मुंबई : (Maharashtra PCPNDT Act enforcement) राज्यात गर्भलिंग निदानाला प्रतिबंध करून स्त्रीभ्रूणहत्या रोखणे, बेकायदेशीर गर्भपाताला आळा घालणे आणि जन्मतः लिंग गुणोत्तरात सुधारणा करण्यासाठी राज्य शासनाने राज्यस्तरीय कृती दल (टास्क फोर्स) स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. मंगळवारी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल
विधानपरिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली या कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. तर, विधानपरिषद सदस्या डॉ. प्रज्ञा सातव, भावना गवळी, चित्रा वाघ, उमा खापरे, डॉ. मनीषा कायंदे तसेच विधानसभा सदस्या स्नेहा दुबे पंडित आणि श्वेता महाले यांचा यात सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. राज्य कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे येथील अतिरिक्त संचालक सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. (Maharashtra PCPNDT Act enforcement)
पीसीपीएनडीटी आणि एमटीपी कायद्यांच्या अंमलबजावणीवर लक्ष
राज्यात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्रे अधिनियम अर्थात पीसीपीएनडीटी अॅक्ट आणि वैद्यकीय गर्भपात अधिनियम अर्थात एमटीपी अॅक्ट मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याची काही प्रकरणे निदर्शनास आली आहेत. या पार्श्वभूमीवर सोनोग्राफी केंद्रे, तत्सम निदान केंद्रे आणि वैद्यकीय गर्भपात केंद्रांवर प्रभावी देखरेख ठेवून विविध शासकीय विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी हे कृती दल स्थापन करण्यात आले आहे. (Maharashtra PCPNDT Act enforcement)
जिल्ह्यांमध्ये तपासण्या
कृती दल राज्यातील विविध जिल्हे आणि महानगरपालिका क्षेत्रांना प्रत्यक्ष भेटी देऊन पीसीपीएनडीटी व एमटीपी कायद्यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांसह सोनोग्राफी आणि वैद्यकीय गर्भपात केंद्रांना अचानक भेटी देऊन तपासणी केली जाणार आहे. कायद्याचे उल्लंघन आढळल्यास संबंधित प्राधिकरणाला तातडीने कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्याचे अधिकारही कृती दलाला देण्यात आले आहेत. (Maharashtra PCPNDT Act enforcement)
कायद्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर करण्यासाठी शासनाला शिफारशी करणे, जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या समन्वय बैठका घेणे तसेच स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी आणि मुलींच्या जन्माचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जनजागृतीच्या उपाययोजना सुचविणे, ही जबाबदारीही कृती दलावर सोपविण्यात आली आहे. (Maharashtra PCPNDT Act enforcement)
दर तीन महिन्यांनी अहवाल सादर करणार
कृती दलाला आवश्यक सर्व प्रशासकीय, तांत्रिक आणि अभिलेखीय सहकार्य करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि संबंधित समुचित प्राधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आली आहे. कृती दल प्रत्येक तीन महिन्यांनी निरीक्षणे आणि शिफारशींचा अहवाल सार्वजनिक आरोग्य विभागाला सादर करणार असून त्याचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. (Maharashtra PCPNDT Act enforcement)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....