मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सामान्यतः एकटेपणाने वावरणाऱ्या आणि पाडसांच्या संगोपनात नराचा सहभाग नसल्याचे मानले जाणाऱ्या भेकराच्या वर्तनाची दुर्मिळ नोंद नागपूरच्या बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात झाली आहे (NAGPUR NEWS). एका नर भेकराने (Muntiacus muntjak) सुमारे चार आठवड्यांच्या पाडसाच्या चेहऱ्यावर आणि मानेवर चाटून स्वच्छता केल्याचे निरीक्षण करण्यात आले (NAGPUR NEWS). मात्र, एकाच प्रसंगावरून या वर्तनाला निश्चितपणे ‘पितृसंगोपन’ म्हणता येणार नसल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. (NAGPUR NEWS)
भेकराच्या एका दुर्मीळ वर्तनाची नोंद बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या नियतकालिकामध्ये झाली आहे. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय, नागपूर येथे कार्यरत दीपक एस. सावंत आणि दर्शन दुधाने यांनी ही नोंद केली आहे. त्यांनी टिपलेल्या नोंदीनुसार, २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५.२८ वाजता गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातील भेकराच्या अधिवासात हे निरीक्षण झाले. नर भेकर पाडसाच्या अगदी जवळ राहून सतर्क वर्तन करत होता. सुमारे २० मिनिटांच्या निरीक्षणादरम्यान त्याने अनेक वेळा पाडसाच्या चेहऱ्यावर आणि मानेवर चाटल्याचे दिसून आले. या वेळी ५० मीटरच्या परिसरात अन्य कोणतेही भेकर आढळले नाही. मादीही त्या ठिकाणी दिसली नाही. या वर्तनाचे मोबाइल फोनच्या कॅमेऱ्याने दस्तऐवजीकरण करण्यात आले. त्यानंतर त्याच नराला आणि पाडसाला पुन्हा शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, मोठा परिसर, दाट वनस्पती आणि लपण्यासाठी असलेल्या अनेक जागांमुळे ते पुन्हा आढळले नाहीत. त्यामुळे या परस्परसंवादाची पुनरावृत्ती होते का, हे निश्चित करता आले नाही.
हे निरीक्षण ४० हेक्टरच्या ड्राइव्ह-थ्रू सफारी परिसरात झाले. या ठिकाणी नीलगाय, काळवीट, चितळ, सांबर, पाणगवा, बाराशिंगा यांसह विविध तृणभक्षी प्राणी आहेत. या परिसरात १७ भेकरांचा समूह असून त्यांच्यासाठी गवताळ प्रदेश, झुडपी भाग, पूर्वीच्या सागवान लागवडी, पाणवठे आणि दाट वनस्पती असलेले अधिवास उपलब्ध आहेत. भेकरांना नैसर्गिक वनस्पतींसोबत बाहेरून ताजे हिरवे खाद्यही दिले जाते. संशोधन टिपणानुसार, या भेकरांना दिल्लीतील राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातून आणण्यात आले असून ते अनेक पिढ्यांपासून बंदिस्त अवस्थेत प्रजनन झालेले आहेत. मोठ्या परिसरामुळे त्यांना पसंतीच्या सूक्ष्म अधिवासात विखुरता आले असून, एकटे नर, नरांचे समूह आणि प्रजनन करणाऱ्या जोड्या अशा विविध सामाजिक रचना दिसून आल्या आहेत.
‘पितृसंगोपन’ की केवळ संरक्षणात्मक वर्तन?
संशोधकांनी या घटनेचे स्पष्टीकरण देताना काही शक्यता मांडल्या आहेत. बंदिस्त अधिवासात प्रदेशासाठीचा ताण कमी असणे आणि अन्नाची नियमित उपलब्धता यामुळे नैसर्गिक परिस्थितीपेक्षा वेगळे सामाजिक वर्तन दिसू शकते. तसेच, मादी जवळ नसताना नराने पाडसाच्या असुरक्षिततेला प्रतिसाद दिला असण्याची शक्यता आहे. मोठ्या आणि रचनात्मकदृष्ट्या वैविध्यपूर्ण अधिवासामुळेही अशा प्रकारचे सूक्ष्म सामाजिक वर्तन घडू शकते. मात्र, पाडस मादीपासून तात्पुरते वेगळे झाले होते किंवा त्याला सोडून देण्यात आले होते, अशी शक्यताही नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत नराचे वर्तन हे पालकत्वापेक्षा संधीसाधू किंवा संरक्षणात्मक असू शकते. त्यामुळे या घटनेमागील नेमकी प्रेरणा निश्चित करता येत नसल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे.