अर्थात, हे गंगे, यमुने, गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधू आणि कावेरी, तुम्ही सर्व पवित्र नद्या या जलामध्ये (माझ्या स्नानाच्या पाण्यात) एकत्र या आणि या पाण्याला पवित्र करा. हा श्लोक नद्यांना पावन मानून रोज सकाळी स्नानाच्या वेळी आजही कित्येक घरांमध्ये आवर्जून म्हटला जातो. एवढे नद्यांच्या पवित्र पाण्याला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व. पण, वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरणामुळे जलप्रदूषणात लक्षणीय वाढ झाली आणि स्वच्छ, नितळ नद्यांना कधी नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले, ते आपले आपल्यालाच कळले नाही. ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या अहवालानुसार, देशातील ३५०हून अधिक नद्यांचे पट्टे प्रदूषित झाले आहेत, ज्याचा फटका ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांना बसलेला दिसतो. परिणामी, दरवर्षी लाखो लोक पाण्यावाटे पसरणार्या आजारांमुळे आजारी पडतात, तर जलचर परिसंस्थांमधील जैवविविधता चिंताजनक वेगाने नष्ट होत आहे. पण, दुर्दैवाने अजूनही एकीकडे मातेसमान, देवीसमान पूजल्या जाणार्या नद्यांच्या संरक्षण आणि संवर्धनाचे काम हे कुर्मगतीनेच सुरू असल्याचे खेदाने नमूद करावे लागेल.
मध्य प्रदेशातील अशीच एक नदी म्हणजे अजनार. ही नदी प्रामुख्याने राजगड जिल्ह्यातील ब्यावरा शहराच्या मध्यभागातून आणि आजूबाजूच्या परिसरातून वाहते. पूर्वी या नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीसाठीही वापरले जात होते. परंतु, अजनारला जलप्रदूषणाचा असा अजगरी विळखा पडला की, या नदीच्या किनारी फिरकणेही लोकांनी बंद केले. नदीचे रूपांतर नाल्यात झाले. नागरिकांनी टाकलेला कचरा आणि सांडपाण्याबरोबर स्थानिक प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष या विदारक परिस्थितीला मुख्यत्वे कारणीभूत!
पण, २१ वर्षीय सुरेंद्र सिंह चौधरी ऊर्फ ‘बिट्टू तबाही’ या ब्यावरा गावातील तरुणाने नदीला पुनरुज्जीवित करून तिचे गतवैभव प्राप्त करून देण्याचा विडाच उचलला. दि. २६ जानेवारी २०२६ रोजी त्याने अजनार नदीच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली. नदीतील प्लास्टिक, जलपर्णी, गाळ असा सगळा कचरा गोळा करायला बिट्टूने प्रारंभ केला. सुरुवातीला काही मित्रांनी त्याला साथही दिली. पण, नदीतील एकूणच अस्वच्छता आणि हे आव्हानात्मक काम बघता, शेवटी बिट्टू एकटाच उरला. पण, ‘मैं एक एकेला काफी हूँ’ या आत्मविश्वासाने ‘बीएससी’चे शिक्षण घेणार्या बिट्टूने नदीस्वच्छतेचे घेतलेले व्रत भंग केले नाही. नदीस्वच्छतेसाठी स्वत:च्या खिशातून ३० हजार रुपये खर्च करून, साहित्य-सामग्रीची जमवाजमव करीत बिट्टू दररोज कटाक्षाने झटत राहिला. नदीच्या प्रचंड प्रदूषित, दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे बिट्टूच्या त्वचेवरही परिणाम झाला. एवढेच नाही, तर नदीतील पाणसर्पांचा जीवघेणा धोकाही कायम होता. पण, अजिबात हार न मानता, दररोज तीन ते चार तास खर्च करून अजनार नदी मोकळा श्वास घेईल, यासाठीच बिट्टूचा प्रत्येक श्वास कामी आला. पाऊसपाणी, वारा अशी कशाचीही तमा न बाळगता जणू हा अजनारचा मानसपुत्र आपल्या मातेची अखंड सेवासुश्रूषा करीत होता. अखेरीस तब्बल आठ महिन्यांच्या अथक परिश्रमांनंतर अजनारचे रूपडे पालटले. कोणेएकेकाळी गाळ आणि कचर्यात रुतून प्रवाहच खंडित झालेल्या अजनारचा पुनर्जन्म झाला. ही नदी पूर्वीप्रमाणे पुन्हा प्रवाहित झाली. स्वच्छ झालेल्या घाटांनाही अजनारचा जलस्पर्श सुखावून गेला. केवळ पशुपक्षीच नव्हे, तर पंचक्रोशीतील नागरिकही अजनारचा हा अजुबा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नदीकिनारी दाखल होऊ लागले. विशेष म्हणजे, बिट्टूचा हा नदीस्वच्छतेचा प्रयोग त्याने तयार केलेल्या समाजमाध्यमांवरील व्हिडिओंमुळे देशासमोरच नव्हे, तर जगासमोरही आला. बिट्टूवर सर्व स्तरांतून कौतुकवर्षाव झाला आणि तो समाजमाध्यमांवर ‘ग्रीन वॉरियर’ म्हणून एकाएकी झळकला.
बिट्टूच्या या नदीस्वच्छता मोहिमेमुळे खडबडून जागे झालेल्या स्थानिक प्रशासनानेही या जलप्रदूषणाची गंभीर दखल घेतली आणि सर्वोपरी सहकार्याचीही हमी दिली. तसेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही प्रत्यक्षात बिट्टूची भेट घेऊन त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. देशातच नव्हे, तर ‘द ओशन क्लीनअप’ नावाच्या डच कंपनीचे सीईओ बॉयन स्लॅट यांनी तर थेट नोकरीची मोठी ऑफरही बिट्टूला दिली. एकूणच काय, तर ‘बिट्टू बन गया जेंटलमन!’
असे हे बिट्टू तबाहीचे नदीस्वच्छता कार्य अनेकार्थांनी प्रेरणादायीच म्हणावे लागेल. केवळ एका माणसाची इच्छाशक्ती तीव्र असेल तर तो काय करू शकतो, याचेच हे ज्वलंत उदाहरण. तसेच आजचे ‘जेन-झी’ हे बेजबाबदार आणि उत्तरदायी नाहीत, अशी सरसकट लेबले लावणार्यांनाही बिट्टूने त्याच्या कृतीतून चोख प्रत्युत्तर दिले आहे. शिवाय, समाजमाध्यमांचा सकारात्मक वापर करून एखादी स्थानिक मोहीमसुद्धा कशी जगाच्या पाठीवर पोहोचू शकते, याचाही आदर्श वस्तुपाठ बिट्टूने घालून दिला. रा. स्व. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालकांनी ‘पंच-परिवर्तना’चा मूलमंत्र दिला. बिट्टूने पेललेले आव्हान हे याच ‘पंच-परिवर्तना’तील ‘पर्यावरण’ आणि ‘नागरी कर्तव्य’ या दोन्ही मूल्यांच्या कृतिशीलतेचीच जाणीव करून देणारे म्हणावे लागेल.
बिट्टूची नदी पुनरुज्जीवनाची मोहीम सर्वस्वी कौतुकास्पद असली, तरी यानिमित्ताने काही प्रश्नही साहजिकच उपस्थित होतात. २१ वर्षांचा एकटा मुलगा जर या अस्वच्छ नदीच्या कायापालटासाठी आठ महिन्यांहूनही अधिक काळ अविरतपणे जीव धोक्यात घालून झटू शकतो, तर सुस्त स्थानिक प्रशासनाचे वर्षानुवर्षे याकडे दुर्लक्ष कसे झाले? लोकप्रतिनिधी, राज्य सरकारलाही या समस्येचे गांभीर्य वेळीच का समजले नाही? बिट्टूला साहजिकच ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. पण, तरीही ही मोहीम लोकचळवळ न होता, एका व्यक्तीच्या प्रयासांभोवतीच केंद्रित का राहिली? यांसारखे काही प्रश्न उपस्थित होणे साहजिकच.
अजनार ही भारतातील अशा शेकडो जलप्रदूषित नद्यांची प्रतिनिधी ठरावी. त्यामुळे गंगा, यमुना, गोदावरीसारख्या महाकाय नद्यांच्या स्वच्छतेसोबतच लहान-मोठ्या नद्यांच्या पुनरुज्जीवनाकडे लक्ष देणेही तितकेच गरजेचे. गुजरातची साबरमती, राजस्थानची अरवरी असे नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे भारतात यापूर्वीही यशस्वी प्रयोग झाले आहेतच. पण, अशा प्रयोगांना प्रशासकीय-नागरी पातळीवर अधिक गतिमान करण्याची, दीर्घकालीन उपाययोजनांची आणि जलप्रदूषणविरोधी कायद्यांच्या कठोर अंमलबजावणीची नितांत आवश्यकता आहे. तसे झाले, तर असे शेकडो ‘बिट्टू तबाही’ उभे राहतील आणि नद्यांसाठी ही सर्वार्थाने नवी ‘सबाही’ (सकाळ) ठरेल, यात शंका नाही!