कल्पतरू बहरताना...

    22-Oct-2026   
 
 Reliance Jio 10 Years Journey
 
‘ग्रोथ इज लाईफ’ हे ब्रिदवाय असलेल्या ‘रिलायन्स जिओ’ची दशकपूर्ती झाली. कंपनी आता ‘जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिडेट’ अशी बिरुदावली मिरवत असून, कंपनीचा ‘आयपीओ’ बाजारात आला आहे. गेल्या दहा वर्षांत ‘जिओ’च्या माध्यमातून इंटरनेट, दूरसंचार, गुंतवणूकदार आणि भांडवली बाजारातील स्थित्यंतराचा हा प्रवास नेमका कसा होता, त्याचेच हे आकलन...
 
सुरुवातीला मोफत इंटरनेटमुळे लोकप्रिय ठरलेल्या ‘जिओ’ची स्थापना, दि. ५ सप्टेंबर २०१६ रोजी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर झाली. कंपनीने सुरुवातीला सहा महिने मोफत ‘४-जी’ इंटरनेट सेवा जाहीर केल्यावर, ‘टॅरिफ रिचार्ज’ आणि ‘व्हॉईस कॉलिंग पॅक’च्या जोखडातून भारतीय मोबाईल युझर मुक्त झाला. मोफत ‘जिओ एचडी व्हॉईस कॉल्स’, वेगवान इंटरनेट, मोफत ‘एसएमएस’ या प्रमुख आणि आकर्षक सेवांसह कंपनीने ‘जिओ टीव्ही’, ‘जिओ सिनेमा’, ‘जिओ म्युझिक’, ‘जिओ मनी’ आणि ‘जिओ न्यूज’सहित, ‘इन्फोटेन्मेंट पॅस’ही खुले केले. त्याकाळी ‘टिकटॉक’ आणि ‘व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड्स’च्या अधीन असलेल्या युझर्सला, पहिल्यांदाच मोबाईल स्क्रीनवर सिनेमा, टीव्ही आणि इतर मनोरंजनाची साधने उपलब्ध झाली. पर्यायाने दहा रुपयांपासून, अगदी हजार रुपयांपर्यंत होणार्‍या ‘टॅरिफ रिचार्ज’ची वेळखाऊ पद्धत मागे पडली.
 
‘जिओ’च्या दणक्यात झालेल्या बाजारातील प्रवेशाने, इतर ‘टेलिकॉम’ कंपन्यांनाही आपल्या व्यावसायात पूरक असा रणनीतिक बदल करावाच लागला. कालांतराने दरवर्षी ‘रिलायन्स’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत, ‘जिओ’विषयी ठळकपणे उल्लेख होऊ लागला. मोफत ‘जिओ फोन’ ही भन्नाट कल्पना, कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचीच. हा फिचर फोनच ‘जिओ’च्या भविष्यातील रणनीतीसाठी ‘गेमचेंजर’ ठरणार होता. याद्वारे देशातील गावखेड्यात इंटरनेटच्या सुविधा उपलब्ध झाल्या. ‘यूपीआय’ पेमेंट, लाईव्ह टीव्ही, मनोरंजन आणि क्रिकेटसहित सर्व अपडेट्स गावाखेड्यात पोहोचू लागले. आजही भारतात २६.१ कोटी ग्राहक, हाच फिचर फोन वापरण्यावरच भर देतात. अर्थात, ‘जिओ’कडे ‘५-जी’मध्ये परावर्तित होणारा, स्वतःचा हक्काचा ग्राहकवर्ग आहेच. शिवाय, एकूण ग्राहकवर्गाची संख्याही ५३.३३ कोटी इतकी आहे.
 
सोबतच ‘जिओ’ने स्वतःचा ‘इन्फोटेन्मेंट प्लॅटफॉर्म’ही तयार केला. यात कला, मनोरंजन, संगीत, सिनेमा, टीव्ही आणि डिजिटल पेमेंट अशा सर्वच सोयी ग्राहकांना देण्यात आल्या. एव्हाना, भारतातील प्रमुख शहरांतही ‘ब्रॉडबॅण्ड’ सेवा किंवा ‘वाय-फाय’चे जाळे विस्तारलेले नव्हते. टॅरिफ कार्डवर रिचार्ज करणार्‍यांसाठी हा सुखद धक्काच होता. परिणामी, भारतातील मोठा ग्राहकवर्ग ‘जिओ’कडे वळला, ज्याद्वारे भारतीय मोबाईल ग्राहकांनी व्हिडिओज पाहण्यास सुरूवात केली. यानंतर भारतात ‘युट्यूब’ आणि ‘फेसबुक’ वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली. ‘युट्यूब’ क्षेत्राला गती याचदरम्यान मिळाली. ‘वेबसिरीज’, ‘ओटीटी’चा स्वतंत्र प्रेक्षक निर्माण होऊ लागला. सिनेमा ‘ओटीटी’वर उपलब्ध होत असल्याने पूर्वीच्या काळी ‘सीडी’-‘डीव्हीडी’द्वारे, त्यानंतर इंटरनेटवर होणारी सिनेमांची ‘पायरसी’ही संपुष्टात आली.
 
दरम्यान ‘लॉकडाऊन’ सुरू झाले आणि घरबसल्या व्हिडिओ आणि समाजमाध्यम पाहणार्‍यांचीही संख्या वाढली. ‘जिओ’ने बाजारात आपले बस्तान बसवलेच होते. पूर्वी मोफत मिळणारी इंटरनेट सेवा, आता किफायतशीर दरात उपलब्ध होऊ लागली. ‘लॉकडाऊन’ काळात अनेक सोशल मीडिया क्रिएटर्सनी नशीब आजमावले. आजघडीला दिसणार्‍या इंटरनेट स्टार्सपैकी अनेकांची सुरुवात तेव्हाच झाली होती. ‘डिजिटल पेमेंट’चाही विस्तार याच काळातला. ‘यूपीआय’ सेवेलाही आता दहा वर्षे पूर्ण होत आहेत.
 
छोटे व्यापारी, सर्वसामान्य दुकानदार, शेतकरी, शेतमालविक्रेते, अगदी गावाखेड्यापर्यंत ‘यूआर’ कोडद्वारे व्यवहार शक्य झाले. वेगवान आणि सुरक्षित इंटरनेट सेवाविस्ताराद्वारे ‘जिओ’ने ग्राहकांचा विश्वास जिंकला. भारतातील गावखेड्यापर्यंत पोहोचण्यासाठी, कंपनीने स्वतःच्या तंत्रज्ञानावर आधारित ‘डिजिटल इन्फ्रास्ट्रचर’ उभारले. भारतात आजघडीला पूर्व आणि पश्चिमी भागातील दुर्गम ठिकाणीही, ‘जिओ’ विनाअडथळा सेवा पुरवत आहे. जिथे भूकंपप्रवण क्षेत्रे, महापूरप्रवण क्षेत्रात पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचा कंपन्या विचार करीत असत, तिथे ‘जिओ’ने प्रवेश करुन अशा क्षेत्रांसाठी स्वतंत्र ‘इन्फ्रास्ट्रचर’च उभारले. ‘जिओ भारत फोन’ची किंमत रु. ७९९पेक्षा जास्त वाढणार नाही, याचीही काळजी कंपनीने घेतली. ‘जिओ भारत’ केवळ ‘कॉलिंग फोन’ म्हणून न राहता, तो ‘यूपीआय’ पेमेंट्स, व्हिडिओ आणि संगीत ऐकण्यासाठीही उपलब्ध आहे. मोफत ‘ओटीटी’ आशय मिळाल्याने, इतर कंपन्यांचा ग्राहकवर्गही ‘जिओ’कडे वळू लागला. भारताच्या ९९ टक्के लोकसंख्येपर्यंत, ‘जिओ’ नेटवर्कची व्याप्ती पोहोचवू शकला. जून २०२६च्या तिमाहीत, ‘जिओ’च्या विविध अ‍ॅप्सवरील मिळून सरासरी मासिक प्रेक्षकसंख्या ३६.२६ कोटी इतकी आहे.
 
‘जिओ’च्या विवरण पत्रानुसार, ‘जिओ’च्या वायरलेस ‘ब्रॉडबॅण्ड’चा बाजारातील हिस्सा ४९.७८ टक्के इतका आहे. सुमारे ५३.३३ कोटी ग्राहक हेच ‘जिओ’चे खरे बलस्थान. प्रत्येक ग्राहकाचा मासिक डेटा वापर ४३.७ जीबी इतका आहे. कंपनीला ग्राहकसेवा आणि इतर व्यवहारांतून, सुमारे जून २०२६ तिमाहीत ३९ हजार १७२.९ कोटी इतका महसूल मिळाला. तर ईबीटीडी- २० हजार ८६४.५ कोटी इतका आहे.
 
भविष्यात भारतीय ‘टेलिकॉम’ कंपन्या, सॅटलाईट इंटरनेट सेवा देण्याच्या स्पर्धेतही दिसणार आहेत. ‘६-जी’ इंटरनेटसाठीची ‘पेटंट’ तयारीही ‘जिओ’ करीत आहे. ‘जिओ’ने आतापर्यंत एकूण ६ हजार ८१७ अर्ज दाखल झाले आहेत. त्यांपैकी २ हजार ३९३ भारतात, तर ४ हजार ४२४ परदेशात आहेत. जागतिक स्तरावर १००९ अर्ज मंजूर झाले आहेत. ‘पेटंट’ अर्जांमध्ये ‘५-जी’, ‘६-जी’, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ‘लाऊड’ तंत्रज्ञान आणि नेटवर्क सॉफ्टवेअरसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. याच ‘व्हिजन’सह कंपनीने बाजारात ‘आयपीओ’ आणला असून, त्यालाही चांगला प्रतिसाद गुंतवणूकदार देत आहेत. केवळ दूरसंचार सेवेपुरतेच मर्यादित न राहता ‘जिओ’ने मोबाईल, टीव्ही, ‘ओटीटी’, गॅजेट्स अशा विविध क्षेत्रांत पाऊल टाकले. ‘जिओ’च्या छताखाली ‘जिओ हाप्तिक टेनोलॉजिज् प्रा.लि.’, ‘जिओ मीडिया लि.’, ‘जिओ सॅटेलाईट कम्युनिकेशन्स लि.’, ‘जिओ थिंग्ज’, ‘सावन मीडिया’ अशा विविध कंपन्या आपआपल्या क्षेत्रात कूच करत आहेत. ‘रिलायन्स’च्या सावलीतील या एका रोपट्याची दशकपूर्ती झालीच; पण भविष्यात हा भारतीय दूरसंचार आणि डिजिटल सेवा क्षेत्रातील ‘कल्पतरू’ होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
 
 




तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक. 

संबंधित मजकूर