निराधारांचा आधार सेवाव्रती सुमित!

    22-Oct-2026   
 
Sumit Pandit Social Work
 
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत समाजातील उपेक्षितांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणार्‍या सुमित पंडित यांच्याविषयी...
 
रेल्वे स्थानक, बस स्थानक किंवा पदपथांवर अनेकदा अस्ताव्यस्त अवस्थेतली माणसे दिसतात. वाढलेले केस-दाढी, अंगावर फाटके कपडे आणि आजूबाजूच्या परिस्थितीचे भान नसल्यासारखीच त्यांची अवस्था असते. हे पाहून अनेकजण त्यांच्याकडे मनोरुग्ण किंवा निराधार व्यक्ती म्हणून पाहतात. काहीजण हळहळ व्यक्त करतात, तर काही दुर्लक्ष. मात्र, अशा व्यक्तींच्या आयुष्यात जगण्याची उमेद निर्माण करण्यासाठी, पुढाकार घेणारी माणसेही आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील सुमित पंडित हे त्यांपैकीच एक! रस्त्यावरील असाहाय्य व्यक्तींची स्वच्छता करण्यापासून, त्यांना वैद्यकीय उपचार मिळवून देणे, त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेणे, रुग्णांना रक्त आणि भोजन उपलब्ध करून देणे, निराधार वृद्धांची काळजी घेणे, तसेच मुलींच्या शिक्षणासाठी मदत करणे असे त्यांचे सेवाकार्य सुरू आहे.
 
दि. १५ जून १९९३ रोजी जन्मलेल्या सुमित यांना, लहानपणापासूनच समाजसेवेची आवड. संत गाडगेबाबा, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि संत सेना महाराज यांच्या विचारांतून प्रेरणा घेत, ते २०१३ पासून समाजकार्यात सक्रिय झाले. त्यांचे शिक्षण सातवीपर्यंत झाले असून, ते केशकर्तनाचा व्यवसाय करतात. वैयक्तिक अडचणींची मर्यादा असतानाही, इतरांच्या दुःखात सहभागी होण्याची त्यांची वृत्ती त्यांच्या कार्यातून दिसते.
 
छत्रपती संभाजीनगरमधील जटवाडा रस्त्यावर सुमित यांनी ‘माणुसकी वृद्ध सेवालय’ सुरू केले. सुरुवातीला सातजणांच्या सहकार्याने सुरू झालेला हा प्रवास पुढे विस्तारला. आज संस्थेचे अनेक स्वयंसेवक या कार्यात सहभागी आहेत. निराधार वृद्धांना सुरक्षित निवारा, दैनंदिन देखभाल आणि आवश्यक मदत करण्यासाठीच हे कार्य सुरू आहे. अत्यंत दयनीय अवस्थेत रस्त्यावर असलेल्या व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी आणून, त्यांची स्वच्छता केली जाते. नंतर त्यांची आरोग्याची स्थिती लक्षात घेऊन, वैद्यकीय उपचारही केले जातात. मनोरुग्णांच्या उपचारांसाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे, संबंधित प्रशासनाशी समन्वय साधणे आणि त्यांना वैद्यकीय संस्थेत दाखल करणे, या जबाबदार्‍याही सुमित व त्यांचे सहकारी पार पाडतात. आवश्यक त्या प्रकरणांत कायदेशीर प्रक्रियेचे पालन करूनच, उपचारांची व्यवस्था होते.
 
मनोरुग्ण किंवा निराधार अवस्थेत सापडलेली व्यक्ती ही कोणाची तरी आई, वडील, भाऊ, बहीण किंवा मुलगा-मुलगी असू शकते. परिस्थितीमुळे कुटुंबापासून दूर गेलेल्या अशा व्यक्तींना, पुन्हा आपल्या माणसांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुमित करतात. काही वेळेस पोलीस प्रशासनाची मदत घेतली जाते. यातून आतापर्यंत ६०हून अधिक व्यक्तींची, त्यांच्या प्रियजनांशी पुन्हा भेट घडवण्यात सुमित यांना यश आले.
 
या कार्याचा विस्तार करण्यासाठी, समाजातून मदत आणि लोकसहभाग वाढवण्याचेही प्रयत्नही सुरू आहेत. वृद्धांच्या निवार्‍यासाठी दानातून पाच गुंठे जागा उपलब्ध झाली असून, त्यावर लोकवर्गणीतून बांधकाम सुरू आहे. सुमित यांना पत्नी पूजा पंडित यांचीही भक्कम साथ आहे. ‘माणुसकी सेवा ग्रुप’ तसेच छत्रपती संभाजीनगर येथील ‘सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थां’च्या माध्यमातून, विविध उपक्रम ते राबवितात.
 
मुलींच्या जन्माकडे सकारात्मकपणे पाहिले जावे आणि कन्याजन्माचा आनंद साजरा व्हावा, या उद्देशाने त्यांनी ‘बेटी बचाव’ अभियानाच्या माध्यमातून काम सुरू केले. छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मुलीला जन्म देणार्‍या मातेला साडीचोळी, तर वडिलांना शाल-श्रीफळ देऊन सन्मानित केले जाते. नवजात बालिकेलाही कपडे दिले जातात. तसेच तिच्या नावे पोस्टाच्या ‘जीवन सुकन्या योजने’त २८१ रुपये जमा करून, कन्याजन्माचा आनंदोत्सव साजरा होतो. सुमित यांनी ‘कन्या दत्तक पालक योजना’ सुरू केली. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत २५ मुलींचे पालकत्व स्वीकारून, त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यास त्यांनी हातभार लावला आहे.
 
शासकीय रुग्णालयातील गरीब रुग्णांना उपचारांचा खर्च, औषधांची व्यवस्था, भोजन आणि रक्ताची गरज अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या परिस्थितीत मदतीचा हात देण्यासाठी सुमित आणि त्यांचे सहकारी प्रयत्नशील असतात. रात्री-अपरात्रीही वैद्यकीय साहित्यदेखील उपलब्ध करून दिले जाते. रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून सुमारे दोन हजारांहून अधिक रुग्णांसाठी, त्यांनी रक्त उपलब्ध करून देण्यात हातभार लावला.
 
गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सुमित यांनी शैक्षणिक साहित्यवाटपाचे उपक्रम हाती घेतले. मागील दोन वर्षांत सुमारे ३ हजार ३०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप झाले. याशिवाय, बेवारस व्यक्तींच्या अंत्यसंस्काराची जबाबदारीही ‘माणुसकी सेवा ग्रुप’ पार पाडतो. अवघ्या तिशीच्या वयातच त्यांनी समाजसेवेच्या विविध क्षेत्रांत, कामाचा ठसा उमटवला. त्यांच्या कार्याची दखल अनेक जिल्ह्यांतील विविध सेवाभावी संस्था आणि प्रसारमाध्यमांनी घेतली असून, त्यांना १००हून अधिक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. मात्र, निराधार व्यक्तीचे जीवन सुकर होणे, हाच मोठा पुरस्कार असल्याचे ते मानतात. दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या वतीने सुमित पंडित यांना पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!
 
(अधिक माहितीसाठी संपर्क- ७५८८९२८८२२)




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर