पॅरिसमधील स्वामीनारायण मंदिर भारत-फ्रान्स सांस्कृतिक संबंधांचा नवा युगस्तंभ : पंतप्रधान मोदी

    08-Sep-2026   


मुंबई : (Paris Swaminarayan Temple) फ्रांसची राजधानी पॅरिस येथे भव्य स्वामीनारायण मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशाद्वारे आनंद व्यक्त करत हे मंदिर भारत आणि फ्रांस यांच्यातील सांस्कृतिक संबंधांमधील एक नवा युगस्तंभ असल्याचे प्रतिपादन केले. जरी मी पेरिसमध्ये प्रत्यक्ष उपस्थित नसलो, तरी मनाने व हृदयाने तुमच्यासोबतच आहे अशा भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केल्या.

मंदिराचे वैशिष्ट्य सांगताना पंतप्रधान म्हणाले की, मंदिराच्या उभारणीत भारत आणि फ्रांस यांच्यातील सहकार्याचा एक नवा आयाम पाहायला मिळतो. हे मंदिर 'मेड इन इंडिया' आणि 'बिल्ट इन फ्रांस'चे उत्कृष्ट उदाहरण आहे. यातील अनेक दगड भारतात कोरीव काम करून तयार करण्यात आले आहेत. भारताची प्राचीन कला आणि फ्रांसचे आधुनिक तंत्रज्ञान यांचा मिलाफ या वास्तुमध्ये झाला आहे. हे मंदिर केवळ भक्तीचेच नव्हे, तर सेवा उपक्रमांचे केंद्र बनेल आणि संपूर्ण युरोपला याचा लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Paris Swaminarayan Temple)

भारत आणि फ्रांस यांच्यातील ऐतिहासिक, राजकीय आणि सांस्कृतिक संबंधांचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी काही महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले. ते म्हणाले, राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत दोन्ही देश तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), संरक्षण, अवकाश आणि हवामान बदलांसारख्या क्षेत्रात वेगाने पुढे जात आहेत. वर्ष २०२६ हे 'इंडिया-फ्रांस इयर ऑफ इनोव्हेशन' म्हणून साजरे केले जात आहे. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धातील भारतीय सैनिकांचे बलिदान, फ्रेंच विद्वानांचे संस्कृत भाषेतील योगदान, रोमाँ रोलाँ यांचे रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद यांच्यावरील लेखन आणि पुडुचेरीच्या अरबिंदो आश्रमातील 'द मदर' यांचा आध्यात्मिक प्रवास या सर्व घटकांनी दोन्ही देशांना जवळ आणले आहे. (Paris Swaminarayan Temple)

स्वामीनारायण मंदिरे ही केवळ श्रद्धेची केंद्रे नसून सेवा कार्याचेही माध्यम राहिली आहेत. पॅरिसमधील मंदिरही विविध सेवा प्रकल्पांचे केंद्र बनेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. या मंदिरातून भारतीय संस्कृतीचे जे विचार आणि संदेश प्रसारित होतील, त्याचा लाभ संपूर्ण युरोपमधील नागरिकांना मिळेल, असेही मोदी म्हणाले. भविष्यात संधी मिळाल्यास या मंदिराला प्रत्यक्ष भेट देऊन दर्शन घेण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली. पॅरिसमधील या ऐतिहासिक लोकार्पण सोहळ्यासाठी सर्व अतिथी, हरिभक्त, कुटुंबे आणि भारतीय प्रवासी समुदायाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. (Paris Swaminarayan Temple)








ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर