कुपवाड्यातील गोवशोरी मंदिरात ३६ वर्षांनंतर विजयादशमीला झाली पूजा

    24-Oct-2026   

Maa Govashori Temple
 
मुंबई : (Maa Govashori Temple)जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा येथील गेल्या ३६ वर्षांपासून ओस पडलेल्या माँ गोवशोरी मंदिरात विजयादशमीला पुन्हा एकदा धार्मिक अनुष्ठान पार पडले. मंदिराच्या पुनर्बांधणीनंतर येथे पूजा-अर्चा झाल्याने काश्मिरी हिंदूंच्या त्या वारशाची पुन्हा आठवण झाली, ज्याला दहशतवादाच्या काळात अनेक दशकांपर्यंत मोठा फटका बसला होता.
 
कुपवाडा जिल्ह्यातील गतुंगू येथे असलेले माँ गोवशोरी मंदिर हे स्थानिक हिंदू समुदायाच्या धार्मिक श्रद्धेचे प्रमुख केंद्र राहिले आहे. १९९० च्या दशकापूर्वी या मंदिरात नियमित पूजा-अर्चा होत असे. सण-उत्सवांच्या काळातही विविध धार्मिक अनुष्ठाने पार पडत असत. मात्र, १९९० च्या दशकात काश्मीरमध्ये दहशतवाद वाढू लागल्यानंतर परिस्थिती झपाट्याने बदलली. इस्लामी कट्टरतावादाच्या झळा केवळ काश्मिरी हिंदूंनाच बसल्या नाहीत, तर गावांमधील मंदिरे आणि शतकानुशतके चालत आलेल्या धार्मिक परंपरांनाही त्याची मोठी किंमत मोजावी लागली.(Maa Govashori Temple)
 
दहशतवादाच्या त्या काळात काश्मिरी हिंदूंच्या निर्घृण हत्या होत असताना, इस्लामी कट्टरतावाद्यांनी माँ गोवशोरी मंदिरालाही आग लावली होती. मंदिरातील मूर्तींचीही विटंबना करण्यात आली. कट्टरतावादाच्या या आगीत मंदिराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आणि ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.
 
२०१९ नंतर जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली. परिस्थितीत सुधारणा होत असल्याने काश्मिरी हिंदूंच्या मनात आपल्या मायभूमीत परतण्याचा विश्वास निर्माण झाला. त्याचबरोबर प्राचीन धार्मिक स्थळांचे जतन आणि पुनरुज्जीवन करण्याबाबतही चर्चा आणि प्रयत्न सुरू झाले. माँ गोवशोरी मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी काश्मिरी हिंदूंनी पुढाकार घेतला आणि निधी संकलनाला सुरुवात केली. मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम पूर्ण झाल्यानंतर यंदा विजयादशमीच्या दिवशी येथे हवन आणि विविध धार्मिक अनुष्ठाने आयोजित करण्यात आली.(Maa Govashori Temple)
 
यापूर्वी श्रीनगरमधील हब्बा कदल परिसरात असलेले ऐतिहासिक शीतलनाथ मंदिरही सुमारे ३६ वर्षांनंतर पुन्हा खुले करण्यात आले होते. याच हब्बा कदल परिसरातील प्राचीन रघुनाथ मंदिरातही ३६ वर्षांनंतर रामनवमीचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. काश्मीरमधील सुमारे पाच हजार वर्षे प्राचीन मानल्या जाणाऱ्या विचार नाग मंदिराचाही जीर्णोद्धार करण्यात आला. त्यानंतर तब्बल ३६ वर्षांनी या मंदिरात धार्मिक कार्यक्रम पार पडला. याशिवाय, प्राचीन शंकराचार्य मंदिराच्या कायापालटासाठी केंद्र सरकारने १.२१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
 
माँ गोवशोरी मंदिर, शीतलनाथ मंदिर, रघुनाथ मंदिर आणि विचार नाग मंदिर यांची पुनर्बांधणी व पुनरुज्जीवन हे अधोरेखित करते की, एखाद्या धार्मिक स्थळाची वास्तू उद्ध्वस्त करता येऊ शकते; मात्र लोकांच्या मनात खोलवर रुजलेली श्रद्धा नष्ट करणे सहज शक्य नसते. गतुंगू येथील माँ गोवशोरी मंदिरात ३६ वर्षांनंतर झालेली पूजा याच विश्वासाचे प्रतीक आहे. मंदिराचे पुन्हा उभे राहणे म्हणजे केवळ एका वास्तूचे पुनरुज्जीवन नव्हे, तर आपल्या मुळांशी आणि सांस्कृतिक अस्मितेशी असलेले नाते जपण्याचा प्रयत्नही आहे.(Maa Govashori Temple)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर