संकटसमयी जीव धोक्यात घालून ठाणेकरांचे प्राण वाचवणाऱ्या ‘डिझास्टर वॉरियर्स’चा राष्ट्रीय सन्मान

    07-Sep-2026
Thane Disaster Warriors

ठाणे :
(Thane Disaster Warriors) आग, पूर, इमारत दुर्घटना असो अथवा अन्य कोणतीही आपत्ती संकटाची चाहूल लागताच स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांच्या मदतीसाठी सर्वप्रथम धावून जाणाऱ्या ठाणे महापालिकेच्या ‘डिझास्टर वॉरियर्स’च्या शौर्याला राष्ट्रीय पातळीवर सलाम करण्यात आला आहे. ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दल, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (TDRF) आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षातील (RDMC) अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रतिष्ठेच्या ‘सेफ इंडिया ब्रेव्हरी अवॉर्ड २०२६’ने सन्मानित करण्यात आले.
 
मुंबई येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात ठाणे महापालिकेच्या या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदक, ट्रॉफी आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या राष्ट्रीय सन्मानाबद्दल महापौर शर्मिला पिंपळकर आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. (Thane Disaster Warriors)
 
किंग एक्स्पो मीडियाच्या वतीने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन तसेच विविध शासकीय आणि निमशासकीय विभागांमध्ये धाडसी आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणे हा या राष्ट्रीय पुरस्काराचा उद्देश आहे. (Thane Disaster Warriors)
 
या पुरस्कारासाठी देशभरातून सुमारे दोन महिन्यांपूर्वी नामांकने मागविण्यात आली होती. प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून विविध क्षेत्रांत उत्कृष्ट, धाडसी आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. किंग एक्स्पो मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निरंजन कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सोहळ्यात ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. (Thane Disaster Warriors)
 
ठाणे महापालिका अग्निशमन दलातील अधिकारी गणेश खेताडे, स्वप्नील सरनोबत, तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वाय. एम. तडवी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. (Thane Disaster Warriors)
 
आपत्तीच्या काळात ‘फर्स्ट रिस्पॉन्डर’ची भूमिका
 
 
ठाणे शहरात आग लागणे, अतिवृष्टी व पूरस्थिती निर्माण होणे, इमारत दुर्घटना घडणे, झाडे कोसळणे किंवा अन्य नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती उद्भवणे अशा प्रसंगी अग्निशमन दल, TDRF आणि RDMCचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल होते. अनेक वेळा परिस्थिती अत्यंत धोकादायक असतानाही नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी हे जवान स्वतःचा जीव धोक्यात घालतात. (Thane Disaster Warriors)
 
दिवस-रात्र कोणत्याही वेळी सज्ज राहून आपत्तीग्रस्तांच्या मदतीला धावणाऱ्या या पथकांचे काम केवळ प्रशासकीय जबाबदारीपुरते मर्यादित नसून नागरिकांच्या जीवितरक्षणाशी थेट जोडलेले आहे. त्यामुळे मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार हा केवळ एक पुरस्कार नसून त्यांच्या निःस्वार्थ आणि धाडसी सेवेची राष्ट्रीय स्तरावरील दखल असल्याचे सेफ इंडियाचे बिमल नाथवाणी यांनी सांगितले. (Thane Disaster Warriors)
 
ठाण्याच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या शिरपेचात मानाचा तुरा
 
ठाणे शहराला विविध प्रकारच्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सातत्याने कार्यरत असते. या यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारामुळे ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन व्यवस्थेच्या कार्याची देशपातळीवर दखल घेतली गेली असून, ‘लेक सिटी’ ठाण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. (Thane Disaster Warriors)
 
 




संबंधित मजकूर