मुंबई (Thane Bhiwandi Metro Line 5) : ठाणे ते भिवंडीदरम्यानच्या ‘मेट्रो मार्गिका क्र. ५’च्या कामाने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या मार्गिकेसाठी पहिली मेट्रो गाडी दाखल झाली असून, पुढील आठवड्यापासून चाचणी धावांना सुरुवात होण्याची शयता आहे. या मार्गिकेवरील प्रवासीसेवा २०२६-२७ या आर्थिक वर्षात सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे ठाणे आणि भिवंडीदरम्यान दररोज प्रवास करणार्या हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
‘मार्गिका क्र. ५’साठी सुरुवातीला ‘मेट्रो मार्गिका क्रमांक २ अ’ आणि ‘७’ वरील अतिरिक्त गाड्यांचा वापर करण्यात येणार आहे. मंडाले आगारातील ‘बीईएमएल’निर्मित गाड्या टप्प्याटप्प्याने ‘मार्गिका क्र. ४’वर हलविण्यात आल्या असून, नवरात्रोत्सवाच्या काळात कासारवडवली येथील जोडमार्गाद्वारे त्यातील एक गाडी ‘मार्गिका क्रमांक ५’वर आणण्यात आली. ऑटोबरच्या पहिल्या आठवड्यातच या मार्गिकेवरील रूळ आणि विद्युत उपकरणे कार्यान्वित करण्यात आली आहेत. चाचणीदरम्यान सिग्नल व्यवस्था आणि अन्य तांत्रिक यंत्रणांची तपासणी केली जाणार आहे. दुसरीकडे स्थानकांवरील उर्वरित कामेही समांतर सुरू आहेत. (Thane Bhiwandi Metro Line 5)
दरम्यान, या मार्गिकेचा पुढील विस्तार कल्याण आणि उल्हासनगरपर्यंत करण्याचे नियोजन असून, दुसर्या टप्प्यासाठी २०३०-३१ हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ठाणे, भिवंडी आणि कल्याण परिसरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम होण्याची अपेक्षा आहे.
प्रवासाचा वेळ व खर्चात बचत
मेट्रो सुरू झाल्यानंतर सध्या गर्दीच्या वेळी ४५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागणारा ठाणे-भिवंडी प्रवास अवघ्या २५ मिनिटांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. भिवंडीतील गोदामे आणि औद्योगिक आस्थापनांमध्ये जाणार्या कामगारांना सध्या कोंडीचा मोठा फटका बसतो. गर्दीच्या रिक्षांमधून प्रवासासाठी एका आसनाचे ४० ते ५० रुपये मोजावे लागतात. मेट्रोमुळे प्रवासाचा वेळ आणि खर्चात बचत होण्याची अपेक्षा आहे. सुरुवातीला उपलब्ध अतिरिक्त गाड्यांच्या आधारे सेवा चालविण्यात येणार असल्याने दोन गाड्यांमध्ये पाच ते सहा मिनिटांचे अंतर राहण्याची शक्यता आहे. (Thane Bhiwandi Metro Line 5)