थापक, महान समाजसुधारक आणि क्रांतिकारक होते. गत दि. ११ एप्रिलला त्यांचे २००वे वर्ष चालू झाले. त्यांनी स्त्रीशिक्षण आणि शूद्र-अतिशूद्र उद्धारासाठी आपले जीवन वेचले. महात्मा फुले यांच्या विचारांमध्ये शारीरिक स्वास्थ्य आणि बळाला विशेष महत्त्व होते. ‘शरीर कमावले पाहिजे,’ हा विचार त्यांनी रुजवला. विशेषतः त्यांनी महिला शिक्षणासोबतच त्यांच्या शारीरिक आणि मानसिक सबलीकरणावर भर दिला. आज महिला ऑलिम्पिकपासून ते प्रत्येक खेळात भारताचा झेंडा रोवत आहेत, त्याच्या मुळाशी महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी रुजवलेले स्वावलंबनच आहे. पैलवानांचे आखाडे असोत किंवा देशी खेळ, तळागाळातील पिढीला ताकदीवर उभे करण्याचे काम फुले यांच्या विचारांनी केले.
५. श्रीमद्राज नारायण बसू : बंगालचे महान विचारवंत, लेखक आणि ‘राष्ट्रवादाचे पितामह राज नारायण बसू यांचे हे २००वे जन्मवर्ष. सरसंघचालकांनी आपल्या भाषणात राज नारायण बसू यांच्याही कार्याचा विशेष उल्लेख केला. १९व्या शतकात जेव्हा ब्रिटिशांच्या प्रभावाखाली भारतीय समाज आपले मूळ विसरत होता; तेव्हा राज नारायण बसू यांनी ‘स्वदेशी’ आणि ‘राष्ट्रीय भावना’ रुजवण्यासाठी, लोकमानसांत सांस्कृतिक राष्ट्रवाद जागृत करण्यासाठी, नवगोपाल मित्र यांच्यासह १८६७ मध्ये बंगालमध्ये ‘हिंदू मेळा’ (चैत्र मेळा) सुरू केला. महर्षि अरविंद हे त्यांचे नातू. राज नारायण बसू यांच्या विचारांनी बंगालसह संपूर्ण देशातील तरुण पिढीमध्ये आत्मसन्मान, स्वभाषा आणि संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण केला. आजही युवकांनी स्वतःच्या संस्कृतीशी जोडून घेत राष्ट्र उभारणीत योगदान द्यावे, हा संदेश देण्यासाठी त्यांच्या कार्याचे स्मरण केले जाते. राज नारायण बसूंनी शारीरिक सक्षमीकरणाला राष्ट्रवादाचा मुख्य पाया मानले. त्यांनी सुरू केलेल्या हिंदू मेळ्यामध्ये देशी खेळ, कुस्ती, लाठी-काठी चालवणे आणि भारतीय साहसी क्रीडाप्रकारांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळे. या मेळ्यांच्या माध्यमातूनच पारंपरिक खेळांना प्रतिष्ठा मिळाली. पुढे जाऊन याचाच परिणाम म्हणून, बंगालमधील शिक्षण संस्थांमध्ये शारीरिक शिक्षणाला आणि व्यायामाला महत्त्वही प्राप्त झाले. इंग्रजी राजवटीत भारतीय युवकांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बळकट करण्यात त्यांच्या विचारांचा वाटा मोठाच. खेलकूद केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते एकात्मता, अनुशासन आणि राष्ट्रप्रेमाचा स्रोत असतो, हा विचार त्यांनी १९व्या शतकात रुजवला. मैदानी खेळ आणि देशी कसरतींच्या माध्यमातून तरुणांमध्ये शिस्त निर्माण करण्याचे त्यांचे कार्य मोलाचे होते. मातीशी जोडलेले आपले खेळ टिकवून राष्ट्रवाद आणि क्रीडा यांचा जो मेळ राज नारायण बसूंनी २०० वर्षांपूर्वी घातला, तो आजच्या युवा पिढीसाठीही तितकाच मार्गदर्शक.
सरसंघचालकांनी ज्या बंगालचा उल्लेख केला, तो बंगाल म्हणजे स्वामी विवेकानंद, महर्षी अरविंद, बंकीमचंद्र चट्टोपाध्याय, रवींद्रनाथ टागोर आणि श्रीमद्राज नारायण बसू यांचा सांस्कृतिक व वैचारिक बंगाल आहे. या भूमीने भारताच्या राष्ट्रवादाला आणि स्वातंत्र्य लढ्याला वैचारिक पाया व दिशा दिली.
आजच्या तरुण पिढीला आधुनिक गॅझेट्स, आभासी जग आणि चुकीच्या व्यसनांच्या विळख्यातून बाहेर काढायचे असेल, तर क्रीडांगण हेच सर्वोत्तम औषध ठरू शकते. सरसंघचालकांनी सांगितल्याप्रमाणे, माणसाकडे विवेक हवा; काय उचित आणि काय अनुचित हे ओळखण्याची बुद्धी हवी. जेव्हा एखादा तरुण मैदानावर घामाचा थेंब गाळतो, तेव्हा त्याला शिस्तीचे, कष्टाचे आणि विजयापेक्षा संघटित प्रयत्नांचे महत्त्व समजते.
संत रविदास यांची समता, स्वामी श्रद्धानंद यांची शारीरिक शिस्त, स्वामी लक्ष्मणानंद यांची समाजबांधणीची तळमळ आणि महात्मा फुलेंचा समतावादी संघर्ष या सर्व महापुरुषांचे विचार आपल्याला हेच शिकवतात की, खेळ ही चरित्र निर्माण करणारी एक चळवळ आहे. चला तर मग, आपल्या व्यसनमुक्त आणि सक्षम तरुण पिढीच्या निर्मितीसाठी, क्रीडासंस्कृतीला आपल्या दैनंदिन जीवनाचा कणा बनवूया. आजची ‘जेन-झी’ ही आभासी जगात अडकली आहे. यामुळे शारीरिक हालचाली कमी झाल्या असून नैराश्य, एकाकीपणा आणि चुकीच्या व्यसनांचे प्रमाण वेगाने वाढते आहे. अशा वेळी क्रीडांगण हे वास्तवाशी जोडणारे सर्वांत मोठे माध्यम ठरते. मैदानावर घाम गाळताना मिळणारा आनंद, सांघिक भावना आणि खेळातील जिद्द तरुणांना व्यसनांपासून दूर ठेवते. आज भारताला क्रीडा महासत्ता बनवायचे असेल, तर केवळ आधुनिक तंत्रज्ञान किंवा पायाभूत सुविधा पुरेशा नाहीत, तर या पाच महात्म्यांनी रुजवलेली समता, चारित्र्य, त्याग, श्रमप्रतिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठेची मूल्ये आपल्या खेळाडूंमध्ये भिनवणे गरजेचे आहे. मैदानावर घाम गाळणारा खेळाडू जेव्हा या विचारांनी प्रेरित होतो, तेव्हा तो केवळ पदके जिंकत नाही, तर राष्ट्राचा मानही उंचावतो. संघशाखेत आपल्याला अपेक्षित असलेली पिढी संघस्थापनेच्या काळापासून तेच तर कार्य करत आहे आणि सरसंघचालकांना असेच सविवेकी राष्ट्रनिर्माण तर अपेक्षित असेल ना!
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४
लेखक- श्रीपाद पेंडसे