माहात्म्य पापांकुशा एकादशीचे...

    22-Oct-2026
 
Papankusha Ekadashi Mahatmya
 
माणूस जीवनामध्ये पुण्यकार्य करण्यासाठी प्रयत्नरत असतो. मात्र, अनावधानाने अथवा काहीवेळा इंद्रियांच्या आहारी जाऊन त्याच्याकडून पाप घडते. अशावेळी धर्माशास्त्राने पापक्षालनासाठी भक्तीचा मार्ग सांगितला. यापैकी एक म्हणजे एकादशीचे व्रत! अनेक संतांनीही एकादशी व्रताचे माहात्म्य वर्णिलेले आहे. आपल्याला आषाढी आणि कार्तिकी एकादशीविषयी माहिती असते. आज असलेल्या पापांकुशा एकादशीचेमाहात्म्य विशद करणारा हा लेख...
 
भारतीय सनातन धर्मपरंपरेत एकादशीचे स्थान अनन्यसाधारण. प्रत्येक महिन्यातील शुल आणि कृष्ण पक्षातील एकादशी, ही भगवान श्रीविष्णूंच्या आराधनेसाठी योग्य काळ. मात्र प्रत्येक एकादशीचे स्वतंत्र माहात्म्य, वैशिष्ट्य आहे. आश्विन महिन्याच्या शुल पक्षातील एकादशी ’पापांकुशा एकादशी’म्हणून प्रसिद्ध आहे. ’पाशांकुशा’ या नावानेही तिचा उल्लेख करतात. विजयादशमीनंतर येणारी ही एकादशी भक्ताला अंतःकरणातील दोषांवर विजय मिळविण्याचा आणि श्रीहरीच्या चरणी स्वतःला समर्पित करण्याचा संदेश देते. या एकादशीच्या नावातच तिचे आध्यात्मिक रहस्य दडलेले आहे.
 
‘पाप’ आणि ‘अंकुश’ या दोन शब्दांपासून ‘पापांकुशा’ हा शब्द सिद्ध होतो. मदोन्मत्त हत्तीला अंकुशाच्या साहाय्याने नियंत्रित करता येते, त्याप्रमाणे माणसाच्या अंतःकरणातील अनियंत्रित वासनांवर, दुष्प्रवृत्तींवर आणि पापकर्मांकडे ओढणार्‍या प्रवृत्तींवर नियंत्रण मिळविण्याची प्रेरणा ही एकादशी देते. मनुष्याला बाहेरच्या शत्रूपेक्षाही स्वतःच्या मनातील काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे शत्रू अधिक त्रासदायक ठरतात. या षड्रिपुंवर विजय मिळविण्यासाठी, मनाला भगवंताच्या चरणी स्थिर करणे आवश्यक आहे. पापांकुशा एकादशी आत्मशुद्धीचे हेच साधन भक्ताच्या हाती देते.
 
‘पद्मपुराणा’च्या उत्तरखंडात पापांकुशा एकादशीचे विस्तृत माहात्म्य आले आहे. धर्मराज युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णांना विचारतात, ”हे मधुसूदना! आश्विन महिन्यातील शुल पक्षात येणार्‍या एकादशीचे नाव काय? तिचे माहात्म्य मला कृपया सांगावे.” 
तेव्हा भगवान श्रीकृष्ण उत्तर देतात,
 
पापांकुशेति विख्याता सर्वपापहरा परा|
पद्मनाभाभिधानं मां पूजयेत्तत्र मानवः॥
 
अर्थात, ही एकादशी पापांकुशा या नावाने विख्यात असून, सर्व पापांचे हरण करणारी आहे. या दिवशी मनुष्याने माझ्या पद्मनाभ स्वरूपाची आराधना करावी.
 
श्रीविष्णूंच्या सहस्रनामांमधील पद्मनाभ हे एक अत्यंत सुंदर नाम. ज्यांच्या नाभिकमलातून सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवांचा उदय झाला, ते भगवान पद्मनाभ! सार्‍या चराचर विश्वाच्या उत्पत्तीचे अधिष्ठान असलेल्या त्या परमात्म्याचे स्मरण म्हणजे, आपल्या क्षुद्र अहंकाराचा त्याग करून विश्वव्यापक ईश्वरी सत्तेपुढे नतमस्तक होणे होय! भगवान श्रीकृष्ण या एकादशीच्या दिवशी आपल्या पद्मनाभ स्वरूपाचे पूजन करण्यास सांगतात, यामध्ये भक्तीबरोबरच शरणागतीचाही गहन आशय सामावलेला आहे.
 
या व्रताचे महात्म्य वर्णन करताना श्रीकृष्ण सांगतात की, दीर्घ काळ कठोर तपश्चर्या आणि इंद्रियसंयम केल्याने प्राप्त होणार्‍या पुण्याची प्राप्तीही, भगवंताच्या भक्तिभावपूर्वक आराधनेने होऊ शकते. हजारो अश्वमेध आणि शेकडो राजसूय यज्ञांपेक्षाही, एकादशी व्रताचे पुण्य श्रेष्ठ असल्याचे पुराणातील फलश्रुती सांगते. या वर्णनाचा गाभा असा की, भगवंताला बाह्य वैभवापेक्षा अंतःकरणातील निर्मळ भक्तिभाव अधिक प्रिय आहे. मोठमोठे यज्ञ करण्याचे सामर्थ्य सर्वांजवळच नसते; परंतु भगवंताचे नाम घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.
 
प्राचीन काळी विंध्य पर्वताच्या परिसरात क्रोधन नावाचा एक व्याध राहत होता. त्याचे नाव जसे क्रोधन, तसाच त्याचा स्वभावही क्रूर होता. हिंसा, असत्य, चोरी, लुबाडणूक आणि निर्दयता यांत त्याचे संपूर्ण आयुष्य व्यतीत झाले. दुसर्‍यांच्या वेदनांची त्याला पर्वा नव्हती. निष्पाप पशुपक्ष्यांची हत्या करताना त्याचे मन द्रवत नसे. धनसंपत्ती आणि क्षणिक सुखांच्या मागे धावताना त्याने धर्म, दया, सत्य आणि सदाचार या जीवनमूल्यांकडे पाठ फिरविली होती.
 
परंतु, काळ कोणासाठी थांबत नाही. आयुष्याच्या संध्याकाळी क्रोधनाचा मृत्यू जवळ आला. कथेनुसार, यमदूतांनी त्याला त्याच्या मृत्यूची सूचना दिली. आयुष्यभर दुसर्‍यांना भयभीत करणारा क्रोधन, स्वतः प्रथमच भयाने थरथर कापू लागला. आजवर केलेल्या सर्व पापकर्मांची त्याला आठवण झाली. निरपराध प्राण्यांची हत्या, लोकांना दिलेला त्रास आणि आयुष्यभर केलेले अधर्माचरण त्याच्या डोळ्यांसमोर उभे राहिले. ज्या माणसाच्या अंतःकरणात कधी पश्चात्तापाचा लवलेश नव्हता, त्याच मनात आता अपराधाची जाणीव जागृत झाली.
 
मृत्यूच्या भयाने व्याकुळ झालेला क्रोधन महर्षी अंगिरा यांच्या आश्रमात पोहोचला. ऋषींच्या चरणांवर मस्तक ठेवून तो विनवू लागला, "हे महर्षे! माझे संपूर्ण आयुष्य पापकर्मांत गेले. मी असंख्य जीवांना दुःख दिले. कोणत्याही पुण्यकर्माचा विचार केला नाही. आता माझा मृत्यू समीप आला आहे. माझ्यासारख्या पाप्याचा उद्धार होण्याचा काही मार्ग आहे काय? माझ्यावर कृपा करा!”
अंगिरा ऋषींनी त्याच्याकडे करुणेने पाहिले. पाप कितीही मोठे असले, तरी पश्चात्तापाने व्याकुळ झालेल्या जीवासाठी भगवंताच्या कृपेची दारे बंद नसतात, याची त्याला जाणीव करून दिली. त्यांनी सांगितले, "उद्या आश्विन शुल पक्षातील पापांकुशा एकादशी आहे. तू त्या दिवशी श्रद्धेने उपवास कर, भगवान श्रीविष्णूंची आराधना कर आणि त्यांचे नामस्मरण कर. श्रीहरीच्या चरणी शरण जा.”
 
क्रोधनाने ऋषींची आज्ञा शिरसावंद्य मानली. आयुष्यभर विषयवासनांच्या मागे धावणारे त्याचे मन आता प्रथमच भगवंताच्या चिंतनात स्थिर झाले. त्याने मनोभावे एकादशीचे व्रत केले. श्रीविष्णूंचे स्मरण केले. त्याच्या अंतःकरणात अपराधाचा पश्चात्ताप, भगवंताविषयी श्रद्धा आणि उद्धाराची उत्कट आकांक्षा जागृत झाली होती. पापांकुशा एकादशीच्या व्रतप्रभावाने त्याच्या पापांचे क्षालन झाले, आणि त्याला विष्णुलोकाची प्राप्ती झाली.
 
मनुष्य कितीही अधःपाताला गेला असला, तरी त्याच्या अंतःकरणात खरा पश्चात्ताप आणि भगवंताविषयी अनन्य भक्ती जागृत झाल्यास आत्मोद्धाराचा मार्ग त्याच्यासाठी खुला होऊ शकतो. क्रोधन व्याधाच्या कथेतून नेमकाच हाच संदेश मिळतो.
 
श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनीही या तत्त्वाचा स्पष्ट उपदेश केलेला आहे,
अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक्|
साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः॥
 
अर्थात, अत्यंत दुराचारी मनुष्यसुद्धा अनन्यभावाने माझी भक्ती करू लागला, तर त्याच्या दृढ शुभनिश्चयामुळे त्याला साधू मानावे. (भगवद्गीता ९.३०)
 
याचा अर्थ पाप केले की उपवास करून त्यातून सहज मुक्त होता येते, असा मुळीच नाही. खरा पश्चात्ताप माणसाचे आचरण बदलतो. ज्याने दुसर्‍यांना दुःख दिले, त्याच्या अंतःकरणात करुणा उत्पन्न झाली पाहिजे. ज्याने असत्याचा आश्रय घेतला, त्याने सत्याचा स्वीकार केला पाहिजे. ज्याच्या हातून अन्याय घडला, त्याने शक्य तेथे त्याचे परिमार्जन केले पाहिजे. अशा परिवर्तनातूनच भक्तीला तिचे खरे सार्थक प्राप्त होते.
 
पापांकुशा एकादशीच्या दिवशी उपवासाबरोबरच भगवान पद्मनाभांचे पूजन, विष्णुसहस्रनामाचे पठण, हरिनामाचा जप, भगवद्गीतेचे वाचन, रात्रिजागरण आणि दानधर्म यांना विशेष महत्त्व आहे. ‘पद्मपुराणा’त अन्न, जल, तीळ, वस्त्रे आणि इतर उपयुक्त वस्तूंच्या दानाचे माहात्म्यही वर्णिलेले आहे. दान करण्यासाठी मनुष्य श्रीमंत असण्याची आवश्यकता नाही. आपल्या सामर्थ्यानुसार केलेले दानही पुण्यकारकच असते. उपवासाने इंद्रियांना संयमाचे वळण लागते, नामस्मरणाने चित्त प्रसन्न होते आणि दानधर्माने अंतःकरणातील स्वार्थ कमी होतो.
 
महाराष्ट्राच्या भागवत संप्रदायात तर एकादशीला विशेष जिव्हाळ्याचे स्थान. पंढरीचा पांडुरंग हा भक्तांच्या अंतःकरणाचा विसावाच. विठ्ठलनामाचा गजर, तुळशीमाळ, हरिपाठ, अभंगगायन आणि संतवाङ्मयाचे चिंतन यांतूनच, भक्तीची ही परंपरा शतकानुशतके प्रवाहित होत आहे. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ आणि तुकाराम महाराजांनी भक्तीला केवळ बाह्य उपचारांपुरते मर्यादित न ठेवता दया, क्षमा, समता, सदाचार आणि नामस्मरण यांच्याशी जोडले. त्यामुळेच एकादशीचा उपवासही मनःशुद्धीचे एक साधन होते.
 
पापांकुशा एकादशी आपल्याला आणखी एक गोष्ट शिकविते. भगवंताला आपल्या वैभवाची, पदप्रतिष्ठेची अथवा पांडित्याची आवश्यकता नाही. त्याला अपेक्षित आहे, ती निर्मळ श्रद्धा, निष्कपट प्रेम आणि शरणागत भाव. भगवंताच्या चरणी नतमस्तक होताना, भक्ताच्या मनातील अहंकार गळून पडतो. नामस्मरणातून चित्ताला स्थैर्य लाभते आणि सदाचरणातून त्याची भक्ती जीवनात उतरते. या एकादशीचे खरे फलित केवळ एका दिवसाच्या उपवासात नसून, त्या दिवसापासून सुरू होणार्‍या अंतःकरणाच्या परिवर्तनात आहे. पाप करण्याची प्रवृत्तीच क्षीण होणे, वाईट सवयींवर नियंत्रण मिळविणे, सर्व जीवांविषयी दयाभाव ठेवणे आणि जीवनातील प्रत्येक कर्म श्रीहरीला अर्पण करण्याच्या भावनेने करणे, हीच या व्रताची सार्थकता.
 
पापांकुशा एकादशीच्या या पवित्र पर्वावर भगवान पद्मनाभांच्या चरणी एकच प्रार्थना करूया, हे लक्ष्मीकांता, हे दीनदयाळा, हे भक्तवत्सला श्रीहरी! आमच्या अंतःकरणातील दुष्प्रवृत्ती दूर कर. आमच्या मनात सद्बुद्धी, हृदयात करुणा, वाणीमध्ये माधुर्य आणि आचरणात धर्मनिष्ठा जागृत कर. तुझ्या नामाचा विसर आम्हाला कधी पडू देऊ नकोस.
 
॥ॐ नमो भगवते वासुदेवाय॥
॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥

- आसावरी पाटणकर




संबंधित मजकूर