मुंबई (Bhau Torsekar on Hindutva) : हिंदूंचे एक वैशिष्ट्य आहे; जोपर्यंत संघर्ष निर्माण होत नाही, तोपर्यंत हिंदुत्व जागृत होत नाही. कसोटीतूनच हिंदुत्व जागृत होते, असे विधान ज्येष्ठ राजकीय विश्लेषक तथा ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी केले. अयोध्येमध्ये श्रीरामजन्मभूमीवर प्रभु श्रीरामांचे मंदिर उभारण्याचा कायदेशीर लढा आणि त्याचा इतिहास यांवर आधारित अरविंद सिंह यांच्या ‘इंडियाज रोग हिस्टॉरियन्स’ या पुस्तकावरील संवादाच्या कार्यक्रमात भाऊ तोरसेकर बोलत होते. शनिवार, दि. १० ऑक्टोबर रोजी प्रभादेशी येथील पु.ल. देशपांडे ॲकॅडमीमध्ये ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी व्यासपिठावर विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष अशोक चौगुले, ज्येष्ठ विधीज्ञ अधिवक्ता नितीन प्रधान उपस्थित होते. या वेळी भोऊ तोरसेकर म्हणाले, ‘‘काँग्रेस सरकारच्या अनेक वर्षांच्या सत्ताकाळात हिंदू स्वत:ची ओळख विसरले आहेत. मारुतीरायांच्या खांद्यावर बसून समुद्र उड्डाण करून जर प्रभु श्रीराम लंकेला जाऊ शकले असते, तर समुद्रावर सेतु बांधण्याची आवश्यकता काय होती ? वानरांमध्ये लढण्याची जिद्द निर्माण व्हावी, यासाठी प्रभु श्रीरामांनी त्यांच्याकडून सेतु बांधून घेतला. त्याचप्रमाणे सद्यस्थितीतही हिंदूंमधील हिंदुत्व जागृत करण्याची आवश्यकता आहे. या संघर्षाच्या काळात मात्र आपणा सर्वांना समस्त हिंदूंना ‘हिंदू’ म्हणून ठामपणे उभे रहायला हवे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून हिंदुत्वाला जागृत करण्याचे काम करत आहेत.’’(Bhau Torsekar on Hindutva)
कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनाविषयी भाऊ तोरसेकर म्हणाले, ‘‘आंदोलन कधीही कंत्राटी पद्धतीने निर्माण करता येत नाही, ते उत्स्फूर्तपणे असावे लागते. जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन हे बिर्याणी खाऊन भरल्यापोटी चालू आहे. झुरळाचे जीवनमान काही मासांचे असते. पंख आल्यावर झुरळे जेव्हा उडायला लागते, तेव्हा ते आपल्या निदर्शनास येते. त्यावेळी उडणार्या झुरळाला चप्पलने मारावे लागते. त्याचप्रमाणे ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या पदाधिकार्यांना भविष्यात जनता रस्त्यावर उतरून मारेल, असे या वेळी भाऊ तोरसेकर म्हणाले.(Bhau Torsekar on Hindutva)
कार्यक्रमाच्या प्रारंभी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घडयाळपाटील यांनी ‘इंडियाज रोग हिस्टॉरियन्स’ या पुस्तकाविषयी लेखक अरविंद सिंह यांची मुलाखत घेतली. त्यानंतर मान्यवरांनी भाषणे केली. ज्येष्ठ विधीज्ञ नितीन प्रधान यांनी ‘भारतात डाव्या पक्षांचा विस्तार, तसेच न्यायव्यवस्थेवरील साम्यवादाचा प्रभाव’ याविषयी विचार मांडले. अशेक चौगुले यांनी ‘निधर्मी हिंदूंपासून हिंदुत्वाला असलेले धोके’ यांवर भाष्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद काथे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता संपूर्ण वन्दे मातरम्’ने झाली. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने धर्मप्रेमी हिंदू उपस्थित होते.(Bhau Torsekar on Hindutva)
अयोध्येत श्रीराम मंदिरा व्हावे ही नरसिंह राव यांची इच्छा नव्हती! - अरविंद सिंह, पुस्तकाचे लेखक
श्रीरामजन्मभूमीवरील बाबरी ढाचा पाडण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांनी हिंदूंना साहाय्य केले, असे चित्र आतापर्यंत रंगवले गेले; परंतु नरसिंहराव यांनी स्वत:चे संधीसाधू राजकारण केले. रामजन्मभूमीमध्ये सापडलेले मंदिराचे पुरावे पुढे येऊ नयेत आणि मंदिर उभारले जाऊ नये, हीच त्यांची भूमिका होती. त्यांचे विशेष कार्य अधिकारी किशोर कुणाल यांनी स्वत: याविषयी लिखाण केले आहे.(Bhau Torsekar on Hindutva)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक