मुंबई : (VHP ) आगामी नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेने गरबा आणि दांडिया आयोजनांबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नवरात्रीदरम्यान आयोजित गरबा आणि दांडिया कार्यक्रमांमध्ये मुस्लिमांच्या सहभागावर विहिंपने बंदी जाहीर केली असून, या संदर्भात कार्यक्रमाच्या आयोजकांसाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.
विहिंपची भूमिका: नवरात्री हा भक्तीचा पवित्र उत्सव
विहिंपने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार, गरबा मंडप किंवा कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश करताना प्रत्येक उपस्थिताचे आधार कार्ड किंवा अधिकृत ओळखपत्र तपासणे आयोजकांसाठी बंधनकारक करण्यात यावे. उपस्थितांची हिंदू ओळख निश्चित करण्यासाठी त्यांच्या कपाळावर टिळा लावणे आणि मनगटावर कलावा (पवित्र धागा) बांधणे अनिवार्य करावे. (VHP )
विहिंपने स्पष्ट केले आहे की नवरात्री हा केवळ नाचगाण्याचा किंवा मनोरंजनाचा कार्यक्रम नसून देवीच्या पूजेचा आणि भक्तीचा एक पवित्र उत्सव आहे. 'जे समाज किंवा धर्म मूर्तीपूजेच्या विरोधात आहेत, त्यांनी या उत्सवात आणि पूजेत का सहभागी व्हावे?', असा थेट सवाल विहिंपने उपस्थित केला आहे. विहिंपने आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना सांगितले की, धर्मांतर आणि गोहत्या यांसारख्या मुद्द्यांवर संघटना कोणतीही तडजोड करणार नाही. हिंदू सण हे सांस्कृतिक वारशाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहेत आणि त्याचे जतन करणे आवश्यक आहे. (VHP )
मुस्लिमांसाठी पर्याय: कुटुंबासह सहभाग किंवा स्वतंत्र आयोजन
विहिंपच्या मते, हे निर्बंध केवळ खबरदारीचा उपाय म्हणून लागू करण्यात आले असून ते कोणत्याही विशिष्ट समुदायाच्या विरोधात नाहीत. जर मुस्लिम समुदायातील कोणाला नवरात्रोत्सवात सहभागी व्हायचे असेल, तर त्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांसह, पत्नी किंवा बहिणीसोबत या उत्सवात यावे. तसेच, त्यांनी हा उत्सव आपल्या घरी किंवा मशिदीत आयोजित करावा, असा पर्यायही विहिंपने सूचवला आहे. (VHP )
राजकीय प्रतिक्रिया: समर्थन आणि विरोध
डीजेच्या वापरावरून आधीच उलट-सुलट चर्चा सुरू असताना, आता गरबा आणि दांडिया आयोजनांमधील सहभागावरून हे नवीन वादंग पेटले आहे. धार्मिक परंपरांचे पालन, उत्सवांचे स्वरूप आणि त्यात इतर समुदायांचा प्रवेश या मुद्द्यांवरून समाजकारण आणि राजकारणात नवीन चर्चांना उधाण आले आहे. भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या भूमिकेला पाठिंबा दिला. ओळख लपवून नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये प्रवेश करणे तसेच महिलांशी छेडछाडीच्या घटना घडत असल्याचा आरोप केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. (VHP )
याउलट शरद पवार गटासह काँग्रेस आणि उबाठाने या मार्गदर्शक सूचनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी, “मुस्लिम गरबा खेळू शकत नाहीत, असे कोण म्हणते? असा सवाल केला. विहिंपचे लोक अलिकडे स्वतःला धर्माचे ठेकेदार म्हणून सादर करू लागले असून, अशा प्रकारची वक्तव्ये केली जात असल्याची टीकाही राऊतांनी केली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात तसेच सांस्कृतिक इतिहासात मुस्लिम समाजाचेही मोठे योगदान राहिले आहे, असे राऊत यांनी म्हटले. विहिंपचा हा निर्णय असंवैधानिक असल्याचे शरद पवार गटाने म्हटले आहे. विहिंपचा हा निर्णय सामाजिक वातावरणात तेढ निर्माण करणारा असल्याचा आरोप त्यांनी केला. (VHP )
मूर्तीपूजा हराम मानणाऱ्यांसाठीच हा निर्णय
मूर्तीपूजेला हराम मानणारे श्रद्धापूर्वक गरबा किंवा दांडिया उत्सवात सहभागी होत नसल्याचे बऱ्याचदा आढळून आले आहे. गरब्याच्या ठिकाणी धर्मांध मुस्लिमांकडून हिंदू महिलांचा विनंयभंग झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. ज्यांच्या भावना हिंदूंच्या आस्थेशी जोडल्या आहेत, अशांनीच नवरात्री उत्सवात सहभागी व्हावे. मुस्लिमांना सहभागी व्हायचे असले, तर त्यांनी आपली पत्नी किंवा बहीण किंवा घरच्यांसोबत यावे, अशांना निश्चितच प्रवेश मिळेल. विपिंहचे मूळ काम सेवा, सुरक्षा, संस्कार हे आहे; त्यामुळे हा निर्णय फक्त मूर्तीपूजा हराम मानणाऱ्यांसाठीच आहे. - श्रीराज नायर, राष्ट्रीय प्रवक्ते, विश्व हिंदू परिषद
.....तर हा 'लव जिहाद' आहे
विश्व हिंदू परिषद तथा बजरंग दलाने घेतलेल्या भूमिकेला माझे समर्थन आहे. गणपती मिरवणुकीवर अंडी फेकायची कोणी हिंमत करत असेल तर निश्चितच अशा लोकांना नवरात्रीत गरबा खेळण्यासाठी परवानगी नाकारली पाहिजे. नवरात्रीत आपण दुर्गा मातेची उपासना करतो. गरब्याच्या ठिकाणी सुद्धा सुरक्षित वातावरणात आपण दांडिया खेळले पाहिजे. आपली ओळख लपवून जर गरब्यात सहभागी होऊ पाहत असेल तर हा लव जिहाद आहे. त्यामुळे अशा धर्मांध प्रवृत्तीच्या लोकांना दांडिया, गरब्याच्या ठिकाणी प्रवेश देऊ नये. - संजय उपाध्याय, आमदार
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक