मुंबई (Ganeshotsav BEST Bus Service) :- गणेशोत्सव काळात रात्री उशिरापर्यंत गणेश मंडळे आणि पंडालांमध्ये दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी बेस्ट ने दिलासादायक निर्णय घेतला आहे. १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान १० प्रमुख मार्गांवर २६ अतिरिक्त बसेस चालवण्यात येणार असून या बसेस रात्री १०.३० ते सकाळी ६ वाजेपर्यंत धावतील.(Ganeshotsav BEST Bus Service)
या विशेष सेवेमुळे लालबाग, परेल, गिरगाव, खेतवाडीसह दक्षिण मुंबईतील प्रमुख गणेश मंडळांपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे. विसर्जनासाठी रात्री बाहेर पडणाऱ्या नागरिकांनाही याचा लाभ मिळेल. या अतिरिक्त बसेसची व्यवस्था ओशिवरा, शिवाजीनगर, देवनार, बॅकबे, मुंबई सेंट्रल, वरळी, सांताक्रूझ, वडाळा आणि काळा किल्ला आगारातून केली जाणार आहे. दक्षिण मुंबईसह पश्चिम उपनगरातील भाविकांसाठीही रात्री सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध राहणार आहे.(Ganeshotsav BEST Bus Service)
मेट्रो-३ ची सेवाही मध्यरात्री १२ वाजेपर्यंत -
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननेही १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान मेट्रो-३ ची सेवा मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कफ परेड आणि आरे जेवीएलआर या दोन्ही टर्मिनल स्थानकांतून शेवटची मेट्रो रात्री १०.३० वाजता सुटते. नव्या व्यवस्थेमुळे रात्री उशिरा गणपती दर्शन घेणारे भाविक मेट्रोने सहज घरी परतू शकणार आहेत.(Ganeshotsav BEST Bus Service)