राजे उमाजी नाईकांचा स्वातंत्र्यघोष...

    07-Sep-2026
 
Raj Umaji Naik
 
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास १८५७ पासून सुरू होत नाही. त्याआधीच दख्खनच्या डोंगरदर्‍यांतून राजे उमाजी नाईकांनी इंग्रज सत्तेला उघडे आव्हान दिले. आज दि. ७ सप्टेंबर रोजी त्यांच्या जयंतीनिमित्ताने आपण एका स्वातंत्र्य-नायकाला, रामोशी किल्लेदार परंपरेला आणि हिंदुस्थानव्यापी जाहीरनाम्याला पुन्हा इतिहासाच्या मध्यभागी आणणे आवश्यक आहे. आजही हा इतिहास दुर्लक्षित आहे. त्यानिमित्ताने या स्वातंत्र्यनायकाची शौर्यगाथा शब्दबद्ध करणारा हा लेख...
 
राजे उमाजी नाईक हे फक्त पुरंदर परिसरातील इंग्रजांनी ठरवलेले बंडखोर. ते इंग्रजांच्या दख्खनवरील राजकीय आणि लष्करी महत्त्वाकांक्षेसमोरील मोठाच अडथळा होते. त्यांचा जन्म रामोशी समाजाच्या लढाऊ, किल्लेदार आणि गुप्तवार्ता परंपरेत झाला. रामोशी समाज गावे राखणे, डोंगरवाटा पाहणे, किल्ले सांभाळणे, हालचालींची खबर देणे आणि गनिमी पद्धतीने प्रत्युत्तर देणे, यासाठी ओळखला जात होता. महाराष्ट्राच्या किल्लेपरंपरेत हा समाज केवळ पहारेकरी नव्हता; तो मार्गदर्शक, रक्षक, गुप्तवार्ता वाहक आणि सशस्त्र प्रत्युत्तर देणारा एक संघटक घटक होता. त्यामुळे उमाजींचा लढा अचानक उभा राहिलेला नसून; तो जुन्या किल्लेदार आणि वतनदारी परंपरेतून जन्मलेला राजकीय प्रतिकार होता.
 
मराठी ऐतिहासिक स्मृतीमध्ये, बहिर्जी नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेरप्रमुख म्हणून ओळखले जातात. गुप्त माहिती, वेग, वेषांतर, डोंगररस्त्यांचे ज्ञान आणि शत्रूला दिशाभूल करण्याची क्षमता, हीच परंपरा दख्खनच्या लढाऊ समाजांत खोलवर होती. उमाजी नाईकांच्या कार्यातही हीच परंपरा नवे राजकीय रूप घेऊन उभी राहते.
 
१८१८ मध्ये पेशवाईचा पराभव झाल्यानंतर, इंग्रजांनी दख्खनातील जुन्या स्थानिक व्यवस्था मोडून काढल्या. गावांचे रक्षक, किल्ल्यांचे पहारेकरी आणि वंशपरंपरागत हक्कांवर जगणारे समुदाय आपले मानधन, जमीन आणि सामाजिक स्थान गमावू लागले. उमाजी नाईकांचा संघर्ष याच अन्यायातून उभा राहिला. त्यामुळे तो साधा गुन्हेगारी प्रकार नव्हता; तो सन्मान, उपजीविका आणि स्वायत्तता हिरावून घेतलेल्या समाजाचाच प्रतिकार होता. म्हणूनच उमाजींच्या उठावाला फक्त कायदा-सुव्यवस्थेच्या चौकटीत पाहणे चुकीचे आहे; तो सामाजिक न्याय आणि राजकीय स्वातंत्र्याचा संगम होता.
 
कॅप्टन अलेक्झांडर मॅकिंटोश यांच्या १८३३ मधील नोंदीतून उमाजींच्या लढ्याचा आवाका दिसतो. मॅकिंटोश लिहितात की, उमाजी नाईकांना डोंगरातील प्रत्येक वाट आणि दरीचे संपूर्ण ज्ञान होते; प्रत्येक भागातील शेतकरी त्यांना आश्रय, अन्नसामग्री आणि गुप्त माहिती पुरवत असत. सासवड किंवा आसपासच्या ठिकाणाहून इंग्रजांचे सैन्य हलले की, ती बातमी तत्काळ उमाजींपर्यंत पोहोचत असे. मॅकिंटोश यांच्या शब्दांत उमाजी जणू सर्वत्र उपस्थित असल्यासारखेच वाटत होते. प्रत्यक्षात ते सर्वत्र नसले, तरी त्यांच्या जाळ्याने इंग्रजांना तसे वाटण्यास भाग पाडले. हे एका व्यापक गनिमी प्रतिकाराचे लक्षण होते. इंग्रजांकडे सैन्य होते, पण उमाजींकडे डोंगर, जनतेची साथ, गुप्त बातम्या आणि स्थानिकांच्या विश्वासाचे पाठबळ होते.
 
इंग्रजांनी हा धोका अचूक ओळखला होता. पुणे, सातारा, अहमदनगर आणि औरंगाबाद या भागांतून त्यांच्या तुकड्या हलवण्यात आल्या. उमाजी आणि त्यांच्या सहकार्‍यांना पकडण्यासाठी, मोठी बक्षिसेही जाहीर झाली. या हालचालींवरून इंग्रजांनी त्यांना किरकोळ दरोडेखोर नव्हे, तर दख्खनातील सत्तेला आव्हान देणारा गंभीर नेता मानल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे उमाजी नाईक इंग्रजांच्या दख्खनातील विस्तारामधील, मुख्य राजकीय अडथळा ठरत होते.
 
उमाजी नाईकांच्या राजकीय दृष्टीचा सर्वांत मोठा पुरावा म्हणजे त्यांचा जाहीरनामा! हा जाहीरनामा पुढे १८३४ मध्ये, इंग्रजांच्या काळातील ‘बॉम्बे गॅझेट’ या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला. त्यामुळे हा पुरावा केवळ लोकस्मृतीवर आधारित नसून; त्याचा पुरावा इंग्रजांच्या स्वतःच्या छापील नोंदींतही आढळतो. हा जाहीरनामा फक्त पुरंदर, पुणे किंवा रामोशी समाजापुरताच नव्हता. तो राजे, जहागीरदार, इनामदार आणि हिंदुस्थानातील सर्व रहिवाशांनासाठी उद्देशून होता.
 
या जाहीरनाम्यात संपूर्ण हिंदुस्थानाने एकाचवेळी उठावे, इंग्रजांच्या पगारातील सैन्याने युरोपीयनांप्रति निष्ठा सोडावी, महसूल भरू नये आणि नवे न्याय्य राज्य उभे करावे, असे स्पष्ट आवाहन करण्यात आले होते. भारतीयांसंदर्भात हा इंग्रज सत्तेविरुद्धचा बहुधा पहिलाच उघड, राजकीय आणि हिंदुस्थानव्यापी स्वातंत्र्यघोष मानला पाहिजे. अमेरिकन स्वातंत्र्य घोषणेनंतर, इंग्रजांविरुद्ध अशा प्रकारे सार्वजनिक आवाहन करणार्‍या दस्तऐवजांमध्ये, उमाजींच्या जाहीरनाम्याला विशेष स्थान द्यावे लागेल. हाच दावा उमाजी नाईकांना, भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या सुरुवातीच्या मोठ्या राजकीय नेत्यांमध्ये स्थान देतो.
 
मॅकिंटोश यांनी उमाजी नाईकांची तुलना, छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आहे. त्यांच्या नोंदीनुसार, उमाजींना आपली वाटचाल सुरू ठेवू दिली असती, तर ते पुढे दुसरे शिवाजीच झाले असते. एका इंग्रज अधिकार्‍याने अशी तुलना करणे, हे उमाजींच्या नेतृत्वाचे महत्त्व दाखवते. इंग्रजांना भीती होती की उमाजी स्थानिक प्रतिकाराला व्यापक राजकीय चळवळीत रूपांतरित करू शकतील.
 
शेवटी उमाजी मोठ्या युद्धात हरले म्हणून पकडले गेले नाहीत; त्यांच्या स्वतःच्या एका अनुयायाच्या विश्वासघातामुळे ते इंग्रज सरकारच्या हाती लागले. दि. ३ फेब्रुवारी १८३२ रोजी पुण्यातच त्यांना फाशी देण्यात आली. लोकांत भीती निर्माण करण्यासाठी, त्यांच्या पार्थिवाचे प्रदर्शनही करण्यात आले. पण, त्यांच्या फाशीने रामोशी प्रतिकार संपला नाही. पुढील पिढ्यांतही रामोशी योद्धे, संघटक, गुप्तवार्ता वाहक आणि सामान्य लोक विविध रूपांत इंग्रज सत्तेला आव्हान देत राहिले. नंतर, याच लढाऊ समुदायांवर गुन्हेगार जमाती कायद्याचा कलंक लादला गेला. ज्या समाजाने गावे राखली, किल्ले जपले, गुप्तवार्ता वाहिली आणि स्वातंत्र्याच्या आरंभीच्या ठिणगीला हातभार लावला, त्याच समाजाला ‘औपनिवेशिक कायद्या’ने संशयाच्या चौकटीत बंद केले. म्हणूनच राजे उमाजी नाईकांचे स्मरण म्हणजे केवळ एका योद्ध्याला अभिवादन नव्हे; ते भारतीय इतिहासातील विस्मृतीला दिलेले आवश्यक उत्तर आहे. दि. ७ सप्टेंबरला त्यांचे स्मरण करताना, आपण त्यांना इंग्रजांनी ठरवलेले बंडखोर म्हणून नव्हे, तर हिंदुस्थानाला स्वातंत्र्याचा उघड आवाज देणारे स्वातंत्र्यनायक म्हणून पाहिले पाहिजे.
 
डॉ. केतन मदाने
(लेखक ‘पीएचडी’धारक असून, आयर्लंड येथे शास्त्रज्ञ आहेत.)
९६६५७२८२४८




संबंधित मजकूर