‘हिंदू’ची व्याख्या धर्माच्या पलीकडे; सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे लंडनमधील कार्यक्रमात प्रतिपादन

    08-Sep-2026   

मुंबई :
(RSS Sarsanghachalak UK tour) 'हिंदू' हा शब्द केवळ धार्मिक आचार-विचार किंवा जीवनशैलीच्या आधारावर समजता येत नाही. हिंदू ही एक प्रकृती आहे. समाजाला अशा प्रकृतीची गरज आहे जी सर्व विविधता स्वीकारते आणि तिचा सन्मान करते, कारण सर्व मार्ग एका ध्येयाकडे जातात, असा तिचा विश्वास आहे. सर्व विविधता ही एकतेचीच वेगवेगळी रूपे आहेत. म्हणून हिंदू हा केवळ धर्म नाही, तर एक व्यापक सभ्यतागत संकल्पना आहे. हिंदू धर्मातील विविध परंपरा त्यांच्या स्वतंत्र तत्त्वज्ञान आणि आचारांसह या व्यापक हिंदू सभ्यतेच्या कक्षेत सहअस्तित्व राखू शकतात, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.

रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी लंडन येथे आयोजित 'सेलिब्रेशन ऑफ वननेस' या कार्यक्रमात संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासाशी संबंधित विविध प्रश्नांची उत्तरे देत संघाची व्यापक दृष्टी स्पष्ट केली. न्यूयॉर्क येथे २९ ऑगस्ट आणि टोरोंटो येथे ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या संवादानंतर सरसंघचालकांनी लंडन येथे वैश्विक संवाद साधला. (RSS Sarsanghachalak UK tour)

जगासाठी हिंदू सभ्यतेचे सर्वात महत्त्वाचे योगदान काय आहे, यावर बोलताना सरसंघचालकांनी सांगितले की, सर्व हिंदू विचार एका सूत्रावर आधारित आहेत; प्रत्येक कृतीमागे एक कारण असते. अस्तित्व प्रत्यक्षात एकच आहे, जरी ते विविध स्वरूपात दिसत असले तरी. विविधता हा आपला स्वभाव आहे. त्यामुळे ती स्वीकारायची आणि तिचा सन्मान करायचा. विविधता ही अस्तित्वाच्या एकतेची विविध अलंकार आहेत. एकच अनेक झाले आहे, म्हणून अनेकांचा सन्मान केला जातो. या दृष्टिकोनातूनच आपण प्रत्येक विषयाकडे पाहतो. (RSS Sarsanghachalak UK tour)

संघाच्या सेवा कार्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, स्वयंसेवक मानवी जीवनाच्या जवळपास प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्याचा संपूर्ण आवाका एका उत्तरात सांगणे कठीण आहे. राजकीय कारणांमुळे आमचा विरोध करणारे लोकही आमच्या कार्याची आणि स्वयंसेवकांच्या गुणांची दखल घेतात. महत्त्वाच्या विषयांवर ते आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करतात आणि संवाद साधतात. हे समाजातील विविध घटकांमध्ये संघाच्या कार्याची वाढती स्वीकारार्हता दर्शवते. जिथे कोणी काही करत नाही, तिथे संघ सेवा करत असतो - लडाखपासून कन्याकुमारीपर्यंत.(RSS Sarsanghachalak UK tour)

सातव्या पिढीपूर्वी संघटन पूर्ण करण्याचे लक्ष्य

सातवी पिढी येण्यापूर्वी हिंदू संघटनाचे कार्य पूर्ण व्हावे, अशी इच्छा याप्रसंगी त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, सर्वप्रथम माझ्या मनात येते की हे कार्य पूर्ण होण्यासाठी इतका वेळ लागायला नको. सध्या माझी तिसरी पिढी कार्य करत आहे. संघात आणखी दोन पिढ्या एकत्र काम करत आहेत. अशा प्रकारे पाच पिढ्या एकत्र कार्यरत आहेत. सातवी पिढी येण्यापूर्वी हिंदू समाजाच्या संघटनाचे कार्य पूर्ण व्हायला हवे. नव्या पिढीत जग अधिक चांगले बनवण्याची तीव्र इच्छा आहे. ते छोट्या-छोट्या मतभेदांच्या पलीकडे जाऊन एकत्र काम करण्यास तयार असतात. ते अधिक प्रामाणिक असतात. त्यांना योग्य वाटणारी गोष्ट ते सहज स्वीकारतात आणि त्यानुसार कृती करतात. आपण त्यांना ध्येय द्यावे, अनुभवातून मिळालेले ज्ञान द्यावे; पण ते त्यांच्यावर लादू नये. त्यांना त्यांचा मार्ग स्वतः शोधू द्यावा. (RSS Sarsanghachalak UK tour)

या संवादाचे संचालन युनायटेड किंगडम मधील वेलनेस तज्ज्ञ ममता सुब्रह्मण्यम यांनी केले हिंदू स्वयंसेवक संघ यूके आयोजित या कार्यक्रमात सुमारे ६०० प्रतिनिधींनी ३२६ संस्थांचे प्रतिनिधित्व केले. कार्यक्रमाला हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य, हाऊस ऑफ कॉमन्सचे खासदार, महापौर, नगरसेवक, तसेच ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त पेरियासामी कुमारन, उपउच्चायुक्त कार्तिक पांडे आणि विविध समुदायांचे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी नेपाळमधील पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मौन पाळण्यात आले. यावेळी सेवा यूके ने नेपाळमधील मदतकार्यासाठी लोकसहभागातून १ लाख पाउंडांचा निधी उभारल्याची माहिती देण्यात आली. (RSS Sarsanghachalak UK tour)

सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचा हा दौरा संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सेवा, सामाजिक समरसता आणि सामायिक मूल्यांवर आधारित सभ्यतागत संवाद अभियानाचा एक भाग आहे. लंडन दौऱ्यात त्यांनी विविध धर्मांचे प्रमुख, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि सार्वजनिक जीवनातील मान्यवरांशी संवाद साधला. आंतरधर्मीय संवादाच्या उपक्रमांतर्गत त्यांनी श्री स्वामीनारायण मंदिर (विल्स्डन), खालसा जत्था ब्रिटिश आयल्स गुरुद्वारा तसेच लंडनमधील इतर धार्मिक स्थळांनाही भेट दिली. युनायटेड किंगडममधील हिंदू समाजातील विविध भाषिक आणि सांस्कृतिक परंपरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ११ भाषा-समुदायांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवला. (RSS Sarsanghachalak UK tour)

सेवा म्हणजे उपकार नव्हे, ईश्वरापर्यंत पोहोचण्याची संधी

भारतासमोरील आव्हानांवर मात करण्यात युवकांची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितले, सेवा निःस्वार्थ भावनेने व्हायला हवी. सेवा करून आपण महान होत नाही. ती कोणावर उपकार करण्याची गोष्ट नाही. आपण ज्यांची सेवा करतो, ते आपल्याला ईश्वरापर्यंत पोहोचण्याची संधी देतात. त्यामुळे सेवेचा भाव कृतज्ञतेचा असला पाहिजे. (RSS Sarsanghachalak UK tour)

ब्रिटिश हिंदूंची निष्ठा त्यांच्या कर्मभूमीशी

युनायटेड किंगडम मधील हिंदूंच्या निष्ठेबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, जर ब्रिटिश हिंदू खरे आणि सच्चे हिंदू असतील, तर ब्रिटन आणि भारताच्या हितांमध्ये संघर्ष होणार नाही. आणि जर कधी अशी वेळ आली, तर ब्रिटिश हिंदू स्वाभाविकपणे ब्रिटनच्या बाजूने उभे राहतील. हिंदुत्व या विषयावर स्पष्ट आहे की, कर्मभूमी हीच निष्ठेची भूमी असते. जन्मभूमी म्हणजे जन्माचे स्थान आणि पुण्यभूमी म्हणजे जिथून मूल्ये मिळतात. त्या मूल्यांना कर्मभूमीत जगायचे आणि ज्या भूमीत राहतो तिची सेवा करायची. (RSS Sarsanghachalak UK tour)







ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर